liver cancer and oral hygiene: कर्करोग हा एक असा गंभीर आजार आहे, ज्याचे नाव ऐकताच भल्याभल्यांना घाम फुटतो. आजकाल दातांचे आजारही खूप वाढले आहेत. दातांच्या आरोग्याविषयी एक गोष्ट सर्वांत जास्त सांगितली जाते आणि ती म्हणजे जर आपण आपल्या दातांची योग्य काळजी घेतली, जसे की दात स्वच्छ करणे, वेळोवेळी तपासणे. योग्य ब्रश आणि पेस्ट वापरणे, तर तोंडाचे आरोग्य चांगले राहते. पण तुम्हाला माहीत आहे का… की, आपल्या दातांमुळेदेखील कर्करोग होऊ शकतो? आपल्या दातांमुळेही अनेक रोग होऊ शकतात? आपण बऱ्याचदा दातांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करतो. मात्र, जर त्यांबाबत वेळेवर उपचार केले गेले नाही, तर त्या समस्या कर्करोगासारख्या जीवघेण्या आजारांना कारणीभूत ठरू शकतात. दात किडणे हे सहसा खराब स्वच्छतेमुळे होते. बरेच लोक दात व्यवस्थित घासत नाहीत, त्यामुळे त्यांच्या दातांवर घाण साचते आणि त्यांमध्ये पोकळ्या निर्माण होतात. अशा पोकळ्या दातांचे नुकसान करतात.
‘युनायटेड युरोपियन जर्नल ऑफ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी’मध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, ज्या लोकांना हिरड्यांमधून रक्तस्राव, तोंडात अल्सर व दात किडणे असे त्रास होतात, त्यांना हेपेटोसेल्युलर कार्सिनोमा होण्याचा धोका ७५ टक्के वाढतो. हेपेटोसेल्युलर कार्सिनोमा हा यकृताच्या कर्करोगाचा सर्वांत सामान्य प्रकार आहे. ‘कॅन्सर रिसर्च यूके’च्या आकडेवारीनुसार, दरवर्षी यूकेमध्ये यकृताच्या कर्करोगाचे ६,२०० नवीन रुग्ण आढळतात. आकडेवारीनुसार, यकृताचा कर्करोग हा कर्करोगाने होणाऱ्या मृत्यूंपैकी आठवा सर्वांत सामान्य प्रकार आहे.
जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, ‘क्वीन्स युनिव्हर्सिटी बेलफास्ट’च्या संशोधकांनी ४,६९,६२८ सहभागींच्या डेटाचे विश्लेषण केले. या सहभागींमध्ये तोंडात अल्सर, हिरड्या दुखणे, हिरड्यांमधून रक्त येणे व दात किडणे असे त्रास असलेल्या लोकांचा समावेश होता. संशोधकांनी अनेक वर्षांपासून त्यांच्या तोंडाच्या आरोग्याचे निरीक्षण केले.
१३ टक्के लोकांना यकृताच्या कर्करोगाचा प्रादुर्भाव
अभ्यासाच्या शेवटी, या सहभागींपैकी ४,०६९ जणांना गॅस्ट्रोइंटेस्टाइनल कर्करोग झाला होता. या कर्करोगाच्या प्रकरणांमध्ये, ५३१ (१३ टक्के) सहभागींना कोणत्या ना कोणत्या प्रकारचा दंत विकार होता. संशोधन प्रमुख डॉ. हेदी जोर्डाओ यांनी स्पष्ट केले की, तोंडाच्या बिघडलेल्या आरोग्याचा संबंध यापूर्वी हृदयरोग, स्ट्रोक व मधुमेह यांसह विविध जुनाट आजारांशी जोडला गेला आहे. तथापि, खराब दंत आरोग्याचा संबंध यकृताच्या कर्करोगाशी जोडला जाण्याची ही पहिलीच वेळ आहे.
तोंडाच्या कर्करोगाची लक्षणे
- तोंडाच्या आत पांढरे किंवा लाल ठिपके असणे.
- चघळण्यात किंवा बोलण्यात अडचण जाणवणे.
- दात मोकळे होणे.
- जबडा किंवा घशात गाठी.
- ज्या जखमा बराच काळ बऱ्या होत नाहीत.
‘या’ गोष्टींची काळजी घ्या
- दिवसातून दोन वेळा ब्रश करा.
- आठवड्यातून दोन-तीन वेळा फ्लॉस करा.
- दर सहा महिन्यांनी दातांची तपासणी करा.
- तंबाखू आणि दारूचे सेवन थांबवणे महत्त्वाचे आहे.
- सकस आणि संतुलित आहार घ्या.
यकृताच्या कर्करोगापासून बचाव करण्यासाठी करा हे उपाय….
नियमितपणे दात घासणे. तज्ज्ञांच्या मते रात्री दात घासणे अत्यंत आवश्यक आहे. जेव्हा तुमचे दात खूप घाणेरडे होतात, तेव्हा लिंबाच्या रसात बेकिंग सोडा मिसळा आणि ते स्वच्छ करा. पर्यायी म्हणून पिवळे दात स्वच्छ करण्यासाठी मोहरीचे तेल मिठात मिसळा आणि ते दातांना लावा. त्यामुळे तुमच्या दातांमध्ये अडकलेले हानिकारक जीवाणू नष्ट होतात. घरगुती उपाय करूनही जर तुम्हाला दातदुखीचा किंवा हिरड्यांमधून रक्त येण्याचा त्रास होत असेल, तर ताबडतोब दंतवैद्याचा सल्ला घ्या.
