Causes Of Watery Eyes : अनेक जणांना नेहमी डोळ्यांतून पाणी येण्याचा त्रास होतो. धूळ, धूर, तीव्र प्रकाश किंवा डोळ्यात काहीतरी गेल्यामुळे डोळ्यातून पाणी येऊ शकते. त्याशिवाय थंड किंवा वेगात वाहणारा वारा, तसेच डोळ्यांची जळजळ आणि थकवा यांमुळेही पाणी येऊ शकते. अशा स्थितीत डोळ्यांतून पाणी येणे हा डोळे स्वच्छ राहण्याचाच एक भाग असतो.

परंतु, जर डोळ्यांतून वारंवार किंवा सतत पाणी येत असेल, तर त्यामागे एखादे दुसरे आरोग्यविषयक कारण असू शकते. त्यामुळे अशा समस्येकडे दुर्लक्ष करू नये. वेळेत कारणाचा शोध घेतल्यास योग्य काळजी घेणे आणि उपचार करणे सोपे जाते. डोळ्यांतून पाणी का येते आणि डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा ते पाहूया.

डोळ्यांतून वारंवार पाणी येण्याची मुख्य कारणे

‘हेल्थलाईन’च्या अहवालानुसार, डोळ्यांतून वारंवार पाणी येण्याचे एक मोठे कारण ‘ड्राय आय सिंड्रोम’ (Dry Eye Syndrome) असू शकते. डोळ्यांमध्ये पुरेसा ओलावा नसेल, तर जळजळ होते आणि त्याला प्रतिसाद म्हणून डोळे जास्त प्रमाणात अश्रू तयार करू लागतात. ॲलर्जी, सायनसचा त्रास आणि डोळ्यांमधील इन्फेक्शनमुळेही जास्त अश्रू येऊ शकतात.

त्याव्यतिरिक्त, पापण्यांना सूज येणे, पापणी आतील किंवा बाहेरील बाजूस वळणे आणि पापणीचे केस डोळ्यात खुपणे हीदेखील याची कारणे असू शकतात. काही लोकांमध्ये अश्रू वाहून नेणारी नलिका (Tear Duct) बंद झाल्यामुळे अश्रू योग्यरीत्या बाहेर पडत नाहीत आणि ते डोळ्यांतून वाहू लागतात. डोळ्याला दुखापत झाल्यास, विशिष्ट औषधांच्या दुष्परिणामामुळे किंवा काही वैद्यकीय उपचारांदरम्यानही ही समस्या उद्भवू शकते.

डॉक्टरांकडे कधी जाणे आवश्यक?

जर डोळ्यांतून पाणी येण्याच्या समस्येचा वारंवार त्रास होत असेल किंवा ती समस्या अनेक दिवस टिकून राहिली असेल, तर नेत्रतज्ज्ञांचा (Eye Specialist) सल्ला घेणे योग्य ठरते. डोळ्यांतून पाणी येण्यासह तीव्र वेदना, जास्त लालसरपणा, सूज, धूसर दिसणे किंवा प्रकाशाचा त्रास होत असल्यास त्याकडे मुळीच दुर्लक्ष करू नका.

डोळ्याला दुखापत झाल्यानंतर सतत पाणी येत असल्यास त्वरित तपासणी करून घेणे गरजेचे आहे. जर पाण्यासह डोळ्यांतून चिकट द्रव येत असेल किंवा डोळे उघडण्यास त्रास होत असेल, तर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. अशा परिस्थितीत डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय डोळ्यांत कोणतेही ड्रॉप्स किंवा औषध टाकणे टाळा.