‘कर्क’विश्व : पोटाचा कर्करोग

कर्करोगाच्या प्रादुर्भावामध्ये पोटाचा (जठराचा) कर्करोग जगात चौथ्या क्रमांकावर आहे. जगभरामध्ये आज अमेरिका किवा युरोप खंडापेक्षा आशियामध्ये हा कर्करोग अधिक प्रमाणता आढळतो.

डॉ. मनीष भंडारे

कर्करोगाच्या प्रादुर्भावामध्ये पोटाचा (जठराचा) कर्करोग जगात चौथ्या क्रमांकावर आहे. जगभरामध्ये आज अमेरिका किवा युरोप खंडापेक्षा आशियामध्ये हा कर्करोग अधिक प्रमाणता आढळतो. परंतु, पाश्चात्त्य देशांच्या तुलनेत भारतात याचे प्रमाण कमी आहे.

भारतात दरवर्षी ३४ हजार रुग्णांना जठरासंबंधी कर्करोगाची लागण आढळते. त्यामध्ये पुरुषांचे प्रमाण महिलांपेक्षा दुपटीने जास्त आहे. साधारणपणे जठरांचे विभाजन प्रॉक्सिमल (वरील भागाचा) आणि डिस्टल(खालचा भागाचा) या भागांमध्ये केले जाते आणि त्याचप्रमाणे जठराचा कर्करोग हा प्रॉक्सिमल (वरील भागाचा) आणि डिस्टल (खालचा भागाचा) कॅन्सरमध्ये विभागला जाऊ शकतो. डिस्टल भागाचा कॅन्सर हा अधिक सामान्य असला तरी, प्रॉक्सिमल कॅन्सरचे प्रमाण वाढत आहे. एकाच अवयवाचा घटक असूनदेखील, दोघांचे (प्रॉक्सिमल आणि डिस्टल कॅन्सर) कारण-विज्ञान, उपचार पद्धती आणि उत्तर्जीवित्व वेगवेगळे आहेत.

जठराचा कर्करोग उद्भवण्याची शक्यता खालील कारणामुळे असू शकते.

१) जीवाणू संसर्ग- एच. पायलोरी संसर्ग

ईबीव्ही संसर्ग

२)जीवनशैलीशी संबंधित : लोणचे, खारवलेले किंवा संरक्षित पदार्थाचे जास्त सेवन आणि फळे आणि भाज्यांचे कमी  सेवन

३) अतिवजन आणि लठ्ठपणा (overweight status and obesity).

४) व्यसन: तंबाखू, दारू

५) पूर्व-घातक स्थिती – गॅस्ट्रिक एडेनोमास किंवा डिसप्लेसिया आणि क्रॉनिक एट्रोफिक गॅस्ट्रिटिस.

जठरासंबंधी कर्करोग सूचित करणारी लक्षणे सामान्यत: विशिष्ट नसतात, परंतु त्यात खालील गोष्टीचा समावेश होतो.

  • अपचन, ’ वेदना,
  • उलटय़ा, हेमेटेमेसिस/मेलेना,
  • पोटामध्ये गाठ आढळणे,
  • वजन कमी होणे.

ही लक्षणे दोन ते तीन आठवडय़ांपेक्षा जास्त काळ टिकून राहणे हे चिंताजनक मानले जाते आणि त्याचे तज्ज्ञांमार्फत निदान करून घेणे अतिशय आवश्यक असते. पोटाच्या कर्करोगाची शंका असताना तज्ज्ञ तुम्हाला काही चाचण्या करायला सांगू शकतात, ज्याने निदान होते आणि कर्करोग कोणत्या टप्प्यात आहे हेदेखील स्पष्ट होते.

एन्डोस्कोपी आणि  बायोप्सी, सीटीस्कॅन व लेप्रोस्कोपी यांसह विविध चाचण्या आवश्यक असू शकतात. जठराच्या कर्करोगाच्या उपचारासाठी बहु-विषय तज्ज्ञांची टीम आवश्यक आहे. संभाव्यत: पहिल्या तीन टप्प्यांमधील या कर्करोगाच्या या रुग्णांवर आजार पूर्ण बरा करण्याच्या हेतूने उपचार केले जातात. या उपचारामध्ये अनेकदा शस्त्रक्रिया आणि केमोथेरपीचा समावेश होतो. कधीकधी, रेडिओथेरपीदेखील आवश्यक असते. चौथ्या टप्प्यातील कर्करोगामध्ये असलेल्या रुग्णांवर उपशामक केमोथेरपीने उपचार केले जातात ज्याचा उद्देश लक्षणे नियंत्रित करणे आणि आयुष्य वाढवणे असा आहे. परंतु कर्करोग पूर्ण बारा होण्याची संधी या टप्प्यामध्ये दुर्मीळ असते. अगदी सुरुवातीच्या अवस्थेत या निदान झाल्यास  योग्य उपचाराने पोटाच्या कर्करोगाचा रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकतो.

संकलन : डॉ. शैलेश श्रीखंडे

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Cancer world stomach cancer outbreak patients men women ysh

Next Story
सोप्या उपायांनी गाढ झोप शक्य
ताज्या बातम्या
फोटो गॅलरी