Fennel Milk Benefits: वाढता ताणतणाव आणि चुकीची जीवनशैली यांमुळे लोकांमध्ये निद्रानाशाची समस्या झपाट्याने वाढत आहे. अशा परिस्थितीत लोक वेळेवर झोपायला तर जातात; पण रात्रभर त्यांना झोप न लागण्याच्या म्हणजेच निद्रानाशाच्या समस्येला तोंड द्यावे लागते. निद्रानाशाची ही समस्या अनेक प्रकारचे आजारदेखील निर्माण करू शकते. अनेक जण झोप यावी यासाठी झोपेच्या गोळ्या घेतात; पण त्याऐवजी तुम्ही झोपण्यापूर्वी बडीशेपचे दूध प्या. कारण- गोळ्यांचा हळूहळू शरीरावर खूप नकारात्मक परिणाम होतो. अशा परिस्थितीत तुम्ही झोप येण्यासाठी रात्री नैसर्गिक उपायाचा अवलंब करू
शकता.
दूध आणि बडीशेपमध्ये काय असते?
खरं तर बडीशेपमध्ये मॅग्नेशियम, पोटेशियम आणि अनेक प्रकारचे अँटीऑक्सिडंट्स आढळतात, जे मेंदूला शांत करण्यास मदत करतात. त्याच वेळी दूधही झोप आणण्यास उपयुक्त ठरते. त्यामुळे तुम्ही दूध बडीशेप मिसळून पिऊ शकता.
बडीशेपचे दूध कसे बनवायचे?
बडीशेपचे दूध बनविण्यासाठी प्रथम एका पॅनमध्ये दूध ओता आणि त्यात एक चमचा बडीशेप घालून, तुम्ही ते मंद आचेवर ५-७ मिनिटे उकळवा. गोडवा आणण्यासाठी तुम्ही त्यात मध किंवा साखरदेखील टाकू शकता. झोपण्याआधी ३० मिनिटे आधी दूध पिणे खूप फायदेशीर आहे.
बडीशेपसह दूध पिण्याचे फायदे
बडीशेप टाकलेले दूध प्यायल्याने मन शांत होते, ज्यामुळे तणाव कमी होण्यास मदत होते. बडीशेपमिश्रित दुधाचे सेवन केल्याने झोपेची गुणवत्ता सुधारते. दिवसभराचा थकवा दूर होतो आणि पचनक्रियादेखील सुधारते.