Clove Benefits : लवंग हा जवळपास प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज आढळणारा गरम मसाल्यातील एक पदार्थ आहे. आयुर्वेदामध्येही लवंगेला औषधी गुणधर्मांनी युक्त मानले जाते. त्यामध्ये अँटी-ऑक्सिडंट, अँटी-बॅक्टेरियल व दाहशामक (अँटी-इन्फ्लेमेटरी) गुणधर्म असतात, जे शरीराला विविध प्रकारे फायदेशीर ठरतात. दररोज एक लवंग खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो आणि त्याचे कोणते फायदे मिळतात, हे येथे जाणून घ्या.
पचनक्रियेत सुधारणा
दररोज लवंग खाल्ल्याने पचनसंस्थेला फायदा होऊ शकतो. लवंगेमधील घटक गॅस, अपचन व पोट फुगणे यांसारख्या समस्या कमी करण्यास मदत करतात. सकाळी रिकाम्या पोटी लवंग चावून खाल्ल्याने पचनसंस्थेतील विकरांचे कार्य सुधारू शकते.
मुखदुर्गंधी दूर करण्याची क्षमता
लवंग नैसर्गिक मुखशुद्धी करणारा घटक (माऊथ फ्रेशनर) म्हणून काम करते. त्यातील जीवाणूविरोधी गुणधर्म तोंडातील हानिकारक जीवाणू कमी करण्यास मदत करतात, ज्यामुळे तोंडाची दुर्गंधी नाहीशी होऊ शकते.
रोगप्रतिकार शक्तीच्या मजबुतीला साह्य
लवंगेमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीराचे ‘फ्री रॅडिकल्स’पासून संरक्षण करण्यास मदत करतात. त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती मजबूत होऊ शकते आणि संसर्गाचा धोका कमी होतो.
दातदुखीपासून आराम
लवंगेमध्ये युजेनॉल नावाचा घटक असतो, जो नैसर्गिक वेदनाशामक म्हणून काम करतो. म्हणूनच दातदुखीवर लवंग चावणे किंवा लवंगाचे तेल लावणे फायदेशीर मानले जाते.
रक्तशर्करा नियंत्रणास हातभार
लवंग शरीरातील इन्सुलिनची कार्यक्षमता सुधारण्यास मदत करू शकते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहण्यास हातभार लागतो.
लक्षात ठेवण्यासारख्या गोष्टी
लवंगांचे सेवन मर्यादित प्रमाणात करावे. अतिसेवनामुळे पोटात जळजळ, ॲसिडिटी किंवा ॲलर्जीसारख्या समस्या उदभवू शकतात. गर्भवती महिला आणि गंभीर आजार असलेल्या व्यक्तींनी लवंगांचे नियमित सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
दररोज किती लवंगांचे सेवन करावे?
तज्ज्ञांच्या मते, दररोज एक ते दोन लवंगांचे सेवन करणे साधारणपणे सुरक्षित मानले जाते. त्यामुळे दुष्परिणामांचा धोका कमी राहून, लवंगांचे फायदे मिळवता येतात.
