Home Tips: बेडशीट बदलल्याने तुमचा बेड पूर्णपणे स्वच्छ होतो, असे आपल्याला वाटते; पण तसे नाही. तुम्ही बेडशीट जरी बदलली तरी गादीवर धूळ, घाणेरडे डाग तसेच असतात, ज्यामुळे तुम्ही आजारी पडू शकता. त्यामुळे रोज फक्त बेडशीट बदलून काही फायदा नाही, त्यावेळी गादीदेखील स्वच्छ करणे गरजेचे आहे. पण, गादी वजनाने जड असल्याने ती स्वच्छ करायची तरी कशी, असा प्रश्न पडतो. त्यामुळे आपण गादीवर डाग पडले तरी ते तात्पुरते साफ करून मोकळे होतो. गादी पाण्याने ओली झाली, तर ती उन्हात ठेवतो. पण, त्यानंतरही गादीमध्ये धूळ, घाण तशीच असते. अशा वेळी तुम्ही खालील पाच क्लिनिंग टिप्स वापरून गादी काही मिनिटांत स्वच्छ करू शकता.
गादीच्या नियमित वापरामुळे त्यावर धुळीचे कण, घाम आणि कधी कधी बुरशी आणि जीवाणूदेखील जमा होऊ लागतात. या गोष्टींमुळे त्वचेला खाज सुटते आणि शिंकादेखील येतात. जर तुम्ही दर चार-पाच महिन्यांनी गादी फिरवून वापरली किंवा ती उन्हात ठेवली तरी या समस्या निर्माण होतात.
गादी स्वच्छ करण्यासाठी सोप्या ट्रिक्स
व्हॅक्युम क्लीनरने स्वच्छ करा
तुम्ही तुमची गादी स्वच्छ करण्यासाठी हॅक्युम क्लीनरचा वापर करू शकता. त्यामुळे गादीवरील धूळ आणि केस सहजपणे निघून जाऊ शकतात. जर तुमच्याकडे व्हॅक्युम क्लीनर नसेल, तर तुम्ही ब्रशने गादी झाडू शकता.
बेकिंग सोड्याने दुर्गंधी दूर करा
कधी कधी घाम, धूळ, घाण व जीवाणूंमुळे गादीला घाण वास येऊ शकतो. हा दुर्गंध दूर करण्यासाठी तुम्ही बेकिंग सोडा वापरू शकता. सर्वांत आधी गादीच्या पृष्ठभागावर बेकिंग सोड्याचा हलका थर शिंपडा. तो चार-पाच तास तसाच राहू द्या. काही वेळाने व्हॅक्युम क्लीनर किंवा ब्रशने तो काढून टाका. बेकिंग सोडा गादीतील ओलसरपणा आणि दुर्गंध शोषून घेतो.
गादी उन्हात ठेवा
कधी कधी दीर्घकाळ वापरल्यामुळे गादीमध्ये जंतू आणि जीवाणू जमा होऊ शकतात. अशा परिस्थितीत तुम्ही गादी सूर्यप्रकाशात ठेवू शकता. महिन्यातून दोन ते तीन वेळा गादी उन्हात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. अशाने गादीतील घाण, ओलावा कमी होतो, तसेच उन्हामुळे जीवाणूदेखील मरण पावतात.
जर घरात ऊन येत नसेल, तर खोलीच्या खिडक्या उघडून ठेवा आणि पंखा चालू ठेवा, तुम्ही गादी हवेशीर ठिकाणी ठेवून, त्यातील ओलावा आणि जीवाणू कमी करू शकता.
