Constipation Causes & Symptoms: अनेकांना बद्धकोष्ठतेचा (Constipation) त्रास जाणवला की सर्वप्रथम पाणी कमी प्यायल्यामुळे असे झाले असावे, असे वाटते. शरीरात पाण्याची कमतरता असल्यास मल कोरडा आणि कठीण होऊन शौचास त्रास होऊ शकतो, हे खरे आहे. मात्र, बद्धकोष्ठतेमागे केवळ पाणी कमी पिणे हे एकमेव कारण नाही. आपल्या रोजच्या काही सवयी, चुकीचा आहार, शारीरिक हालचालींचा अभाव आणि काही गंभीर आजारांमुळेही हा त्रास होऊ शकतो. विशेष म्हणजे, काही प्रकारच्या कर्करोगांमध्येही बद्धकोष्ठता हे लक्षण दिसू शकते. त्यामुळे वारंवार पोट साफ होत नसेल तर त्याकडे दुर्लक्ष करणे महागात पडू शकते.
नेमकी बद्धकोष्ठतेची समस्या म्हणजे काय?
NIDDK (National Institute of Diabetes and Digestive and Kidney Diseases) च्या माहितीनुसार, मोठ्या आतड्यातून मल पुढे जाण्याची प्रक्रिया मंदावते, तेव्हा बद्धकोष्ठतेचा त्रास होतो. मल मोठ्या आतड्यात जितका जास्त वेळ राहतो, तितके त्यातील पाणी शोषले जाते. त्यामुळे मल कोरडा, कठीण आणि घट्ट होतो. परिणामी शौचास बसल्यानंतर मल बाहेर काढताना त्रास होतो.
बद्धकोष्ठतेची प्रमुख लक्षणे कोणती?
- आठवड्यातून तीनपेक्षा कमी वेळा शौचाला होणे.
- मल कठीण, कोरडा किंवा गाठींसारखा होणे.
- शौचाच्या वेळी जोर लावावा लागणे.
- शौच करताना वेदना किंवा त्रास होणे.
- पोट साफ न झाल्यासारखे सतत वाटणे.
ही लक्षणे वारंवार जाणवत असतील, तर स्वतःहून औषधे घेण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.
केवळ पाणी कमी पिणेच नाही, ‘या’ सवयीही ठरतात बद्धकोष्ठतेसाठी कारणीभूत!
बद्धकोष्ठतेचा त्रास होण्यामागे आहार आणि जीवनशैलीशी संबंधित अनेक कारणे असू शकतात. त्यापैकी काही कारणे पुढीलप्रमाणे आहेत.
१. आहारात फायबरचे प्रमाण कमी असणे
फळे, भाज्या, कडधान्ये आणि संपूर्ण धान्यांमधून शरीराला फायबर मिळते. फायबरमुळे मलाचे प्रमाण वाढण्यास आणि तो मऊ राहण्यास मदत होते. मात्र, रोजच्या आहारात फायबरयुक्त पदार्थ कमी असतील, तर बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.
२. पुरेसे पाणी किंवा द्रवपदार्थ न पिणे
शरीराला आवश्यक तेवढे पाणी न मिळाल्यास मोठे आतडे मलामधील अधिक पाणी शोषून घेते. त्यामुळे मल कोरडा आणि कठीण होतो. यामुळे शौचास त्रास होऊ शकतो.
३. शारीरिक हालचालींचा अभाव
दिवसभर एकाच जागी बसून काम करणे, चालण्याचा व्यायाम न करणे किंवा शारीरिक हालचाली कमी असणे यामुळेही आतड्यांच्या हालचाली मंदावू शकतात.
४. शौचाला जाण्याची इच्छा दाबून ठेवणे
कामाच्या गडबडीत किंवा प्रवासात अनेकजण शौचाला जाण्याची इच्छा असूनही ती दाबून ठेवतात. असे वारंवार केल्यास शौचाची नैसर्गिक प्रक्रिया बिघडू शकते आणि बद्धकोष्ठतेचा त्रास वाढू शकतो.
५. जेवणाच्या वेळा निश्चित नसणे
रोज वेगवेगळ्या वेळी जेवणे, जेवण टाळणे आणि अनियमित दिनचर्या यांचाही पचनसंस्थेच्या कार्यावर परिणाम होऊ शकतो.
काही गंभीर आजारांमुळेही होऊ शकतो बद्धकोष्ठतेचा त्रास
बद्धकोष्ठता होण्यामागे केवळ चुकीच्या सवयी जबाबदार नसतात. काही आरोग्यविषयक समस्यांमुळेही हा त्रास उद्भवू शकतो. यामध्ये पुढील आजारांचा समावेश होतो.
- थायरॉईडचा त्रास: हायपोथायरॉईडिझममुळे शरीरातील चयापचयाची प्रक्रिया मंदावते. त्यामुळे बद्धकोष्ठता होऊ शकते.
