Cataract Symptoms & Eye Care: वय वाढत असताना डोळ्यांच्या आरोग्याशी संबंधित अनेक समस्या जाणवू लागतात. त्यापैकी मोतीबिंदू (Cataract) ही एक सामान्य समस्या आहे. मात्र, सुरुवातीला याची लक्षणं सौम्य असल्याने अनेकजण त्याकडे दुर्लक्ष करतात. हळूहळू दृष्टी धूसर होऊ लागते आणि रोजच्या कामांवरही त्याचा परिणाम जाणवू लागतो. डोळ्याच्या बाहुलीच्या मागे एक नैसर्गिक पारदर्शक लेन्स असतो. या लेन्सचं काम प्रकाशकिरणांना रेटिनावर योग्य प्रकारे केंद्रित करणं, जेणेकरून आपल्याला स्पष्ट दिसू शकेल. मात्र, या लेन्समध्ये हळूहळू धुरकटपणा निर्माण झाला की त्याला मोतीबिंदू म्हणतात. दिल्लीतील नेत्रतज्ज्ञ डॉ. राजेश सिन्हा यांनी मोतीबिंदूची लक्षणं, कारणं आणि उपचारांबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे.
मोतीबिंदूची सुरुवातीची लक्षणं कोणती?
मोतीबिंदू सहसा अचानक होत नाही. तो हळूहळू वाढतो आणि सुरुवातीला वेदनाही होत नाहीत. त्यामुळे अनेकांना बराच काळ समस्या लक्षात येत नाही. मोतीबिंदू झाल्यास अशी लक्षणं जाणवू शकतात…
- वस्तू धूसर किंवा धुक्यातून पाहिल्यासारख्या दिसणे
- रात्रीच्या वेळी स्पष्ट दिसण्यात अडचण येणे
- वाहन चालवताना हेडलाइट किंवा तेजस्वी प्रकाशाचा जास्त त्रास होणे
- डोळ्यांसमोर धुकट काच असल्यासारखं वाटणे
- दृष्टी हळूहळू कमी होणे
- चष्म्याचा नंबर वारंवार बदलण्याची गरज भासणे
मोतीबिंदू होण्याचं मुख्य कारण काय?
वाढतं वय हे मोतीबिंदूचं सर्वात सामान्य कारण आहे. वयानुसार डोळ्यातील नैसर्गिक लेन्समधील प्रथिनांमध्ये बदल होतात. त्यामुळे लेन्सची पारदर्शकता कमी होऊन तो धुरकट होऊ लागतो. याशिवाय काही घटकांमुळेही मोतीबिंदूचा धोका वाढू शकतो. यामध्ये दीर्घकाळ सूर्यप्रकाशातील यूव्ही किरणांचा संपर्क, मधुमेह, धूम्रपान, दीर्घकाळ स्टेरॉइड्सचा वापर आणि डोळ्याला झालेली दुखापत यांचा समावेश होतो.
मोतीबिंदू गंभीर होऊ शकतो का?
सुरुवातीच्या टप्प्यात मोतीबिंदूमुळे फक्त दृष्टी धूसर होण्यासारखी समस्या जाणवू शकते. मात्र, त्याकडे दीर्घकाळ दुर्लक्ष केल्यास दृष्टी मोठ्या प्रमाणात कमी होऊ शकते. मोतीबिंदू खूप वाढल्यास काही प्रकरणांमध्ये लेंस-इंड्यूस्ड ग्लॉकोमासारखी गुंतागुंत होऊ शकते. यामुळे ऑप्टिक नर्व्हवर परिणाम होऊन कायमस्वरूपी दृष्टी कमी होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
औषधांच्या मदतीने मोतीबिंदू बरा होतो का?
हा प्रश्न अनेकांना पडतो. सुरुवातीला चष्म्यामुळे धूसर दिसण्याची समस्या काही प्रमाणात कमी होऊ शकते. मात्र, मोतीबिंदू पूर्णपणे विरघळवणारी कोणतीही औषधं किंवा आय ड्रॉप्स उपलब्ध नाहीत. जेव्हा मोतीबिंदूमुळे वाचन, टीव्ही पाहणे, वाहन चालवणे किंवा इतर दैनंदिन कामांवर परिणाम होऊ लागतो, तेव्हा डॉक्टर सर्जरीचा सल्ला देऊ शकतात.
मोतीबिंदूची सर्जरी कशी केली जाते?
मोतीबिंदूची सर्जरी ही आजच्या काळातील मोठ्या प्रमाणावर केली जाणारी प्रक्रिया आहे. ही साधारणपणे डे-केअर प्रक्रिया असते. सर्जरीदरम्यान डोळ्यातील धुरकट झालेला नैसर्गिक लेन्स काढून त्याच्या जागी कृत्रिम इंट्राओक्युलर लेन्स (IOL) बसवला जातो. बहुतांश रुग्णांना सर्जरीनंतर काही दिवसांत दृष्टीमध्ये सुधारणा जाणवू लागते. तुमच्यासाठी कोणता कृत्रिम लेन्स योग्य आहे, हे डॉक्टर डोळ्यांची तपासणी, दृष्टीची गरज आणि इतर घटकांचा विचार करून ठरवतात.
सर्जरीनंतर मोतीबिंदू पुन्हा होतो का?
हा गैरसमज अनेकांच्या मनात असतो. सर्जरीमध्ये नैसर्गिक धुरकट लेन्स काढून त्याजागी कृत्रिम लेन्स बसवला जात असल्याने कृत्रिम लेन्समध्ये पुन्हा मोतीबिंदू होत नाही. मात्र, काही रुग्णांमध्ये कृत्रिम लेन्सच्या मागील बाजूस असलेली पातळ झिल्ली धुरकट होऊ शकते. याला Posterior Capsular Opacification (PCO) म्हणतात.ही समस्या मोतीबिंदू पुन्हा झाल्यामुळे होत नाही. PCO साठी YAG लेसर कॅप्सुलोटॉमीसारखी सोपी लेसर प्रक्रिया केली जाऊ शकते.
मोतीबिंदू अनुवंशिक असतो का?
काही प्रकरणांमध्ये कौटुंबिक इतिहासामुळे मोतीबिंदूचा धोका वाढू शकतो. विशेषतः कुटुंबातील सदस्यांना कमी वयात मोतीबिंदू झालेला असल्यास नियमित डोळ्यांची तपासणी करून घेणं महत्त्वाचं आहे.
दृष्टी धूसर होणे, रात्री स्पष्ट न दिसणे किंवा प्रकाशाचा जास्त त्रास होणे यासारखी लक्षणं जाणवत असतील तर त्याकडे केवळ वयाचा परिणाम म्हणून दुर्लक्ष करू नका. नेत्रतज्ज्ञांकडून तपासणी करून घेणं हा योग्य मार्ग आहे. मोतीबिंदू आहे की दृष्टी कमी होण्यामागे दुसरं कारण आहे, हे तपासणीनंतरच स्पष्ट होऊ शकतं.
