Cervical Pain Home Remedies : आजकाल अनेक जण तासन् तास मोबाइल आणि लॅपटॉपसमोर बसून काम करत असतात. कामाच्या घाईत आपण बसण्याची पद्धत, मान झुकवण्याची सवय किंवा पोस्चर याकडे दुर्लक्ष करतो. मात्र, याच चुकीच्या सवयी पुढे जाऊन मानदुखी (सर्व्हायकल पेन- Cervical Pain) सारख्या त्रासाचे मोठे कारण ठरू शकतात. मानदुखीमुळे केवळ मान आणि खांद्यांमध्ये वेदना होत नाहीत, तर काही वेळा चक्कर येणे, हातात अशक्यतपणा जाणवणे आणि मान फिरवताना अडचण येणे असे त्रासही जाणवू शकतात.
एम्सचे माजी कन्सल्टंट तसेच साओल हार्ट सेंटरचे संस्थापक आणि कार्डिओलॉजिस्ट डॉ. बिमल झाझर यांच्या मते, मानदुखी तेव्हा होतो जेव्हा मानेच्या स्नायूंना जाणाऱ्या नसांवर दबाव येऊ लागतो. दीर्घकाळ मान खाली करून बसणे, मोबाइल किंवा लॅपटॉप वापरणे आणि चुकीच्या पोस्चरमध्ये राहणे यामुळे मानेवर सतत ताण येतो. हा ताण हळूहळू वाढत जाऊन सर्व्हायकल वेदनांचे कारण ठरतो. मात्र, योग्य पोस्चर, संतुलित आहार आणि काही नैसर्गिक उपायांचा अवलंब केल्यास या त्रासापासून बऱ्याच प्रमाणात बचाव करता येऊ शकतो.
मानदुखीची लक्षणे (Symptoms of Cervical Pain)
मानदुखी केवळ मान दुखण्यापुरता मर्यादित नसतो. या समस्येमध्ये अनेक लक्षणे एकत्र दिसू शकतात. मान आणि खांद्यांमध्ये तीव्र वेदना होणे, हातांमध्ये झिणझिण्या किंवा अशक्तपणा जाणवणे, वारंवार चक्कर येणे, मान वळवताना अडथळा जाणवणे आणि दीर्घकाळ बसून राहिल्यास वेदना वाढणे ही या त्रासाची प्रमुख लक्षणे मानली जातात. सुरुवातीला ही लक्षणे सौम्य वाटली तरी दुर्लक्ष केल्यास त्रास वाढू शकतो.
हळद आणि आले सेवन केल्याने सूज कमी होण्यास मदत (Turmeric and Ginger Help Reduce Inflammation)
Journal of Medicinal Food मध्ये प्रकाशित संशोधनानुसार, हळदीमध्ये आढळणारे कर्क्यूमिन (Curcumin) हे शरीरात सूज निर्माण करणाऱ्या COX-2 एन्झाइमला रोखण्याचे काम करते. त्यामुळे वेदना कमी होण्यास मदत होते. हळद आणि आले या दोन्ही पदार्थांमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी गुणधर्म आढळतात, जे सूज आणि वेदना कमी करण्यात सहाय्यक ठरतात.
आल्यामध्ये असलेले जिंजरॉल (Gingerol) रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करते आणि स्नायूंना आराम देते. यासाठी एका कप पाण्यात एक चमचा हळद आणि एक चमचा किसलेले आले घालून ५ ते १० मिनिटे उकळावे. त्यानंतर त्यामध्ये मध आणि काळी मिरी घालून हे मिश्रण प्यायल्यास मानदुखी आणि सूज कमी होण्यास मदत होऊ शकते.
मॅग्नेशियमयुक्त पदार्थांचा आहारात समावेश करा (Include Magnesium-Rich Foods in Diet)
Journal of Inflammation Research मधील अभ्यासानुसार, मॅग्नेशियम शरीरातील ‘NMDA रिसेप्टर्स’ ब्लॉक करण्याचे काम करते, जे वेदनांचे सिग्नल मेंदूपर्यंत पोहोचवतात. मॅग्नेशियम स्नायूंना आराम देते आणि स्नायूंचे आकडी (cramps) कमी करण्यास मदत करते. शरीरात मॅग्नेशियमची कमतरता असल्यास स्नायू ताणलेले राहतात आणि वेदना वाढण्याची शक्यता असते.
या कमतरतेवर मात करण्यासाठी आहारात पालक, केळी आणि विविध हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करणे उपयुक्त ठरते. हे पदार्थ स्नायू मजबूत करण्यास आणि वेदना कमी करण्यास मदत करतात.
अननस आणि पपई खाल्ल्याने सूज कमी होण्यास मदत (Pineapple and Papaya Help Reduce Swelling)
Biomedical Reports मध्ये प्रकाशित माहितीनुसार, अननसमध्ये ‘ब्रोमेलिन’ (Bromelain) नावाचे एन्झाइम असते, जे विशेषतः मस्क्युलोस्केलेटल (Musculoskeletal) सूज कमी करण्यात प्रभावी मानले जाते. हे एन्झाइम शरीरातील वेदना आणि सूज वाढवणाऱ्या रसायनांचे प्रमाण कमी करण्यास मदत करते.
अननस आणि पपई या दोन्ही फळांमध्ये असे एन्झाइम असतात, जे सूज कमी करून शरीराच्या जखमा किंवा स्नायूंच्या ताणातून लवकर बरे होण्यास मदत करतात. या फळांचे नियमित सेवन केल्यास मानदुखीमुळे होणारी सूज कमी होण्यास मदत मिळू शकते.
लसूण सेवनामुळे रक्ताभिसरण सुधारते (Garlic Helps Improve Blood Circulation)
लसूण हा नैसर्गिक अँटी-इन्फ्लेमेटरी पदार्थ मानला जातो. तो सूज कमी करण्यास आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत करतो. यासाठी २ ते ३ लसणाच्या पाकळ्या पाण्यात उकळून त्याचे सेवन केल्यास वेदना कमी होण्यास सहाय्य मिळू शकते. नियमितपणे लसणाचा समावेश आहारात केल्यास स्नायूंमधील ताण कमी होण्यास मदत होऊ शकते.
चुकीच्या सवयींमुळे वाढतो मानदुखीचा धोका (Wrong Posture Increases Risk of Cervical Pain)
दीर्घकाळ मान खाली करून बसणे, सतत मोबाइलकडे पाहणे किंवा लॅपटॉप वापरताना चुकीच्या पोस्चरमध्ये बसणे या सवयी मानदुखीचा धोका वाढवतात. त्यामुळे काम करताना पाठ सरळ ठेवणे, स्क्रीन डोळ्यांच्या पातळीवर ठेवणे आणि दर काही वेळाने विश्रांती घेणे या साध्या सवयी अंगीकारल्यास मानदुखी टाळता येऊ शकतो.
मानदुखीमुळे येणारी चक्कर ही काही वेळा गंभीर न्यूरोलॉजिकल समस्येचे संकेत असू शकतात. त्यामुळे घरगुती उपायांना औषधांचा पर्याय समजू नये. वेदना असह्य होत असल्यास किंवा वारंवार चक्कर येत असल्यास तातडीने ऑर्थोपेडिक किंवा न्यूरोलॉजिस्ट तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.
टीप – हा लेख प्राप्त माहितीवर आधारित आहे.
