Wall Leakage Solutions : भिंतीवर ओल दिसली की, सर्वांत आधी आपले लक्ष छताकडे किंवा पावसाच्या पाण्याकडे जाते. पण, जर छतावरून पाणी गळत नसेल आणि तरीही भिंतीवर ओल, डाग किंवा पेंट निघताना दिसत असेल, तर त्याचे कारण दुसरेच असू शकते. अनेकदा पाणी वरून नाही, तर भिंतीच्या आत लपलेले पाईप, आसपासचा दमटपणा किंवा घराच्या अशा भागातून येत असते जिथे आपले लक्ष जात नाही.
भिंतीवर ओल येणे ही एक हळूहळू वाढणारी समस्या आहे. सुरुवातीला भिंतीवर एखादा ओला डाग किंवा रंग बदललेला दिसतो. त्यानंतर रंग फुगू लागतो, प्लास्टर कमकुवत होते आणि काही ठिकाणी पांढरी पावडर जमा झाल्यासारखे डाग दिसू लागतात. त्यामुळे छतावरून पाणी गळत नसतानाही भिंतीवर ओल दिसल्यास खालील जागा नक्की तपासा.
भिंतीच्या आतील पाईप गळत आहे का?
भिंतीवर ओल येण्याचे सर्वांत मुख्य कारण म्हणजे आत लपलेल्या पाईपलाईनची गळती. बाथरूम, स्वयंपाकघर (किचन) किंवा वॉश एरियामधील पाण्याचे पाईप आतून हळूहळू गळत असतील, तर बाहेर पाण्याचा थेंबही दिसत नाही. पण हेच पाणी हळूहळू भिंतीमध्ये शोषले जाते. जर ही ओल बाथरूम किंवा किचनला लागून असलेल्या भिंतीवर असेल, तर पाईपलाईन आणि तिचे कनेक्शन नक्की तपासून घ्या.
बाथरूममधील दमट हवा भिंतीपर्यंत पोहोचतेय का?
नेहमी थेट पाणीच भिंतीत शोषले जाते, असे नाही. बाथरूममध्ये अंघोळ करताना तयार होणारी वाफ आणि ओल जर बाहेर पडली नाही, तर ती भिंतींवर जमा होते. प्रदीर्घ काळ असे घडल्यास कोपरे, खिडक्यांचा परिसर आणि छताजवळ ओल किंवा बुरशी दिसू शकते. बाथरूममध्ये एक्झॉस्ट फॅन वापरणे आणि वापरल्यानंतर योग्य व्हेंटिलेशन ठेवल्यास ही समस्या कमी होऊ शकते.
किचनला लागून असलेली भिंतही तपासा
स्वयंपाक करताना निघणारी वाफ आणि दमटपणा आसपासच्या भिंतींवर परिणाम करू शकतो. किचनमध्ये हवा खेळती राहण्याची योग्य सोय नसेल, तर ओल हळूहळू भिंतींमध्ये जमा होते. किचनच्या ज्या भिंतीचा रंग वारंवार निघतो किंवा रंगावर जिथे काळे डाग पडतात, फक्त तिथे पेंट रंग देण्याऐवजी ओलसरपणाच्या मूळ स्रोताचा शोध घेणे गरजेचे आहे.
बाहेरील भिंतीला तडे गेले आहेत का?
अनेकदा पावसाचे पाणी छतावरून नाही, तर बाहेरील भिंतीवरून आत येते. भिंतीवरील लहान तडे, खराब झालेले प्लास्टर किंवा जुना पेंट यांमुळे पाणी आत जाण्यास जागा मिळते. पावसानंतर एखाद्या विशिष्ट भागातील ओल जास्त वाढत असेल, तर त्या भिंतीचा बाहेरील भाग नक्की तपासा.
खिडकी आणि दरवाजांजवळ पाणी साठत नाही ना?
खिडकीची फ्रेम आणि भिंत यांमधील लहान जागासुद्धा ओलसरपणाचे कारण बनू शकते. पावसाळ्यात खिडकीच्या फ्रेमभोवती पाणी साठत असेल आणि तिथे योग्य सीलिंग नसेल, तर पाणी भिंतीत जाते. ओल फक्त खिडकीभोवती दिसत असेल, तर फ्रेमचे सीलिंग आणि बाहेरील भाग तपासून घ्या.
घरात जास्त दमटपणा आहे का?
कपडे घरात वाळवणे, खेळती हवा नसणे, सतत बंद राहणाऱ्या खोल्या आणि उन्हाचा अभाव यांमुळेही भिंतींमध्ये ओल वाढते. अशी ओल सहसा कोपऱ्यांमध्ये, कपाटांच्या मागे आणि खिडक्यांजवळ दिसते. भिंतीवर काळे डाग किंवा बुरशी दिसू लागल्यास फक्त पेंट करून भागणार नाही, तर खोलीत हवा खेळती ठेवणे आवश्यक आहे.
कपाटाच्या मागची भिंत नक्की पाहा
मोठे कपाट किंवा फर्निचर जर भिंतीला अगदी टेकवून ठेवले असेल, तर त्यामागे हवा खेळती राहत नाही. त्यामुळे तेथे ओल अडकून राहते आणि हळूहळू भिंतीवर बुरशी किंवा ओल दिसू लागते. ओल फक्त कपाटाच्या मागे असेल, तर फर्निचर थोडे पुढे करून भिंत सुकू द्या.
फक्त रंग दिल्याने समस्या सुटणार नाही
ओल आलेल्या भिंतीला वारंवार रंग देणे हा सोपा उपाय वाटू शकतो; परंतु पाण्याचा मूळ स्रोत तिथेच राहिल्यास काही दिवसांनी तीच समस्या पुन्हा समोर येईल. त्यामुळे आधी ओल कुठून येतेय हे शोधून काढा. त्यानंतर तडे बुजवणे, पाईपलाईनची दुरुस्ती, बाहेरील भिंतीचे काम किंवा वॉटरप्रूफिंग करून समस्या कायमची सोडवा.