- मधुमेह: मधुमेहामुळे काही रुग्णांमध्ये मज्जासंस्थेवर परिणाम होऊन आतड्यांच्या हालचालींमध्ये अडथळा येऊ शकतो.
- पार्किन्सन्सचा आजार: मेंदू आणि मज्जासंस्थेवर परिणाम करणाऱ्या या आजारामुळेही बद्धकोष्ठता होऊ शकते.
- सीलिएक आजार: ग्लूटेनमुळे लहान आतड्याला त्रास होणाऱ्या या आजारात काही रुग्णांना बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवू शकतो.
- पचनसंस्थेतील सूज: डायव्हर्टिक्युलर डिसीज किंवा प्रोक्टायटिससारख्या समस्यांमुळेही शौचाच्या प्रक्रियेत अडथळे येऊ शकतात.
याशिवाय काही औषधांचे दुष्परिणाम, आतड्यांमधील अडथळे आणि मेंदू किंवा पाठीच्या कण्याला झालेल्या दुखापतींमुळेही बद्धकोष्ठता होऊ शकते.
बद्धकोष्ठतेचा कॅन्सरशीही असू शकतो संबंध?
हा मुद्दा समजून घेणे महत्त्वाचे आहे. National Cancer Institute (NCI) च्या माहितीनुसार, काही प्रकारच्या कर्करोगांमध्ये बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवू शकतो.
यामध्ये प्रामुख्याने पुढील कर्करोगांचा समावेश होतो.
- कोलन कॅन्सर (मोठ्या आतड्याचा कर्करोग)
- रेक्टल कॅन्सर (मलाशयाचा कर्करोग)
- ओव्हेरियन कॅन्सर (अंडाशयाचा कर्करोग)
- ब्रेन ट्यूमर (मेंदूतील गाठ)
इतकेच नाही, तर कर्करोगावरील उपचारांदरम्यान दिल्या जाणाऱ्या काही औषधांमुळे आणि केमोथेरपीमुळेही बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ शकतो.
मात्र, याचा अर्थ बद्धकोष्ठता झाली म्हणजे कॅन्सरच झाला असे नाही. बद्धकोष्ठता ही अनेकदा सामान्य कारणांमुळेही होते. परंतु अचानक शौचाच्या सवयींमध्ये बदल होणे, मलातून रक्त येणे, विनाकारण वजन कमी होणे, सतत पोटदुखी किंवा अशक्तपणा जाणवणे अशी लक्षणे दिसल्यास तातडीने डॉक्टरांकडून तपासणी करून घ्यावी.
बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी काय करावे?
रोजच्या दिनचर्येत काही बदल केल्यास बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होण्यास मदत मिळू शकते. NCI नुसार, पुढील गोष्टींकडे लक्ष द्यावे.
१. दिवसभर पुरेसे पाणी प्या
दिवसभर शरीराला आवश्यक तेवढे पाणी आणि इतर द्रवपदार्थ प्या. साधारण आठ कप द्रवपदार्थ घेण्याचा सल्ला दिला जातो; मात्र शरीराची गरज, हवामान आणि आरोग्यस्थितीनुसार हे प्रमाण बदलू शकते. डॉक्टरांनी द्रवपदार्थांवर मर्यादा घातली असल्यास त्यांचाच सल्ला पाळावा.
२. फायबरयुक्त पदार्थ खा
आहारात पालेभाज्या, फळे, ओट्स, कडधान्ये आणि संपूर्ण धान्यांचा समावेश करा. फायबरचे प्रमाण आहारात हळूहळू वाढवा आणि त्यासोबत पुरेसे पाणी प्या.
३. दररोज चालण्याचा व्यायाम करा
चालणे, सायकल चालवणे आणि योगासने यांसारख्या हलक्या व्यायामांमुळे शरीर सक्रिय राहते. त्यामुळे आतड्यांच्या हालचालींनाही मदत होऊ शकते.
४. जेवणाच्या वेळा निश्चित ठेवा
दररोज ठराविक वेळी जेवण्याची सवय लावा. नियमित दिनचर्येमुळे शौचाची नैसर्गिक प्रक्रिया सुरळीत होण्यास मदत होऊ शकते.
५. शौचाला जाण्याची इच्छा दाबू नका
शौचाला जाण्याची इच्छा झाल्यास ती टाळू नका. दररोज ठरावीक वेळी शौचालयात जाण्याची सवय लावण्याचाही फायदा होऊ शकतो.
कधी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे?
बद्धकोष्ठतेचा त्रास काही दिवसांपुरता असेल, तर आहार आणि जीवनशैलीतील बदलांनी आराम मिळू शकतो. मात्र, वारंवार बद्धकोष्ठता होत असेल, त्रास दीर्घकाळ टिकत असेल किंवा त्यासोबत रक्तस्राव, तीव्र पोटदुखी, उलट्या, पोट खूप फुगणे किंवा विनाकारण वजन कमी होणे अशी लक्षणे दिसत असतील, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
