Cholesterol Control : वयाची ३० वर्षे ओलांडल्यानंतर शरीरात होणाऱ्या बदलांमुळे कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर परिणाम होऊ शकतो. अनेकदा वाढलेले कोलेस्ट्रॉल कोणतीही स्पष्ट लक्षणे न दाखवता शरीरात राहते, त्यामुळे नियमित तपासणी आणि निरोगी जीवनशैली अत्यंत महत्त्वाची ठरते. तुमचा आहार, शारीरिक हालचाल, वजन, पुरेशी झोप आणि दैनंदिन सवयी या सर्वांचा थेट परिणाम कोलेस्ट्रॉलच्या पातळीवर होतो.

विशेषतः सकाळच्या काही सवयी जर चुकीच्या पद्धतीने सुरु राहिल्या, तर त्याचा तुमच्या संपूर्ण आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो. तुमच्या दिवसाची सुरुवात कशी होते, तुम्ही नाश्त्यात काय खाता आणि सकाळी शरीराला किती व्यायाम किंवा हालचाल मिळते, या गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे आहे.

आनंदाची बाब म्हणजे दैनंदिन सवयींमध्ये छोटे-मोठे बदल करून हृदयाचे आरोग्य चांगले ठेवता येते. वयाच्या ३० नंतर सकाळी होणाऱ्या कोणत्या ३ चुकांमुळे कोलेस्ट्रॉल वाढण्याचा धोका असतो आणि त्या कशा सुधाराव्यात, ते जाणून घेऊया.

सकाळच्या ‘या’ ३ चुका ज्या कोलेस्ट्रॉलवर परिणाम करू शकतात:

१. सकाळी उठल्यावर अजिबात शारीरिक हालचाल न करणे:

सकाळी उठल्यानंतर दीर्घकाळ बसून राहणे किंवा पडून राहणे आणि कोणत्याही शारीरिक हालचालीशिवाय दिवसाची सुरुवात केल्याने तुमची दैनंदिन ॲक्टिव्हिटी कमी होते. निरोगी वजन राखण्यासाठी आणि हृदयाच्या आरोग्यासाठी नियमित व्यायाम आवश्यक आहे. सकाळी हलके चालणे, स्ट्रेचिंग किंवा इतर हलका व्यायाम दिनचर्यामध्ये समाविष्ट केला जाऊ शकतो.

२. नाश्त्यात जास्त सॅच्युरेटेड फॅट घेणे:

सकाळच्या नाश्त्यात सतत तळलेले पदार्थ, जास्त लोणी, तूप किंवा प्रोसेस्ड मीट यांसारख्या गोष्टींचे सेवन केल्याने आहारात सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण वाढू शकते. जास्त सॅच्युरेटेड फॅटमुळे LDL म्हणजेच ‘वाईट’ कोलेस्ट्रॉल वाढू शकते. नाश्त्यात फायबरयुक्त मोड आलेली कडधान्ये, दलिया, फळे आणि इतर पौष्टिक पर्यायांचा समावेश करणे अधिक फायदेशीर ठरते.

३. सकाळच्या चहा-कॉफीसह गोड किंवा प्रोसेस्ड स्नॅक्स घेणे:

चहा किंवा कॉफीसह रोज बिस्किटे, पेस्ट्री, पॅक केलेले स्नॅक्स किंवा जास्त साखरेचे पदार्थ खाण्याच्या सवयीमुळे कॅलरीज आणि चरबीचे (Unhealthy Fat) प्रमाण वाढते. याऐवजी कमी साखरेच्या चहा-कॉफीसह फळे, सुकामेवा (नट्स) किंवा इतर पौष्टिक स्नॅक्स खाणे उत्तम पर्याय आहे.

कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी काय करावे?

फक्त सकाळच्या सवयींवर लक्ष देणे पुरेसे नाही. दिवसभरात संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेशी झोप आणि योग्य वजन राखणे आवश्यक आहे. जर तुमचे कोलेस्ट्रॉल आधीच वाढलेले असेल किंवा हृदयाशी संबंधित आजारांचा धोका असेल, तर डॉक्टरांच्या सल्ल्याने लिपिड प्रोफाइल (Lipid Profile) चाचणी करून योग्य ते उपचार घ्यावेत.