पाणी आणि साबणामुळे केवळ वैयक्तिक स्वच्छता होत नसून, पाकिस्तान आणि बांग्लादेश येथे केलेल्या सर्वेक्षणानुसार हे दोन्ही घटक मुलांच्या वाढीस चालना देण्यासाठीदेखील उपयोगी असल्याचे आढळून आले आहे. या सर्वेक्षणानुसार, स्वच्छ पाणी आणि साबण वापरणा-या पाच वर्षांखालील मुलांच्या वाढीमध्ये काही लक्षणीय सुधारणा झाल्याचे पुरावे मिळाले आहेत.
लंडन स्कूल ऑफ हायजिन अॅण्ड ट्रॉपिकल मेडिसिन अॅण्ड वॉटरएडच्या संशोधकांनी कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये (बांगलादेश, इथिओपिया, नायजेरिया, चिली, ग्वाटेमाला, पाकिस्तान, नेपाळ, दक्षिण आफ्रिका, केनिया आणि कंबोडिया) केलेल्या १४ सर्वेक्षणांच्या आधारे पाणी आणि स्वच्छतेचा ९४६९ मुलांच्या वाढीवर झालेल्या परिणामाचा अहवाल सादर केला. या अहवालानुसार, घरगुती पाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठीची उपाययोजना केल्यामुळे तसेच साबण वापरण्याचा सल्ला दिल्याने मुलांच्या सरासरी उंचीमध्ये ०.५ से.मी इतकी वाढ झाल्याचे निदर्शनास आले.
सर्वेक्षणकर्ता डॉ. अलान डॅन्गॉर म्हणाले की, या उपाययोजनेच्या वापरामुळे वाढत्या वयाच्या मुलांवर छोटा पण महत्वाचा परिणाम होत असल्याचे प्रथमच केलेल्या अशाप्रकारच्या सर्वेक्षणातून दिसून आले. परंतु, उपलब्ध पुराव्यांमध्ये काही महत्वाच्या उणीवा असल्याने आमचा असा अंदाज आहे की, स्वच्छ पाण्याच्या वापराने आणि हात धुण्याच्या सवयीमुळे पाच वर्षांखालील मुलांच्या वाढ खुंटण्याच्या प्रभावात १५ टक्क्यांपर्यत घट होऊ शकते.
स्वच्छ पाण्याचा वापर आणि स्वच्छता या गोष्टी मुलांमधील कुपोषणासारख्या जागतिक मुद्दयास हाताळण्याची साधने होऊ शकतात, असा महत्वाचा शोध लावल्याचेही डॉ. डॅन्गॉर म्हणाले. कमी उंची आणि खुंटणा-या वाढीचा परिणाम जगभरातील १६५ दशलक्ष मुलांवर होत आहे. यामुळे त्यांच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर दीर्घकालीन परिणाम, मृत्यूच्या धोक्यामध्ये वाढ आणि त्यांच्या वयात येण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो. वर्षाकाठी पाच वर्षांखालील मृत्यू पावणा-या मुलांपैकी ४५ टक्के मुलांचा मृत्यू कुपोषणाने होत असल्याचे संशोधकांचे म्हणणे आहे.
त्यामुळे मुलांना पौष्टिक आहार, स्वच्छ पाणी आणि स्वच्छतेच्या चांगल्या सवयी लावण्याची गरज आहे. या सवयींमुळे त्यांच्यातील आजाराचे आणि मृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकते.