Kidney Cancer Causes And Risk Factors : किडनीतील नलिकांमधील पेशींची असामान्य वाढ होऊ लागल्यास किडनी कॅन्सरचा धोका वाढतो. याला रीनल सेल कार्सिनोमा (RCC) असेही म्हणतात. पण बहुतेक रुग्णांना सुरुवातीची लक्षण लक्षात येत नाहीत. किडनी कॅन्सरचे नेमके कारण अजूनही स्पष्ट झालेले नसले तरी तंबाखूचे सेवन, कौटुंबिक इतिहास आणि काही विशिष्ट औषधांमुळे याचा धोका वाढतो. त्यामुळे नेमकी कशी आणि काय काळजी घेतली पाहिजे ते डॉक्टरांकडून जाणून घेऊ…

जीवनशैलीशी संबंधित धोक्याचे घटक

१) तंबाखूचे सेवन – तंबाखू हा किडनीच्या कॅन्सरसाठी सर्वांत धोकादायक घटक आहे. तंबाखूमधील कार्सिनोजेन्स (कॅन्सरला कारणीभूत केमिकल) रक्तप्रवाहात प्रवेश करते. जेव्हा किडनी मूत्र तयार करण्यासाठी रक्त शुद्ध करते, तेव्हा ही विषारी द्रव्ये किडनीमध्ये जमा होतात. दीर्घकाळ तंबाखूचे सेवन करत असल्यास किडनीच्या पेशींमधील डीएनएला नुकसान पोहोचते. तुम्ही जितका जास्त काळ धूम्रपान कराल आणि तंबाखूचा वापर कराल, तितका कॅन्सरचा धोका वाढतो.

२) लठ्ठपणा – शरीरातील चरबी इन्सुलिन आणि इन्सुलिन-लाइक ग्रोथ फॅक्टर-१ (IGF-1) सारखे हार्मोन्स जास्त प्रमाणात तयार करते. हे हार्मोन्स पेशी विभाजन वाढवतात आणि सेल डेथ कमी करतात. चरबीच्या पेशी ॲडिपोकाइन्सदेखील तयार करतात, जे दीर्घकालीन आणि सौम्य स्वरूपाच्या दाह (सूज) साठी कारणीभूत ठरतात. त्याव्यतिरिक्त लठ्ठपणामुळे ऑक्सिडेटिव्ह ताण वाढतो, ज्यामुळे डीएनएला नुकसान पोहोचते. हे हार्मोनल असंतुलन आणि दाहयुक्त वातावरण कॅन्सरच्या पेशींच्या विकासासाठी एक उत्तम पोषक ठरते. लठ्ठपणामुळे उच्च रक्तदाबदेखील होतो, ज्यामुळे कॅन्सरचा धोका वाढतो.

३) उच्च रक्तदाब – उच्च रक्तदाब आणि किडनीचा कॅन्सर यांच्यात एक मजबूत आणि महत्त्वपूर्ण संबंध आढळून आला आहे. त्यामागील बायोलॉजिकल मॅकेनिझम अद्याप समजू शकलेले नाही; पण दीर्घकालीन उच्च रक्तदाबामुळे किडनीच्या नाजूक नेफ्रॉन्समध्ये ऑक्सिडेटिव्ह ताण आणि दीर्घकालीन दाह वाढतो, असे मानले जाते. या नकारात्मक परिणामामुळे कालांतराने किडनीच्या डीएनएला नुकसान पोहोचते. त्याव्यतिरिक्त उच्च रक्तदाब हा दीर्घकालीन किडनी विकारास कारणीभूत ठरणारा एक घटक आहे, जो कॅन्सरसाठी एक स्पष्ट धोकादायक घटक आहे.

मेडिकल आणि ऑक्युपेशनल रिस्क फॅक्टर

१) एक्यूआयर्ड सिस्टिक किडनी डिसीज (ACKD) – ही स्थिती आनुवंशिक पॉलीसिस्टिक किडनी रोगापेक्षा वेगळी आहे. ACKD हा किडनीच्या अंतिम टप्प्यातील आजार असलेल्या आणि दीर्घकाळ डायलिसीसवर असलेल्या रुग्णांमध्ये अधिक सामान्यपणे आढळतो. खराब झालेल्या किडनीमध्ये हळूहळू द्रवाने भरलेल्या पिशव्या तयार होतात, ज्यांना सिस्ट (पुटी) म्हणतात. या सिस्टच्या एपिथेलियल पेशींमधील बदलांमुळे कॅन्सर होऊ शकतो. सामान्य लोकांच्या तुलनेत ACKD असलेल्या रुग्णांना किडनी कॅन्सर होण्याचा धोका जास्त असतो.

२) कौटुंबिक इतिहास आणि आनुवंशिक सिंड्रोम – किडनीच्या कॅन्सरची पाच ते आठ टक्के प्रकरणे ही जेनेटिक म्युटेशनशी संबंधित असतात. आनुवंशिक सिंड्रोममधील काही विशिष्ट आनुवंशिक परिस्थितींमुळे या आजाराचा धोका अनेक पटींनी वाढतो. त्यामध्ये von Hippel-Lindau (VHL) डिसीज, हेरेडिटरी पॅपिलरी रीनल सेल कार्सिनोमा, हेरेडिटरी leiomyomatosis अँड रीनल सेल कॅन्सर (HLRCC) आणि Birt-Hogg-Dubé सिंड्रोम यांचा समावेश होतो. या सिंड्रोम असलेल्या रुग्णांना म्युटेडे जीन वारसा हक्काने मिळतात, ज्यामुळे त्यांच्यामध्ये किडनी कॅन्सरचा धोका वाढतो. अशा लोकांना हा कॅन्सर लहान वयात किंवा कधी कधी दोन्ही किडन्यांमध्ये होऊ शकतो.

त्याव्यतिरिक्त कोणतेही सिंड्रोम नसतानाही कुटुंबात किडनी कॅन्सरचा धोका वाढतो. जर जवळच्या नातेवाइकाला (आई-वडील, भावंड किंवा मूल) किडनी कॅन्सर असेल, तर तुम्हाला तो होण्याचा धोका दुप्पट असतो. हे समान जनुके, समान पर्यावरणीय घटक किंवा दोन्ही कारणांमुळे असू शकते.

३) व्यावसायिक संपर्क – कामाच्या ठिकाणी काही विशिष्ट औद्योगिक रसायनांच्या दीर्घकालीन संपर्कामुळे किडनी कॅन्सर होऊ शकतो. किडनी या पदार्थांवर प्रक्रिया करते तेव्हा त्याचा घातक परिणाम किडनीवरच होत असतो. या रसायनांमध्ये खालील गोष्टींचा समावेश आहे:

ॲस्बेस्टॉस – फुप्फुसांच्या कर्करोगाचे कारण म्हणून ओळखले जाते; पण त्यामुळे किडनीच्या कॅन्सरचा धोकाही वाढतो.

कॅडमियम – बॅटरी उत्पादन, वेल्डिंग किंवा पेंटिंग यांसारख्या कामांमध्ये काम करणारे लोक याच्या संपर्कात येण्याचा धोका जास्त असतो.

ऑर्गेनिक सॉल्व्हेंट– विशेषतः ट्रायक्लोरोएथिलीन (TCE), जे पूर्वी औद्योगिक क्षेत्रात वंगण काढणारे घटक म्हणून वापरले जात होते.

तणनाशके आणि बेंझिन – शेती आणि काही रासायनिक उद्योगांमध्ये वापरले जातात.

मूत्रपिंडाच्या कर्करोगाची इतर कारणे

दीर्घकालीन किडनी विकार : तुम्ही डायलिसीसवर नसलात तरीही दीर्घकालीन मूत्रपिंड विकारामुळे या कॅन्सरचा धोका वाढतो. ज्याप्रमाणे उच्च रक्तदाब किंवा मधुमेह किडनीला नुकसान पोहोचवते, त्याचप्रमाणे ते दीर्घकालीन दाह आणि पेशींच्या वारंवार दुरुस्तीसाठी पोषक वातावरण तयार करते, ज्यामुळे कॅन्सर न्यूटेशनचा धोका वाढतो.

विशिष्ट औषधे : डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय मिळणाऱ्या काही वेदनाशामक औषधांच्या अतिवापरामुळे किडनीच्या कॅन्सरचा धोका वाढतो. फेनासेटिन सॉल्ट्ससारख्या घातक औषधांवर अनेक देशांमध्ये बंदी घालण्यात आली आहे. पण काही अभ्यासांनी ड्युरेटिक्स आणि इतर वेदनाशामक औषधांच्या हाय डोसचा संबंध़देखील किडनीच्या कॅन्सरशी जोडला आहे.

लिंग आणि वंश – पुरुषांना स्त्रियांपेक्षा किडनी कॅन्सरचा धोका अंदाजे दुप्पट असतो. त्याची कारणे पूर्णपणे स्पष्ट नाहीत; परंतु त्यात हार्मोन्समधील फरक, धूम्रपानाची सवय आणि व्यावसायिक संपर्क यांचा समावेश असू शकतो.

किडनीचा कर्करोग टाळण्यासाठी काय करता येईल?

१) तंबाखूचे सेवन पूर्णपणे बंद करा.
२) वजन नियंत्रणात ठेवा. आपला बीएमआय (BMI) नॉर्मल रेंजमध्ये (१८.५–२४.९) ठेवा.
३) फळे, भाज्या, कडधान्य कमी प्रमाणात खा. तसेच चिकन, मटण, मासेही योग्य प्रमाणात घ्या.
४) डॉक्टरांच्या मदतीने रक्तदाब नियंत्रणात ठेवा.
५) काम करताना योग्य खबरदारी आणि काळजी घ्या.
६) पुरेसे पाणी पिऊन शरीर हायड्रेट ठेवा.
७) डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय पेन किलर गोळ्या घेऊ नका.
८) तुमचा कौटुंबिक इतिहास समजून घ्या आणि धोका कमी करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

तुम्ही वय, लिंग आणि कौटुंबिक इतिहास यांसारखे धोक्याचे घटक बदलू शकत नाही; परंतु जीवनशैलीत काही बदल करून, तुम्ही किडनी कॅन्सरचा धोका कमी करू शकता.