Rajma vs chole Experts explain which has more protein : जर तुम्ही शाकाहारी असाल आणि तुमच्या आहारातील प्रथिनांचे प्रमाण वाढवू इच्छित असाल. तर तुम्हाला कधी ना कधी हा प्रश्न पडला असेल राजमा आणि छोले यांपैकी कशामध्ये जास्त प्रथिने असतात? तर सुक्या राजमा आणि छोल्यांची तुलना केल्यास, राजमा सरस ठरतो. पण, शिजवल्यानंतर या दोन्हींमधील फरक लक्षणीयरीत्या कमी होतो. तर अधिक प्रथिने कशातून मिळतात आणि ते खाण्याची योग्य पद्धत कोणती आहे? याबद्दल जाणून घेऊ…

राजमा की छोले ; कशामध्ये जास्त प्रथिने असतात?

राजमा आणि छोले हे दोन्ही प्रथिनांचे स्वस्त, सहज उपलब्ध होणारे आणि शाकाहारी स्रोत आहेत. ‘द इंडियन एक्सप्रेस’शी बोलताना, बंगळुरू येथील सक्रा वर्ल्ड हॉस्पिटलच्या प्रमुख क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट प्राची चंद्रा यांनी स्पष्ट केले की, १०० ग्रॅम सुक्या राजमामध्ये अंदाजे २३ ते २४ ग्रॅम प्रथिने असतात. तर १०० ग्रॅम छोल्यांमध्ये अंदाजे १९ ग्रॅम प्रथिने असतात. त्यामुळे वजनाच्या तुलनेत राजमा सरस ठरतो. पण, जेव्हा राजमा आणि छोले शिजवले जातात. तेव्हा ते पाणी शोषून घेतात. यामुळे त्यांचे वजन वाढते आणि प्रति १०० ग्रॅम प्रथिनांचे प्रमाण बदलते. त्यामुळे, शिजवलेल्या प्रमाणात या दोन्हींमधील फरक लक्षणीयरीत्या कमी होतो.

आयएसआयसी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलचे इंटर्नल मेडिसिन आणि रेस्पिरेटरी सर्व्हिसेसचे संचालक, डॉक्टर (कर्नल) विजय दत्ता यांच्या मते, सुमारे एक कप शिजवलेल्या राजमामध्ये अंदाजे १३ ते १५ ग्रॅम प्रथिने असू शकतात. तेवढ्याच प्रमाणात शिजवलेल्या चण्यांमधून अंदाजे १४ ते १५ ग्रॅम प्रथिने मिळू शकतात. राजमा किंवा छोल्यांचा प्रकार, शिजवण्याची पद्धत आणि खाण्याच्या प्रमाणावर अवलंबून हे प्रमाण थोडे बदलू शकते.

शिजवल्याने राजमा आणि छोल्यांमधील प्रथिनांचे प्रमाण कमी होते का?

बऱ्याच लोकांना वाटते की कडधान्ये किंवा डाळी शिजवल्याने त्यातील प्रथिनांचे प्रमाण कमी होते. मात्र, हे पूर्णपणे खरे नाही. प्राची चंद्रा यांनी सांगितले की, राजमा किंवा चणे शिजवल्याने त्यातील प्रथिनांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होत नाही. उलट, ते व्यवस्थित शिजवल्याने मऊ होतात आणि पचण्यासही सोपे जातात. राजमा आणि चणे ८ ते १० तास भिजवून, भिजवलेले पाणी फेकून द्यावे. त्यानंतर ते पूर्णपणे उकळून किंवा प्रेशर कुकरमध्ये शिजवावेत. यामुळे पचनास त्रासदायक ठरू शकणारे काही नैसर्गिक घटक कमी होण्यास मदत होते. यामध्ये फायटेट्स आणि लेक्टिन्ससारख्या अँटीन्यूट्रिएंट्सचा समावेश होतो. हे घटक काही पोषकद्रव्यांच्या शोषणावर परिणाम करू शकतात आणि काही लोकांना गॅस किंवा पोट फुगण्यासारख्या समस्या जाणवू शकतात.

पण, या गोष्टी नेहमी लक्षात ठेवा

कच्चा किंवा अर्धवट शिजवलेला राजमा खाणे टाळा. त्यामध्ये फायटोहेमॅग्लुटिनिन नावाचा नैसर्गिक घटक असतो, ज्यामुळे मळमळ, पोटदुखी किंवा इतर पचनाच्या समस्या होऊ शकतात. त्यामुळे राजमा पूर्णपणे मऊ होईपर्यंत व्यवस्थित शिजवणे महत्त्वाचे आहे. शिजवताना काही पाण्यात विरघळणारी जीवनसत्त्वे कमी होऊ शकतात. मात्र, राजमा आणि छोल्यांमधील बहुतांश प्रथिने शिजवल्यानंतरही टिकून राहतात.

कॅलरीज, फायबर आणि कर्बोदकांच्या बाबतीत दोघांपैकी कोण बेस्ट आहे?

राजमा आणि छोल्यांचा विचार केवळ प्रथिनांच्या दृष्टिकोनातून करणे योग्य ठरणार नाही. दोन्हींमध्ये फायबर, कर्बोदके, जीवनसत्त्वे आणि खनिजे देखील असतात. सुमारे एक कप (अंदाजे १६० ग्रॅम) शिजवलेल्या राजमामध्ये अंदाजे २१० कॅलरीज, ३८ ग्रॅम कर्बोदके आणि १२ ते १३ ग्रॅम फायबर
आणि शिजवलेल्या छोल्यांमध्ये अंदाजे २५० कॅलरीज, ४० ग्रॅम कर्बोदके आणि ११ ग्रॅम फायबर असतात.

दोन्ही लोह आणि फोलेटचे चांगले स्रोत आहेत. छोल्यांमध्ये मॅग्नेशियम आणि मॅंगनीजसारखी पोषक तत्वे देखील असतात. डॉक्टर विजय दत्ता यांच्या मते, दोन्ही पौष्टिक पदार्थ आहेत आणि त्यांमध्ये प्रथिने, फायबर, जटिल कर्बोदके, जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात. त्यामुळे, प्रत्येक बाबतीत एकाला श्रेष्ठ ठरवणे योग्य ठरणार नाही.

जर कमी कॅलरीजमध्ये जास्त प्रथिने आणि फायबर घेणे हे तुमचे प्राधान्य असेल. तर राजमा थोडा अधिक फायदेशीर ठरू शकतो. तर दुसरीकडे, छोल्यांमध्ये थोडे अधिक आरोग्यदायी फॅट्स आणि पोषक तत्वे असतात, जे दीर्घकाळ टिकणारी ऊर्जा प्रधान करतात.

शाकाहारी लोकांनी राजमा खावा की छोले?

सर्वात सोपे उत्तर म्हणजे आपल्या आहारात दोघांचाही समावेश करणे. डॉक्टर दत्ता केवळ एकावर अवलंबून राहण्याऐवजी विविध प्रकारची कडधान्ये आणि डाळी खाण्याची शिफारस करतात. राजमा, छोले या दोन्हींमधून वनस्पती-आधारित प्रथिने, फायबर आणि आवश्यक सूक्ष्म पोषक तत्वे मिळतात. वेगवेगळी कडधान्ये, डाळी खाल्ल्याने शरीराला वेगवेगळी पोषक तत्वे मिळतात. मांसाहारी पदार्थांवर अवलंबून न राहता प्रथिनांची दैनंदिन गरज पूर्ण करणे सोपे होऊ शकते.

केवळ राजमा किंवा छोले तुमच्या प्रथिनांची गरज पूर्ण करतील का?

राजमा आणि छोले हे स्वतःहून संपूर्ण प्रथिने नाहीत. त्यामध्ये आवश्यक अमिनो आम्ल मेथिओनाइनचे प्रमाण तुलनेने कमी असते. पण, याचा अर्थ असा नाही की, राजमा किंवा छोले प्रथिनांचे चांगले स्रोत नाहीत. फक्त, त्यांना इतर घटकांसोबत एकत्र केल्याने जेवणाचे पौष्टिक मूल्य वाढू शकते.

राजमा, भात आणि छोले यांचे मिश्रण चांगले का आहे?

तुमच्या लक्षात आले असेल की, राजमा-भात आणि छोले हे भारतीय खाद्यसंस्कृतीतील लोकप्रिय पदार्थ आहेत. चविष्ट असण्याबरोबर त्यामध्ये अनेक पोषक घटकही असतात.

डॉक्टर दत्ता राजमा आणि चण्यांसोबत दही, चीज, टोफू, सोया किंवा अंडी यांसारखे प्रथिनयुक्त पदार्थ घेण्याचा सल्ला देतात. तुमच्या आहारपद्धतीनुसार तुम्ही यापैकी योग्य पर्याय निवडू शकता.

राजमा किंवा छोले रोटी, ब्राऊन राईस यांसारख्या संपूर्ण धान्यांसोबत खाल्ल्यास जेवण अधिक संतुलित होऊ शकते. तसेच, भाज्या आणि सॅलडचा समावेश केल्याने आहारातील फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजांचे प्रमाण वाढण्यास मदत होते.

तुमच्या ताटात प्रथिने कशी वाढवावी?

जर तुम्हाला रोजच्या राजमा किंवा चण्याच्या ताटातील प्रथिनांचे प्रमाण वाढवायचे असेल, तर त्यासोबत दही, पनीर, टोफू, सोया किंवा अंडी यांसारख्या प्रथिनयुक्त पदार्थांचा समावेश करू शकता.