Natural Remedy for High Blood Pressure: रक्तदाब वाढला की, डोकेदुखी, चक्कर, थकवा व अस्वस्थता ही अनेकांबाबत नेहमीची लक्षणे झाली आहेत. बदलती जीवनशैली, ताणतणाव व चुकीचा आहार यांमुळे उच्च रक्तदाबाची समस्या झपाट्याने वाढताना दिसते. पण जर सांगितलं की, तुमच्या स्वयंपाकघरातच असा एक साधा, पांढऱ्या रंगाचा पदार्थ आहे, जो रोज योग्य प्रमाणात खाल्ल्यास रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करू शकतो तर? आश्चर्य वाटेल, पण तज्ज्ञही या गोष्टीकडे गांभीर्याने पाहण्याचा सल्ला देतात.

हा पदार्थ केवळ चव वाढवणारा नाही, तर पोषणमूल्यांचा खजिना मानला जातो. त्यामध्ये एलिसिन, मँगनीज, जीवनसत्त्व बी६, जीवनसत्त्व सी, सेलेनियम, तंतुमय घटक, कॅल्शियम, पोटॅशियम, लोह व तांबे यांसारखी महत्त्वाची पोषक तत्त्वे मुबलक प्रमाणात आढळतात. ही सर्व घटक द्रव्ये शरीरातील विविध कार्यप्रणाली सुरळीत ठेवण्यास सहायक ठरतात. विशेषतः हृदयविकार आणि रक्तदाबाशी संबंधित समस्या नियंत्रणात ठेवण्यासाठी हा पदार्थ उपयुक्त मानला जातो.

आरोग्यतज्ज्ञांच्या मते, रोज सकाळी योग्य प्रमाणात या पांढऱ्या घटकाच्या दोन पाकळ्या चावून खाल्ल्यास रक्तदाब संतुलित राहण्यास मदत होऊ शकते. त्यातील सक्रिय द्रव्ये रक्तवाहिन्या सैल करण्यास साह्य करतात, ज्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत होतो. परिणामी हृदयावरचा ताण कमी होतो आणि रक्तदाब नियंत्रणात राहण्यास हातभार लागतो. इतकंच नव्हे, तर कोलेस्ट्राॅलची पातळी संतुलित ठेवण्यातही याचा फायदा होऊ शकतो.

त्याशिवा, हा घटक रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठीही ओळखला जातो. वारंवार सर्दी-खोकला किंवा संसर्ग होत असल्यास रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत असल्याचे संकेत असू शकतात. अशा वेळी या पदार्थाचा समावेश आहारात केल्यास शरीराची संरक्षणशक्ती बळकट होण्यास मदत मिळू शकते. कच्च्या स्वरूपात किंवा हलक्या आचेवर परतून याचे सेवन केल्यास त्यातील पोषक तत्त्वे अधिक प्रभावी राहतात.

मधुमेहाने त्रस्त असलेल्या रुग्णांसाठीही हा पदार्थ फायदेशीर ठरू शकतो. रक्तातील साखरेची पातळी संतुलित ठेवण्यासाठी सकाळी उपाशीपोटी एक कच्ची पाकळी चावून खाण्याचा सल्ला काही तज्ज्ञ देतात. मात्र, कोणतीही गोष्ट अति प्रमाणात घेतल्यास उलट परिणाम होऊ शकतो. त्यामुळे दिवसाला एक ते दोन पाकळ्यांपेक्षा अधिक सेवन टाळावे; अन्यथा पोटात जळजळ किंवा इतर त्रास उदभवू शकतो.

आतापर्यंत आपण ज्या पांढऱ्या, साध्या; पण प्रभावी घटकाबद्दल बोलत होतो तो म्हणजे लसूण. होय, आपल्या रोजच्या स्वयंपाकात वापरला जाणारा लसूण हा केवळ चव वाढवणारा मसाला नसून, आरोग्यासाठी अमूल्य ठरू शकतो. योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने लसणाचे सेवन केल्यास रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास, हृदय सुदृढ राखण्यास आणि एकूणच आरोग्य सुधारण्यास मदत होऊ शकते.

(टीप : हा लेख केवळ सामान्य माहितीच्या उद्देशाने दिलेला आहे. यातील माहिती वैद्यकीय सल्ला, निदान किंवा उपचारांना पर्याय नाही. अधिक तपशिलासाठी नेहमी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. लेखातील माहितीची अचूकता, विश्वासार्हता किंवा परिणामकारकतेची जबाबदारी ‘लोकसत्ता’ घेत नाही.)