Natural Remedies for Constipation: रोज सकाळी शौचाला जाऊनही पोट पूर्णपणे साफ न झाल्यासारखे वाटते. काही जणांना अनेक दिवस शौचास होत नाही, तर काहींना मल कठीण होणे, पोट फुगणे, गॅस आणि अस्वस्थपणाचा त्रास जाणवतो. बदललेली जीवनशैली, अनियमित आहार, पुरेसे पाणी न पिणे, आहारात तंतुमय पदार्थांची कमतरता आणि शारीरिक हालचाल कमी होणे यांमुळे बद्धकोष्ठतेची समस्या वाढू शकते.
पोट साफ होत नसल्यामुळे दिवसभर जडपणा जाणवतो. त्यासोबत पोट फुगणे, गॅस, भूक मंदावणे किंवा अस्वस्थ वाटणे अशा तक्रारींचाही त्रास होऊ शकतो. त्यामुळे अनेक जण घरच्या घरी विविध उपाय करून पाहतात. असाच एक पारंपरिक उपाय म्हणजे रात्री कोमट दुधासोबत एका नैसर्गिक रेचक पदार्थाचे सेवन. मात्र, हा उपाय प्रत्येकासाठी योग्य असेलच, असे नाही.
आतड्यांची हालचाल वाढवण्यास होऊ शकते मदत
आरोग्यविषयक माहितीनुसार, एरंडेल तेलाचा (Castor Oil) उपयोग नैसर्गिक रेचक म्हणून केला जातो. त्यातील रिकिनोलेइक आम्ल आतड्यांच्या हालचालींना चालना देऊ शकते. त्यामुळे मल आतड्यांमधून पुढे जाण्यास मदत होऊन, शौचाला होण्याची प्रक्रिया सुलभ होऊ शकते.
म्हणूनच अधूनमधून होणाऱ्या बद्धकोष्ठतेच्या त्रासावर उपाय म्हणून एरंडेल तेलाचा वापर केला जातो. काही लोक ते कोमट दुधासोबत घेण्याची पद्धत वापरतात. एरंडेल तेलाचा वापर केल्यास बद्धकोष्ठता असणाऱ्या प्रत्येकाचे सकाळपर्यंत पोट पूर्णपणे साफ होईल.
रात्री घेण्यापूर्वी ही काळजी घ्या
एरंडेल तेलाचा वापर करताना ते योग्य प्रमाणात घेतले जाईल याची काळजी घेणे महत्त्वाचे आहे. कारण- अधिक प्रमाणात घेतल्यास जुलाब, पोटात मुरडा, पोटदुखी, मळमळ किंवा शरीरातील पाणी कमी होणे यांसारख्या त्रासांना तोंड द्यावे लागू शकते. त्यामुळे केवळ पोट साफ करण्यासाठी वारंवार किंवा दीर्घकाळ याचा वापर करणे योग्य नाही.
विशेषतः गर्भवती महिला, लहान मुले आणि पोटाशी संबंधित गंभीर समस्या असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय असा उपाय करू नये. पोटदुखीचे नेमके कारण माहीत नसताना रेचक पदार्थ घेणेही टाळावे.
पोट साफ ठेवण्यासाठी रोजच्या सवयी महत्त्वाच्या
बद्धकोष्ठतेपासून आराम मिळविण्यासाठी केवळ एखाद्या घरगुती उपायावर अवलंबून राहणे योग्य नाही. दिवसभर पुरेसे पाणी पिणे, आहारात फळे, भाज्या, कडधान्ये, सलाड आणि इतर तंतुमय पदार्थांचा समावेश करणे महत्त्वाचे आहे. नियमित चालणे किंवा व्यायाम केल्यानेही आतड्यांची हालचाल सुरळीत राहण्यास मदत होऊ शकते.
शौचाची इच्छा होत असताना ती वारंवार दाबून ठेवणे टाळावे. आहार आणि जीवनशैलीत बदल करूनही बद्धकोष्ठतेची समस्या कायम राहत असेल, वारंवार तो त्रास होत असेल किंवा त्यासोबत तीव्र पोटदुखी, उलट्या, रक्तस्राव, वजन कमी होणे यांसारखी लक्षणे दिसत असतील, तर घरगुती उपाय करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
