अचानक आलेला मृत्यू सर्वांनाच कमालीचा धक्कादायक असतो आणि त्यातही ही मृत्यू होणारी व्यक्ती ऐन विशीत किंवा तिशीत असेल, तर त्यात पिळवटून टाकणारे दुःख आणि जबरदस्त धक्का तर असतोच, पण लोकांच्या मनाला चटका देणाऱ्या प्रश्नांची मालिका निर्माण करतो. का घडले असे? अगदी काही मिनिटांपूर्वी धडधाकट वाटणारा तरणाताठा माणूस असा अचानक ज्योत विझावी तसा मरण का पावतो?

जागतिक आरोग्य संघटनेच्या २०१५ मधील आकडेवारीनुसार, मरण पावणाऱ्या दर १ लाख व्यक्तींमधील ४२८० व्यक्ती या अचानक हृदयक्रिया बंद पडल्यामुळे दगावतात. यामध्ये ३७ टक्के व्यक्ती ४० वर्षांच्या आतील असतात. अचानक हृदयक्रिया बंद पडणे म्हणजे ‘सडन कार्डीयाक अरेस्ट’. यामध्ये हृदयाचे स्पंदनाची गती एकाएकी खूप वाढून शरीरात आणि हृदयात जाणारा रक्तपुरवठा पूर्ण थांबतो आणि हृदय बंद पडते. हृदयाच्या कार्यामध्ये असा बिघाड होण्यामागे अनेक कारणे असतात.
कारणे

१. आनुवंशिकता- ज्यांच्या आईवडिलांना किंवा जवळच्या नातेवाईकांना हृदयविकार असतो, अशांना आनुवंशिकतेमुळे हृदयविकाराचा झटका येऊन एकाएकी हृदय बंद पडू शकते.

२. जन्मजात दोष- काही तरुणांमध्ये गंभीर प्रकारचे शारीरिक दोष असतात, पण त्यांचे एकतर निदान झालेले नसते किंवा वेळेवर पूर्ण उपचार किंवा शस्त्रक्रिया केलेली नसते. यात जन्मजात हृदयविकार, हृदयाच्या झडपांचे आजार, हृदयस्पंदनातील अनियमितपणा, कार्डिओमायोपथी, कंजेस्टिव्ह हार्ट फेल्युअर, हृदयाचे पंपिंग कमकुवत असणे असे गंभीर आजार येतात.

३. शारीरिक विकार- उच्च रक्तदाब, रक्तातील कोलेस्टेरॉल प्रमाणाबाहेर जास्त असणे, बेसुमार वजनवाढ किंवा स्थूलत्व, मधुमेह असे विकार तरुण वयात असल्यास या घटना घडू शकतात.

४. अतिरिक्त आजार- हायपरथायरॉइडिझ्म, पल्मनरी हायपरटेन्शन, इलेक्ट्रोलाईट इम्बॅलन्स अशा आजारात हृदयाचे स्पंदन बिघडते आणि अचानक बंद पडू शकते.

५. व्यसने- अतिरेकी धूम्रपान, कोकेन किंवा अॅम्फेटामाईन अशा नशील्या पदार्थांचे व्यसन याकरिता कारणीभूत होऊ शकते. सुप्रसिध्द गायक आणि नर्तक मायकेल जॅक्सन याला अतितीव्र वेदनाशामक औषधे सातत्याने घेऊन असाच अचानक मृत्यू आला.
अचानक हृदयक्रिया बंद पडल्यावर क्षणार्धात उपचार न झाल्यास मृत्यू अटळ असतो. त्या व्यक्तीला कार्डिअॅक अॅम्ब्युलन्सद्वारे तातडीने इस्पितळाच्या आय.सी.यू.मध्ये दाखल करावे लागते. अॅम्ब्युलन्स किंवा इस्पितळात ऑटोमेटेड एक्स्टर्नल डीफिब्रीलेटर या उपकरणाने हृदयाच्या बाहेरून डी.सी. शॉक द्यावा लागतो. त्याचप्रमाणे त्याचे हृदय आणि फुफ्फुसे पुन्हा काम करावीत यासाठी ‘सीपीआर’ (कार्डिओ-पल्मनरी-रीससायटेशन) करावे लागते.

हृदय बंद पडल्यानंतर जास्तीत जास्त ४ ते ७ मिनिटात हे तातडीचे उपचार व्हावे लागतात. हृदय बंद पडल्यानंतर रुग्ण वाचण्याची शक्यता, उपचार मिळण्यासाठी व्यतीत होणाऱ्या दर मिनिटाला १० टक्क्यांनी कमी होत जाते. आपल्या देशात कार्डीअॅक अॅम्ब्युलन्सची सेवा जास्त तातडीने नसल्याने, हृदयक्रिया बंद पडलेले ९९ टक्के रुग्ण उपचाराअभावी दगावतात.