Children’s Day Surprise Ideas: बालपणीचा काळ म्हणजे जणू सुखाचा खजिनाच. मला चंद्रावर जायचं आहे, मला आकाशात उडायचं आहे, मला रॉकेट बनवायचं अशा किती तरी निरागस इच्छा बालपणी प्रत्येक जण आपल्या उराशी बाळगून असतो. बालपणी हसायला कारण नको, रडायलाही कारण नको आणि बागडायला उड्या मारायला तर अजिबातच कारण नको. असंच असतं हे निरागस बालपण. हे बालपण खऱ्या अर्थाने कोणत्याही वयाचे लोक साजरे करू शकतात असा प्रत्येकाचा हक्काचा दिवस म्हणजे बालदिन. दरवर्षी १४ नोव्हेंबर रोजी पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म दिन बालदिन म्हणून साजरा केला जातो. तेव्हा तुमच्या घरात जर लहान मुलं असतील तर त्यांच्यासाठी तर हा दिवस स्पेशल बनवाच पण तुम्ही सुद्धा पुन्हा एकदा लहान होऊन त्यांच्यासोबत हा दिवस जगा.

तर यावर्षी तुम्हाला तुमच्या मुलांचा बालदिन काहीसा स्पेशल करायचा असेल, तर आमच्याकडे काही आयडियाज आहेत. दरवर्षी बालदिन म्हटलं की मुलांना या दिवसाचा खूपच उत्साह असतो. या दिवशी शाळांमध्ये वगैरे वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात. या दिवशी जर तुम्हाला मुलांना सरप्राईज द्यायचं असेल तर काही खास गोष्टी नक्की करा, त्या कोणत्या ते नक्की वाचा…

मुलांसाठी सजावट करा

प्रत्येक घरात मुलांसाठी वेगळी अशी खोली नसते, पण ज्यांच्याकडे आहे त्यांनी मुलांची खोली त्यांना आवडणाऱ्या रंगांनी, फुग्यांनी किंवा चित्रांनी डेकोरेट करा. मुलं शाळेतून आल्यावर हे पाहून त्यांना नक्कीच आनंद मिळेल.

मुलांच्या आवडीचे खाद्यपदार्थ बनवा

शक्य असल्यास मुलांसाठी अगदी सकाळच्या नाश्त्यापासून ते संध्याकाळच्या जेवणापर्यंतचा मेन्यू स्पेशल करा.

मुलांची आवड ओळखा

प्रत्येक मुलाची आवड वेगळी असते. बालदिनाला तुम्ही मुलांना त्यांच्या आवडीच्या पुस्तकांबाबत किंवा गेम्सबाबत तसंच खेळाच्या आवडीबाबत विचारू शकता. तसंच त्याच्याशी संबंधित त्यांना भेटवस्तू देऊ शकता. जर तुमच्या मुलाला पेंटिंग आवडत असेल तर कलरचे सेट किंवा इतर साहित्य त्याला सरप्राईज म्हणून देऊ शकता. या दिवशी मुलांना फक्त त्यांच्या आवडीच्या गोष्टी करू द्या.

मुलांना मित्रांसोबतही मजा करू द्या

तुम्ही घरी तुमच्या मुलांच्या मित्रांसोबत छोटाशा पार्टीचं नियोजन करू शकता. त्यांना वेगवेगळे गेम्स किंवा खाऊ देऊन त्यांचा दिवस सेलिब्रेट करून देऊ शकता.