45-Year-Old Doctor Dies of Cardiac Arrest; Don’t Ignore These 5 Warning Signs: अचानक छातीत दुखू लागलं, काही क्षणांतच प्रकृती बिघडली आणि त्यानंतर जे घडले, त्यामुळे वैद्यकीय क्षेत्रासह सर्वसामान्यांनाही विचार करायला भाग पाडले. निरोगी दिसणाऱ्या आणि इतरांचे प्राण वाचवणाऱ्या डॉक्टरांनाही हृदयविकाराचा झटका किंवा कार्डिअॅक अरेस्टचा धोका का वाढतो आहे, हा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

एका नामांकित हृदयरोगतज्ज्ञाचा वयाच्या अवघ्या ४५ व्या वर्षी कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे मृत्यू झाल्याची घटना समोर आल्यानंतर तज्ज्ञांनी त्यामागील कारणांवर सविस्तर भाष्य केले आहे. दिवसभर रुग्णांवर उपचार करून घरी परतल्यानंतर त्यांना रात्री छातीत वेदना जाणवू लागल्या. ते बाथरूमकडे गेले; मात्र काही क्षणांतच ते बेशुद्ध पडले. त्यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. जवळपास तीन तास सीपीआर देऊनही त्यांना वाचवता आले नाही.

हरियाणातील रोहतक येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ डॉ. आदित्य बत्रा यांचे कार्डिअ‍ॅक अरेस्टमुळे निधन झाल्याची घटना समोर आली आहे. वयाच्या अवघ्या ४५ व्या वर्षी झालेल्या या निधनामुळे डॉक्टरांसह तरुणांमध्ये वाढणाऱ्या हृदयविकाराच्या धोक्याबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाले आहेत. या घटनेनंतर एक महत्त्वाचा प्रश्न समोर आला आहे. हृदयविकाराची लक्षणे ओळखणारे आणि रुग्णांवर उपचार करणारे डॉक्टर स्वतःच अशा धोक्याला का बळी पडत आहेत?

हृदयरोग तज्ज्ञ डॉ. रंजन शेट्टी यांच्या मते, यामागे एखादे एकच कारण नसून, अनेक गोष्टींचा एकत्रित परिणाम असतो. सततचा मानसिक ताण, अपुरी झोप, दीर्घकाळ चालणारे कामाचे तास, अनियमित आहार, थकवा आणि स्वतःच्या आरोग्याकडे होणारे दुर्लक्ष ही त्यामागची प्रमुख कारणे मानली जातात.

डॉक्टरांना अनेकदा सलग २४ ते ३६ तास काम करावे लागते. अशा वेळी जेवण वेळेवर होत नाही, झोप पूर्ण होत नाही आणि सतत तणावाखाली निर्णय घ्यावे लागतात. या सर्वांचा परिणाम शरीरावर हळूहळू होऊ लागतो. ताण वाढल्यामुळे शरीरात दाह निर्माण होतो, रक्तदाब वाढू शकतो आणि हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साचण्याची प्रक्रिया वेगाने सुरू होऊ शकते.

विशेष म्हणजे अनेक डॉक्टर स्वतःमध्ये दिसणारी सुरुवातीची लक्षणेही दुर्लक्षित करतात. छातीत किरकोळ दुखणे, सतत थकवा जाणवणे, मळमळ, हृदयाची धडधड वाढणे किंवा चक्कर येणे यांसारख्या तक्रारी केवळ कामाच्या ताणामुळे असतील, असे समजून त्याकडे दुर्लक्ष केले जाते. मात्र, हीच लक्षणे काही वेळा गंभीर हृदयविकाराची सुरुवातही असू शकतात.

तज्ज्ञ सांगतात की, नियमित व्यायाम करणाऱ्या किंवा बाहेरून पूर्णपणे तंदुरुस्त दिसणाऱ्या व्यक्तीलाही हृदयविकाराचा धोका असू शकतो. कारण- केवळ व्यायाम पुरेसा नसतो. कुटुंबात हृदयविकाराचा इतिहास, मधुमेह, उच्च रक्तदाब, सततचा ताण, अपुरी झोप आणि दिवसभर बसून काम करण्याची सवय यांचाही धोका वाढवण्यात मोठा वाटा असतो.

त्याचबरोबर हार्ट अटॅक आणि कार्डिअ‍ॅक अरेस्ट यांतील फरक समजून घेणेदेखील महत्त्वाचे आहे. हार्ट अटॅकमध्ये हृदयाकडे जाणारा रक्तपुरवठा अडथळ्यामुळे कमी होतो. तर कार्डिअ‍ॅक अरेस्टमध्ये हृदयाची विद्युत यंत्रणा अचानक बिघडते आणि हृदय प्रभावीपणे धडधडणे थांबवते. काही गंभीर हार्ट अटॅकनंतर कार्डिअ‍ॅक अरेस्ट होऊ शकतो.

अशा वेळी तातडीने सीपीआर आणि आवश्यक असल्यास डिफिब्रिलेटरचा वापर केल्यास रुग्णाचा जीव वाचण्याची शक्यता वाढते; मात्र प्रत्येक मिनीट अत्यंत महत्त्वाचे असते.

तज्ज्ञांच्या मते, डॉक्टरांसह प्रत्येकाने आपल्या आरोग्याला प्राधान्य देणे आवश्यक आहे. पुरेशी झोप, नियमित आरोग्य तपासणी, संतुलित आहार, ताण वाढू न देणे आणि शरीराकडून मिळणाऱ्या इशाऱ्यांकडे दुर्लक्ष न करणे ही काळाची गरज आहे. सतत काम करणे ही अभिमानाची गोष्ट नसून, आरोग्याची योग्य ती काळजी घेणे हेच दीर्घ आणि आरोग्यदायी आयुष्याचे खरे गमक असल्याचे तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे.