Heart Can Stop Working Twice? नियमित धावणं, उत्तम फिटनेस आणि मोठ्या अंतराच्या शर्यती पूर्ण करण्याची क्षमता असूनही हृदयाशी संबंधित गंभीर धोका उद्भवू शकतो, याची धक्कादायक घटना पुण्यातील ६५ वर्षीय धावपटू संजय कदम यांच्या मृत्यूने पुन्हा समोर आणली आहे. सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या कदम यांनी सुमारे १७ किलोमीटर अंतर पूर्ण केल्यानंतर अचानक धावता धावता कोसळले.
कदम यांना उच्च रक्तदाबाचा त्रास होता, मात्र ते नियमित व्यायाम आणि प्रशिक्षण घेत होते. ही घटना केवळ एका धावपटूच्या मृत्यूची बातमी नाही, तर ‘मी फिट आहे, त्यामुळे मला हार्ट अटॅकचा धोका नाही’ हा समज किती धोकादायक ठरू शकतो याचा गंभीर इशारा आहे.
१७ किमी धावल्यानंतर नेमकं काय घडलं?
सातारा हिल हाफ मॅरेथॉनमध्ये २१.१ किलोमीटरचे अंतर पूर्ण करण्याच्या काही अंतर आधीच संजय कदम अचानक कोसळले. शर्यतीत सहभागी असलेले हृदयरोगतज्ज्ञ डॉ. रियाज मुजावर यांनी तातडीने CPR सुरू केले. त्यानंतर कदम यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले.
वैद्यकीय तपासणीत त्यांच्या हृदयाच्या एका प्रमुख रक्तवाहिनीत मोठा अडथळा असल्याचे आढळल्याचे सांगण्यात आले. डॉक्टरांनी अँजिओप्लास्टी करून रक्तवाहिनीतील अडथळा दूर केला. त्यानंतर त्यांची प्रकृती काही काळ स्थिर झाली. मात्र काही तासांनंतर त्यांना पुन्हा गंभीर कार्डियाक अरेस्ट आला आणि त्यांचा मृत्यू झाला. यामुळे एक महत्त्वाचा प्रश्न निर्माण होतो की ब्लॉक झालेली रक्तवाहिनी उघडूनही हृदय पुन्हा कसं थांबू शकतं?
हार्ट अटॅक आणि कार्डियाक अरेस्ट एकच आहेत का?
नाही. दोन्ही वेगळ्या वैद्यकीय समस्या आहेत, मात्र त्यांचा एकमेकांशी जवळचा संबंध असू शकतो. हार्ट अटॅक म्हणजे मुख्यतः ‘ब्लड फ्लो’ची समस्या. हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या कोरोनरी रक्तवाहिनीमध्ये अडथळा निर्माण झाल्यास हृदयाच्या काही भागाला पुरेसा ऑक्सिजन मिळत नाही. तर कार्डियाक अरेस्ट ही प्रामुख्याने हृदयाच्या विद्युत प्रणालीशी संबंधित समस्या आहे. हृदयाची लय इतकी बिघडते की ते प्रभावीपणे रक्त पंप करू शकत नाही. व्यक्ती अचानक बेशुद्ध पडते आणि काही मिनिटांत जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. मात्र हार्ट अटॅकमुळे हृदयाच्या स्नायूला नुकसान होऊन त्याची विद्युत स्थिरता बिघडू शकते. परिणामी धोकादायक हृदयाची लय निर्माण होऊन कार्डियाक अरेस्ट येऊ शकतो.
अँजिओप्लास्टीनंतरही कार्डियाक अरेस्ट का होऊ शकतो?
ही बाब समजून घेणं अत्यंत महत्त्वाचं आहे. अँजिओप्लास्टी किंवा स्टेंटच्या माध्यमातून बंद झालेली रक्तवाहिनी पुन्हा खुली केली जाऊ शकते. त्यामुळे हृदयाकडे रक्तप्रवाह सुधारतो. पण रक्तवाहिनी उघडली म्हणजे हृदय लगेच पूर्णपणे पूर्ववत होतं असं नाही. मोठ्या हार्ट अटॅक किंवा कार्डियाक अरेस्टदरम्यान हृदयाच्या स्नायूला आधीच नुकसान झालेलं असू शकतं. काही काळ रक्त आणि ऑक्सिजनचा पुरवठा कमी झाल्यामुळे हृदयाची पंपिंग क्षमता कमी होऊ शकते.
याशिवाय हृदयाची विद्युत प्रणाली काही काळ अस्थिर राहू शकते. त्यामुळे रक्तप्रवाह सुधारल्यानंतरही धोकादायक अनियमित हृदयाची लय निर्माण होऊन पुन्हा कार्डियाक अरेस्टचा धोका असू शकतो. याच कारणामुळे मोठ्या हार्ट अटॅकच्या घटनेनंतर अँजिओप्लास्टी झालेल्या रुग्णाला सुरुवातीच्या काळात अत्यंत बारकाईने निरीक्षणाखाली ठेवले जाते.
‘मी रोज धावतो, मग मला हार्ट अटॅक कसा येईल?’
हा प्रश्न अनेक धावपटू आणि फिटनेस करणाऱ्या व्यक्तींना पडतो. नियमित व्यायाम हा हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मात्र फिट दिसणं आणि कोरोनरी रक्तवाहिन्या पूर्णपणे निरोगी असणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत.
