How to Clear Chest Congestion: ऑक्टोबर महिना सुरू झाला की, वातावरणात हळूहळू बदल जाणवू लागतात. दिवसा उष्णता, तर सकाळी आणि रात्री तुलनेने थंड वातावरण असे चित्र अनेक ठिकाणी पाहायला मिळते. हवामानातील बदल, धूळ, प्रदूषण आणि विषाणूंच्या संसर्गामुळे काही जणांना सर्दीचा त्रास होऊ शकतो. अशा वेळी छातीत कफ साचल्यासारखे वाटणे, घशात चिकट पदार्थ अडकल्याची जाणीव होणे किंवा कफ बाहेर पडताना त्रास होणे अशा समस्या जाणवू शकतात. छातीत साचलेल्या कफामुळे अस्वस्थ वाटत असेल, तर काही सोप्या गोष्टी केल्याने आराम मिळण्यास मदत होऊ शकते. यासाठी घरात सहज उपलब्ध असणाऱ्या काही पदार्थांचाही वापर केला जातो. चला तर जाणून घेऊया हे उपाय नेमके कोणते आहेत…

छातीत कफ म्हणजे नेमके काय? तो का साचतो?

आपल्या श्वसनमार्गात श्लेष्मा नावाचा चिकट द्रव नैसर्गिकरीत्या तयार होत असतो. हा द्रव धूळ, जंतू आणि इतर त्रासदायक कण अडकवून, त्यांना श्वसनमार्गातून बाहेर काढण्यास मदत करतो. मात्र, सर्दी किंवा श्वसनमार्गाचा संसर्ग झाल्यास श्लेष्माचे प्रमाण वाढू शकते. काही वेळा तो घट्ट झाल्यामुळे बाहेर पडण्यास त्रास होतो. अशा परिस्थितीत छातीत कफ साचल्यासारखे वाटू शकते.

कफ साचण्यामागे केवळ हवामानातील बदल हेच कारण नसते. विषाणूंचा संसर्ग, ॲलर्जी, धूर आणि प्रदूषण यांचाही त्याच्याशी संबंध असू शकतो. त्यामुळे कफाचा त्रास होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये. सौम्य त्रासात काही घरगुती उपायांमुळे आराम मिळू शकतो; मात्र, साचलेला कफ दूर करण्यासाठी योग्य ते उपचार करण्याची गरज असते.

१. दुधात मिसळा हळद आणि काळी मिरी

छातीत कफ साचला असेल, तर हळद आणि काळी मिरी घातलेले कोमट दूध हा एक पारंपरिक घरगुती उपाय आहे. त्यासाठी एक कप दूध कोमट करून, त्यात चिमूटभर हळद आणि थोडीशी काळी मिरी मिसळा. दूध पिण्यायोग्य तापमानाला आल्यानंतर त्याचे सेवन करता येते.

हळदीचा वापर भारतीय घरांमध्ये अनेक वर्षांपासून केला जातो. मात्र, हळद आणि काळी मिरी घातलेले दूध प्यायल्याने छातीत साचलेला कफ थेट बाहेर पडतो किंवा तो पूर्णपणे बरा होतो; परंतु याचा ठोस वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. त्यामुळे याकडे कफावरील खात्रीशीर उपचार म्हणून पाहू नये. दूध प्यायल्याने त्रास वाढत असल्याचे जाणवल्यास त्याचे सेवन टाळावे.

२. आले आणि मध यांचा वापर

आले आणि मध यांचा वापरही अनेक घरांमध्ये पारंपरिक उपाय म्हणून केला जातो. त्यासाठी थोडे किसलेले आले आणि एक चमचा मध एकत्र मिसळला जातो. काही जण हे मिश्रण थेट सेवन करतात; तर काही जण कोमट पाण्यात मिसळून घेतात.

मधामुळे घशातील खवखव आणि खोकल्याचा त्रास काही प्रमाणात कमी होण्यास मदत होऊ शकते. मात्र, मध आणि आल्यामुळे छातीत साचलेला कफ हमखास बाहेर पडतो, असे म्हणता येत नाही. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी मधातील साखरेचे प्रमाण लक्षात घ्यावे. तसेच, एक वर्षापेक्षा कमी वयाच्या बाळांना मध देऊ नये.

३. मधात मिसळा चिमूटभर काळी मिरी

मध आणि काळी मिरी यांचे मिश्रण हादेखील एक पारंपरिक घरगुती उपाय आहे. त्यासाठी एक चमचा मध घेऊन, त्यात चिमूटभर काळी मिरी मिसळली जाते. मात्र, हे मिश्रण छातीत साचलेला कफ बाहेर काढते किंवा कफाचा त्रास बरा करते, याचे पुरेसे वैज्ञानिक पुरावे नाहीत.

काळी मिरी काही व्यक्तींना घशात जळजळ किंवा पोटाचा त्रास देऊ शकते. त्यामुळे हे मिश्रण घेतल्यानंतर अस्वस्थता जाणवल्यास त्याचे सेवन थांबवावे.

कफाचा त्रास असल्यास काय काळजी घ्यावी?

कफाचा त्रास होत असल्यास दिवसभर पुरेसे पाणी पिणे आणि विश्रांती घेणे महत्त्वाचे आहे. कोमट पाणी प्यायल्याने घशाला आराम मिळू शकतो. गरम पाण्याची वाफ घेताना भाजण्याचा धोका असतो, त्यामुळे उकळत्या पाण्याच्या भांड्यावरून वाफ घेणे टाळावे. विशेषतः लहान मुलांच्या बाबतीत अधिक काळजी घ्यावी.

कफाचा त्रास दीर्घकाळ टिकत असल्यास, ताप येत असल्यास किंवा कफामध्ये रक्त दिसल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. श्वास घेण्यास त्रास होणे किंवा छातीत तीव्र स्वरूपाची वेदना जाणवणे, अशी लक्षणे दिसल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.

(महत्त्वाची सूचना: वरील उपाय सामान्य माहितीसाठी दिलेले आहेत. छातीत कफ साचण्यामागील कारण प्रत्येक व्यक्तीच्या बाबतीत वेगवेगळे असू शकते. हे उपाय वैद्यकीय उपचारांना पर्याय नाहीत. त्रास वाढल्यास किंवा तो दीर्घकाळ)