Causes Of Drooling At Night : झोपताना तोंडातून लाळ वाहणे किंवा सकाळी उठल्यावर उशीवर लाळ लागलेली दिसणे अगदी सामान्य आहे आणि ही समस्या बऱ्याच जणांबरोबर घडते. पण, झोपताना तोंडातून लाळ येणे ही साधी गोष्ट आहे की एखाद्या गंभीर आजाराचे लक्षण आहे, असा प्रश्न अनेकांच्या मनात पडतो. ईएनटी (कान, नाक, घसा) तज्ज्ञ डॉ. क्षितिजा पाठक यांनी यामागचे मूळ कारण स्पष्ट केले आहे.

डॉक्टर काय म्हणतात?

सकाळी उठल्यावर उशीवर लाळ दिसण्याचा आरोग्याशी थेट संबंध असतोच असे नाही. व्यक्ती जेव्हा कुशीवर किंवा पोटावर झोपते, तेव्हा झोपेत असताना तोंडावाटे लाळ बाहेर येते. मात्र, अतिप्रमाणात लाळ गळणे आरोग्याच्या एखाद्या आतील समस्येचे संकेत असू शकते.

झोपताना तोंडावाटे श्वास घेणे हे लाळ गळण्याचे सर्वांत मोठे कारण आहे. बंद नाक, ॲलर्जी, नाकाचे हाड वाकणे आणि ॲडिनॉइड्स वाढणे यांसारख्या समस्यांमुळे नाकावाटे हवा जाण्याचा मार्ग बंद होतो. अशा वेळी व्यक्तीला झोपेत तोंडाने श्वास घ्यावा लागतो. काही लोकांमध्ये टॉन्सिल वाढणे आणि ऑब्स्ट्रक्टिव्ह स्लीप अप्निया (झोपेत श्वास थांबणे) हे देखील याचे कारण बनू शकते. याशिवाय, अन्न गिळताना त्रास होणे, मज्जासंस्थेशी (नर्व्हस सिस्टम) जोडलेल्या समस्या आणि काही विशिष्ट औषधांचे सेवन यामुळेही कधीकधी लाळ गळू शकते.

जर कधीतरीच उशीवर लाळेचे डाग दिसत असतील आणि इतर कोणतेही त्रास नसतील, तर झोपण्याच्या चांगल्या सवयी अंगीकारणे, नाकाची ॲलर्जी आटोक्यात ठेवणे आणि नाक बंद होण्याच्या समस्येवर उपचार केल्यास आराम मिळू शकतो. पुरेसे पाणी पिणे आणि तोंडाची स्वच्छता राखणेदेखील फायदेशीर ठरते. मात्र, केवळ पुरेसे पाणी प्यायल्याने लाळ गळण्याची समस्या पूर्णपणे दूर होईलच असे नाही.

डॉक्टरांशी कधी संपर्क साधावा?

जर एखाद्या व्यक्तीला सतत आणि खूप जास्त प्रमाणात लाळ गळण्याचा त्रास होत असेल आणि त्यासोबतच घोरणे, झोपेत श्वास घेताना अडथळा येणे, वारंवार श्वास गुदमरल्यासारखे वाटणे, अन्न गिळताना त्रास होणे किंवा नाक सतत बंद राहणे यांसारखी लक्षणे जाणवत असतील तर ताबडतोब ईएनटी तज्ज्ञांशी संपर्क साधला पाहिजे. ही समस्या नाकातील अडथळा, टॉन्सिल वाढणे किंवा झोपेशी संबंधित एखाद्या आजारामुळे तर नाही ना, हे तपासणीनंतर स्पष्ट होते. लाळ गळण्याच्या समस्येकडे केवळ झोपण्याची सवय म्हणून दुर्लक्ष करू नका.