एखादी व्यक्ती उत्तम endurance असलेली धावपटू असू शकते, पण तिच्या हृदयाच्या रक्तवाहिनीत मोठ्या प्रमाणात अरुंदता किंवा ब्लॉकेज असू शकतं. वय वाढल्यानंतर उच्च रक्तदाब, वाढलेले कोलेस्टेरॉल, मधुमेह, धूम्रपान, कौटुंबिक इतिहास आणि इतर हार्ट अटॅकचे जोखमीचे घटक याकडे दुर्लक्ष केल्यास धोका वाढू शकतो.
उच्च रक्तदाबामुळे धोका कसा वाढतो?
उच्च रक्तदाब असल्याने व्यायाम करणं चुकीचं नाही. उलट, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार नियमित शारीरिक हालचाल रक्तदाब आणि हृदयाच्या आरोग्यासाठी उपयुक्त ठरू शकते. पण वर्षानुवर्षे नियंत्रणात नसलेला उच्च रक्तदाब रक्तवाहिन्यांवर अतिरिक्त ताण निर्माण करू शकतो. त्यामुळे रक्तवाहिन्यांच्या भिंतींमध्ये बदल होऊन प्लाक जमा होण्यास हातभार लागू शकतो. म्हणूनच ‘मी व्यायाम करतो’ एवढ्यावर हार्ट अटॅकचा धोका पूर्णपणे नाकारता येत नाही.
हाफ मॅरेथॉनसारख्या लांब शर्यतीत धोका का वाढू शकतो?
लांब अंतराची धावण्याची शर्यत शरीरासाठी मोठा शारीरिक ताण असतो.
धावताना —
- हृदयाची गती वाढते
- रक्तदाब वाढतो
- हृदयाला अधिक ऑक्सिजनची गरज भासते
- दीर्घकाळ हृदयावर अतिरिक्त कामाचा ताण असतो
जर कोरोनरी रक्तवाहिनीत आधीपासून गंभीररित्या अरुंद किंवा ब्लॉकेज असेल, तर काही परिस्थितींमध्ये हृदयाला लागणाऱ्या ऑक्सिजनची गरज आणि मिळणारा ऑक्सिजन यांच्यात तफावत निर्माण होऊ शकते. अचानक व्यायामाची तीव्रता वाढवणे किंवा पुरेसं प्रशिक्षण नसताना लांब पल्ल्याची शर्यत धावणे टाळणे महत्त्वाचे आहे.
धावताना ‘ही’ लक्षणं दिसली तर थांबा!
हृदयाचा त्रास नेहमीच तीव्र छातीत दुखण्याच्या स्वरूपात समोर येतो असं नाही. धावताना किंवा व्यायाम करताना खालीलपैकी कोणतंही लक्षण नवीन किंवा असामान्य स्वरूपात जाणवल्यास ते दुर्लक्षित करू नका. छातीत दडपण किंवा घट्टपणा, श्वास घेण्यास त्रास, अचानक असह्य थकवा, चक्कर येणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे, बेशुद्ध पडणे किंवा पडण्यासारखे वाटणे, हृदयाची धडधड अनियमित किंवा खूप वेगाने जाणवणे. तसंच वेदना किंवा अस्वस्थता हात, खांदा, पाठ, मान किंवा जबड्याकडे पसरत असल्यास विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. आधीच्या तुलनेत व्यायाम करण्याची क्षमता अचानक कमी होणे हेदेखील दुर्लक्ष करण्यासारखं लक्षण नाही.
‘फिटनेस’पेक्षा महत्त्वाचं आहे हृदयाचं आरोग्य
या घटनेतून धावपटूंसाठी एक महत्त्वाचा धडा मिळतो तो म्हणजे फिटनेस चांगला असला तरी हृदयाच्या जोखमीचे घटक तपासणे गरजेचे आहे. वय वाढत असताना रक्तदाब, कोलेस्टेरॉल, रक्तातील साखर आणि इतर हृदयविकाराच्या जोखमींचे डॉक्टरांकडून मूल्यांकन करून घेणे फायदेशीर ठरते. नवीन किंवा तीव्र लक्षणं जाणवत असतील किंवा अचानक धावण्याचं अंतर व intensity मोठ्या प्रमाणात वाढवणार असाल, तर डॉक्टरांचा सल्ला घेणं अधिक सुरक्षित ठरू शकतं.
कार्डियाक अरेस्टच्या वेळी पहिली काही मिनिटं अत्यंत महत्त्वाची
कार्डियाक अरेस्ट झालेल्या व्यक्तीला तातडीने मदत मिळणं अत्यंत महत्त्वाचं असतं. CPR, तातडीची वैद्यकीय मदत आणि गरज असल्यास डिफिब्रिलेशन यामुळे जीव वाचण्याची शक्यता वाढू शकते. संजय कदम यांच्या घटनेत शर्यतीदरम्यान उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी तातडीने CPR सुरू केल्याने त्यांना रुग्णालयापर्यंत पोहोचवता आलं. मात्र पहिला कार्डियाक अरेस्ट यशस्वीपणे हाताळला तरी संकट पूर्णपणे टळलेलं असतंच असं नाही. अँजिओप्लास्टीने बंद रक्तवाहिनी उघडता येते; पण हृदयाला झालेलं नुकसान, त्याची पंपिंग क्षमता आणि विद्युत स्थिरता यांचे स्वतंत्रपणे निरीक्षण करावे लागते.
