सुपरफूड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिया सीड्स आणि तुळशीच्या बिया म्हणजेच सब्जा सीड्समध्ये फायबर, ओमेगा-३ फॅटी ॲसिड आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात आढळतात. वजन नियंत्रणासाठी आणि पचनक्रिया सुधारण्यासाठी अनेक जण सकाळी पाण्यात भिजवून या बिया एकत्र खाणे पसंत करतात. मात्र, पोषणतज्ज्ञांच्या मते या दोन्ही बियांचे गुणधर्म आणि पोषणमूल्य वेगवेगळे आहेत. त्यांचे सेवन योग्य प्रमाणात आणि योग्य पद्धतीने न केल्यास पोट फुगणे, गॅस, पोटात अस्वस्थता किंवा ठसका लागण्यासारख्या समस्या उद्भवू शकतात.

हैदराबाद येथील एलबी नगरमधील ग्लेनेगल्स अवेअर हॉस्पिटलच्या मुख्य आहारतज्ज्ञ डॉ. बिराली श्वेता यांच्या मते, एखाद्या व्यक्तीला या बियांची ॲलर्जी किंवा पचनाशी संबंधित संवेदनशीलता नसल्यास, मर्यादित प्रमाणात त्यांचे एकत्र सेवन करणे फायदेशीर ठरू शकते. चला, तज्ज्ञांकडून जाणून घेऊया या बियांचे सेवन केल्याने काय फायदे होऊ शकतात आणि कोणती काळजी घ्यावी.

चिया सीड्समध्ये कोणती पोषक तत्त्वे असतात? जाणून घ्या फायदे

डॉ. बिराली यांच्या मते, चिया सीड्समध्ये ओमेगा-३ फॅटी ॲसिड, विद्राव्य फायबर आणि वनस्पतीजन्य प्रथिने आढळतात. यामुळे पोट अधिक वेळ भरलेले राहण्यास मदत होऊ शकते. तसेच हृदयाच्या आरोग्यासाठी आणि रक्तातील साखरेचे नियंत्रण राखण्यासाठीही चिया सीड्स उपयुक्त ठरू शकतात.

सब्जा सीड्स खाल्ल्याने आरोग्यावर काय परिणाम होतो? जाणून घ्या

सब्जा म्हणजेच तुळशीच्या बिया. आयुर्वेदिक आणि युनानी वैद्यकशास्त्रात या बियांचा पारंपरिकरित्या वापर केला जातो. शरीराला थंडावा देणे, आम्लपित्ताचा त्रास कमी करण्यास मदत करणे आणि पचनक्रियेला आधार देणे यासाठी त्यांचा वापर केला जातो. पाण्यात भिजवल्यानंतर सब्जा सीड्सवर म्युसिलेज नावाचा जेलीसारखा थर तयार होतो. डॉ. बिराली यांच्या मते, या बियांमधील फायबर पचनसंस्थेला आधार देण्यास आणि पोटाशी संबंधित काही समस्यांमध्ये आराम मिळण्यास मदत करू शकते.

चिया आणि सब्जा सीड्स एकत्र खाल्ल्याने काय होते? जाणून घ्या फायदे

चिया आणि सब्जा सीड्स एकत्र सेवन केल्यास, विशेषतः पाण्यात भिजवून घेतल्यास, शरीराला फायबर, पाणी, अँटीऑक्सिडंट्स आणि आरोग्यदायी फॅट्स मिळू शकतात. यामुळे वजन नियंत्रण, रक्तातील साखरेचे संतुलन आणि आतड्यांच्या हालचालींना मदत होऊ शकते. सल्लागार आहारतज्ज्ञ आणि प्रमाणित मधुमेह शिक्षक कनिका मल्होत्रा यांच्या मते, चिया आणि सब्जा सीड्सचे मर्यादित प्रमाणात एकत्र सेवन करणे बहुतांश लोकांसाठी सुरक्षित असू शकते. दोन्ही बियांमध्ये फायबर, आरोग्यदायी फॅट्स आणि विविध खनिजे असतात, जी संतुलित आहाराचा भाग म्हणून उपयुक्त ठरू शकतात.

चिया आणि सब्जा सीड्स दिवसातून किती खावे? जाणून घ्या योग्य प्रमाण

चिया आणि सब्जा सीड्स पाण्यात भिजवल्यानंतर फुगतात आणि त्यामध्ये फायबरचे प्रमाणही जास्त असते, त्यामुळे त्यांचे अतिप्रमाणात सेवन केल्यास गॅस, पोट फुगणे किंवा पोटात अस्वस्थता जाणवू शकते, त्यामुळे या बियांचे सेवन मर्यादित प्रमाणात करणे महत्त्वाचे आहे. डॉ. बिराली यांच्या मते, बहुतांश लोकांसाठी दिवसातून एक चमचा चिया आणि एक चमचा सब्जा सीड्स घेणे योग्य ठरू शकते. मात्र, व्यक्तीची प्रकृती आणि आहाराची सवय यानुसार प्रमाण वेगळे असू शकते.

या लोकांनी चिया आणि सब्जा सीड्स खाताना विशेष काळजी घ्यावी

ज्या व्यक्तींना दीर्घकाळापासून पचनाशी संबंधित समस्या आहेत किंवा ज्या रक्त पातळ करणारी औषधे घेत आहेत, त्यांनी चिया किंवा सब्जा सीड्सचे नियमित सेवन सुरू करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. कनिका मल्होत्रा यांच्या मते, ज्यांची रक्तातील साखर कमी असते, जे रक्तातील साखर कमी करण्यासाठी औषधे घेतात, गर्भवती किंवा स्तनपान करणाऱ्या महिला, हार्मोन-संवेदनशील आजार असलेल्या व्यक्ती तसेच रक्त पातळ करणारी किंवा इतर विशिष्ट औषधे घेणाऱ्या व्यक्तींनी नियमित सेवन करण्यापूर्वी आहारतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घेणे योग्य ठरते.

सकाळीच चिया आणि सब्जा सीड्स खाणे आवश्यक आहे का? तज्ज्ञ काय सांगतात?

नवी मुंबईतील खारघर येथील मेडिकोव्हर हॉस्पिटलच्या आहारशास्त्र विभागाच्या प्रमुख डॉ. राजेश्वरी पांडा यांच्या मते, सकाळी या दोन्ही बियांचे सेवन केल्याने आतड्यांच्या आरोग्यास मदत होऊ शकते. मात्र, एखाद्या व्यक्तीला उच्च फायबरयुक्त पदार्थ खाण्याची सवय नसेल, तर सुरुवातीला त्याचे कमी प्रमाणात सेवन करणे योग्य ठरते. तज्ज्ञांच्या मते, दररोज दोन्ही बिया एकत्र खाण्याऐवजी एका दिवशी चिया सीड्स आणि दुसऱ्या दिवशी सब्जा सीड्स घेण्याचाही पर्याय निवडता येतो. योग्य प्रमाणात आणि पुरेसे पाणी घेतल्यास या बियांचा आहारात समावेश करणे हा फायबर वाढवण्याचा एक सोपा पर्याय ठरू शकतो.

महत्त्वाचे : चिया किंवा सब्जा सीड्स हे संतुलित आहाराला पर्याय नाहीत. कोणतीही आरोग्यविषयक समस्या, औषधोपचार किंवा विशेष आहाराची गरज असल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच त्याचे नियमित सेवन करावे.