Child Cancer Symptoms: जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) माहितीनुसार, जगभरात दरवर्षी ० ते १९ वर्षे वयोगटातील जवळपास ४ लाख मुले आणि किशोरवयीन मुले कॅन्सरच्या विळख्यात सापडतात. विकसित देशांमध्ये योग्य उपचार मिळाल्यामुळे ८० टक्क्यांहून अधिक मुले बरी होतात. तर विकसनशील देशांमध्ये हे प्रमाण केवळ ३० टक्क्यांच्या आसपास आहे.
भारतातही कॅन्सरचा मोठा परिणाम पाहायला मिळतो. २०१२ ते २०१९ या काळातील आकडेवारीनुसार, मुलांमध्ये आढळणाऱ्या एकूण कॅन्सरच्या प्रकरणांपैकी ३६ टक्के प्रकरणे ल्यूकेमिया म्हणजेच ब्लड कॅन्सरची होती, तर १२ टक्के प्रकरणे लिम्फोमाची होती. या कॅन्सरचे सुरुवातीच्या काळात अनेकदा निदान होत नाही. या कॅन्सरमध्ये शरीरात सतत थकवा जाणवतो आणि वजनही कमी होऊ लागते. बहुतांश प्रकरणांमध्ये कॅन्सरचे निदान उशिरा होते.
डॉक्टरांच्या मते, ल्यूकेमिया हा मुलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कॅन्सर आहे. हा कॅन्सर गंभीर स्वरूपाचा असू शकतो. बोन मॅरो म्हणजेच अस्थिमज्जेमध्ये रक्तपेशींच्या डीएनएमध्ये बदल झाल्यामुळे हा कॅन्सर होतो. कॅन्सरच्या पेशी वेगाने वाढू लागतात आणि निरोगी रक्तपेशांची जागा घेतात. त्यामुळे शरीराची संसर्गाशी लढण्याची आणि शरीराच्या वेगवेगळ्या भागांपर्यंत ऑक्सिजन पोहोचवण्याची क्षमता कमी होते.
वेळीच उपचार न मिळाल्यास हा कॅन्सर जीवघेणाही ठरू शकतो. त्यामुळे त्याची लक्षणे माहीत असणे गरजेचे आहे. जर पालकांना आपल्या मुलामध्ये ही लक्षणे दिसत असतील, तर कॅन्सरची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
काय असतात याची लक्षणे?
- सतत थकवा आणि अशक्तपणा जाणवणे
- वारंवार ताप येणे
- वजन कमी होणे
- त्वचेवर सहज निळे डाग पडणे
पर्सनल ट्रीटमेंट ठरत आहे फायदेशीर
दिलासादायक बाब म्हणजे आता वैद्यकीय क्षेत्रात मोठे बदल होत आहेत. योग्य आणि अचूक उपचारांमुळे हा कॅन्सर बरा होऊ शकतो. आता मुलाच्या जेनेटिक प्रोफाइल आणि बायोमार्करचा अभ्यास करून त्याच्यासाठी योग्य असा पर्सनल ट्रीटमेंट दिला जाऊ शकतो.
अमेरिकेच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट (NCI) नुसार, आता ९८ टक्के मुले सुरुवातीच्या उपचारानंतर रिकव्हर होतात आणि ९० टक्क्यांहून अधिक मुले उपचारानंतर ५ वर्षांनीही निरोगी आयुष्य जगत आहेत.
CAR-T थेरपीद्वारे होत आहे उपचार
CAR-T थेरपी ही कॅन्सरच्या उपचारातील सर्वात आधुनिक पद्धतींपैकी एक आहे. यामध्ये रुग्णाच्या शरीरातून T सेल्स काढले जातात. त्यानंतर प्रयोगशाळेत या पेशींमध्ये अशा प्रकारे बदल केले जातात की त्या कॅन्सरच्या पेशी ओळखून त्यांना स्वतः नष्ट करू शकतील. ज्या मुलांवर आधीची औषधे काम करणे बंद करतात, अशा मुलांमध्ये CAR-T थेरपीनंतर ७० ते ९० टक्क्यांपर्यंत सुधारणा दिसून आली आहे.
क्रायोविवा लाइफसाइंसच्या मेडिकल प्रवक्त्या डॉ. गीतिका जस्सल सांगतात की, आता कॅन्सरच्या उपचारांमध्ये कॉर्ड ब्लड म्हणजेच नाळेच्या रक्ताचे संकलन, सुरक्षित साठवणूक आणि सेल्सशी संबंधित संशोधनाची गुणवत्ता सुधारण्यावर अधिक भर दिला जात आहे. एकूणच, आता मुलांमधील कॅन्सरचा उपचार केवळ कडू औषधे आणि रेडिएशनपुरता मर्यादित राहिलेला नाही.
(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
