Groin Sweating Causes : मांड्यांच्या मधोमध (ग्रोइन) जास्त घाम येणे हे उष्णता, दमट हवामान, त्वचेचे आपसांत होणारे घर्षण आणि हवेचा कमी प्रवाह यामुळे होऊ शकते. काही लोकांमध्ये गरजेपेक्षा जास्त घाम येण्याची समस्या ही ‘हायपरहायड्रोसिस’ (Hyperhidrosis)शी देखील जोडलेली असू शकते. सतत ओलावा राहिल्यामुळे त्वचेची चामडी घासली जाते, अशाने खाज सुटणे, जळजळ होणे आणि ‘इंटरट्राइगो’ (Intertrigo) यांसारख्या त्वचेच्या आजारांचा धोका वाढतो. ग्रोइनमध्ये जास्त घाम येण्यामागची कारणे पुढे सविस्तर जाणून घेऊया.

उन्हाळ्यात किंवा कोणत्याही ऋतूत थोडा वेळ चालून-फिरून आल्यावर मांड्यांच्या मधोमध घाम येणे सामान्य आहे. परंतु, काही लोकांना या भागात इतका घाम येतो की, त्यांचे अंतर्वस्त्र ओले होते, त्वचेवर चिकटपणा जाणवतो आणि वारंवार कपडे बदलावे लागतात. ही समस्या उष्ण आणि दमट हवामानात जास्त प्रमाणात वाढू शकते; परंतु कधी कधी थंड वातावरणात किंवा विश्रांती घेत असतानाही खूप घाम येतो.

मांड्यांमध्ये शरीराच्या इतर भागांपेक्षा जास्त घाम का येतो?

शरीरात घाम तयार करणाऱ्या ‘एक्राइन ग्रंथी’ (Eccrine Glands) जवळपास संपूर्ण शरीरात असतात. त्यांचे मुख्य काम घाम त्वचेच्या पृष्ठभागावर आणून शरीराचे तापमान नियंत्रित ठेवण्यास मदत करणे हे आहे. उष्णता, व्यायाम, ताणतणाव आणि दमट हवामान यांमुळे यांची क्रियाशीलता वाढू शकते.

‘मेडलाइन प्लस’ (Medline Plus) नुसार, मांड्यांच्या वरचा भाग हा शरीराच्या घड्या पडणाऱ्या भागात येतो. येथे दोन्ही मांड्या एकमेकांच्या जवळ असतात, ज्यामुळे हवेचा प्रवाह कमी होतो आणि घाम सहज सुकत नाही. या कारणामुळे काही लोकांना हा भाग शरीराच्या इतर भागांच्या तुलनेत अधिक ओला किंवा चिकट जाणवतो.

उष्णता, दमट हवामान आणि त्वचेचे घर्षण ‘ग्रोइन’मध्ये घाम कसा वाढवतात?

मांड्यांच्या वरच्या भागात घाम येण्याच्या समस्येत ऋतू आणि त्वचेमधील घर्षण महत्त्वाची भूमिका बजावतात. जेव्हा तापमान वाढते, तेव्हा शरीर स्वतःला थंड ठेवण्यासाठी जास्त घाम निर्माण करते. दुसरीकडे, दमट हवामानामुळे घामाचे लवकर बाष्पीभवन होत नाही, ज्यामुळे त्वचा बराच वेळ ओलसर राहू शकते.

त्याशिवाय चालताना, धावताना, सायकल चालवताना किंवा दीर्घकाळ चालताना मांड्यांची त्वचा वारंवार एकमेकांना घासली जाते. घट्ट जीन्स, कृत्रिम धाग्यांचे (सिंथेटिक) अंतर्वस्त्र आणि हवा न खेळू शकणारे कपडेदेखील उष्णता आणि ओलावा अडकवून ठेवू शकतात. त्यामुळे घामामुळे होणारा त्रास अधिक जाणवतो.

‘क्लीवलँड क्लिनिक’ (Cleveland Clinic) नुसार, घर्षणामुळे त्वचा चोळली जाण्याची समस्या सामान्य आहे. तसजंअमेरिकन अकॅडमी ऑफ डर्मेटोलॉजी असोसिएशन’नुसार, उन्हाळ्यात व्यायामानंतर किंवा दीर्घकाळ चालल्यावर मांड्यांच्या मध्ये घाम येणे ही सामान्य गोष्ट आहे. परंतु, जर घाम वारंवार आणि गरजेपेक्षा जास्त येत असेल, कपडे ओले करत असेल किंवा दैनंदिन कामांमध्ये अडथळा आणत असेल, तर त्याचे कारण समजून घेणे गरजेचे आहे.

मांड्यांच्या मध्ये येणारा घाम कमी करण्यासाठी काय करावे?

‘एनएचएस’ (NHS) नुसार, जर घाम प्रामुख्याने उष्णता, दमट हवामान किंवा घर्षणामुळे येत असेल, तर दैनंदिन जीवनातील काही सवयी यांमुळे आराम देण्यास मदत करू शकतातँ

हवा खेळती राहणारे कपडे घाला: सैल आणि आरामदायी कपडे निवडा. खूप घट्ट असणारे किंवा ओलावा जास्त वेळ रोखून ठेवणारे अंतर्वस्त्र घालणे टाळा.

घाम आल्यानंतर कपडे बदला: व्यायाम केल्यानंतर किंवा बाहेरून दीर्घकाळ प्रवास करून आल्यावर ओले अंतर्वस्त्र बदला.

त्वचा स्वच्छ आणि कोरडी ठेवा: आंघोळ केल्यानंतर मांड्यांच्या मधला भाग हलक्या हाताने कोरडा करा. जोरात घासल्याने जळजळ वाढू शकते.

घर्षण कमी करा: चालताना किंवा व्यायाम करताना मांड्यांची त्वचा एकमेकांना घासली जात असल्यास अँटी-चाफिंग क्रीमचा वापर करा, हे उत्पादन डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारचं वापरा.

सल्ल्याशिवाय तीव्र उत्पादने वापरू नका: ग्रोइनची त्वचा अत्यंत संवेदनशील असते. सुवासिक डिओडरंट, तीव्र साबण किंवा घाम रोपणारी उत्पादने गुप्तांगावर आणि आतील संवेदनशील त्वचेवर लावल्याने जळजळ होऊ शकते.