Natural Sleep Remedies: दिवसभर काम करून शरीर थकलेलं असतं, डोळ्यांवर झोपही येत असते; पण रात्री अंथरुणावर पडल्यावर मात्र झोपेचं नावच नसतं. कधी मनात सतत विविध विचारधारा सुरू असतात, तर कधी मोबाईल पाहण्याची सवय झोपेच्या वेळेवर परिणाम करते. काही जणांना झोप लागली तरी मध्यरात्री वारंवार जाग येते. सकाळी उठल्यानंतरही पुरेशी विश्रांती मिळाल्यासारखी वाटत नाही. परिणामी दिवसभर थकवा, चिडचिड आणि कामात लक्ष न लागण्यासारख्या समस्या जाणवू शकतात.
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत झोपेच्या समस्या अनेकांना जाणवतात. कामाचा ताण, मानसिक चिंता, रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरणे आणि अनियमित दिनक्रम यांमुळे झोपेचं वेळापत्रक बिघडू शकतं. त्यामुळे चांगली झोप मिळावी यासाठी अनेक जण घरगुती उपायांचाही आधार घेतात. विशेष म्हणजे आपल्या स्वयंपाकघरात सहज उपलब्ध असलेल्या एका मसाल्याच्या पाण्याची सध्या चर्चा केली जात आहे. या मसाल्यामध्ये काही नैसर्गिक घटक असतात, ज्यांचा अभ्यासही करण्यात आला आहे. मात्र, हे पाणी प्यायल्यानं निद्रानाश दूर होतो किंवा गाढ झोप लागते, याचा ठोस पुरावा अद्याप उपलब्ध नाही. तरीही या मसाल्याचे इतर संभाव्य फायदे आणि त्याचा वापर कसा केला जातो, हे जाणून घेऊया.
१. पोटाच्या आरोग्यासाठी ठरू शकतो उपयोगी
काही वेळा रात्री जेवणानंतर पोट जड होणे, गॅस होणे किंवा पोट फुगल्यासारखे वाटणे यांमुळे झोपताना अस्वस्थता जाणवते. अशा वेळी पचनाशी संबंधित तक्रारींकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. काही मसाल्यांमध्ये पचनाशी संबंधित गुणधर्मांचा अभ्यास करण्यात आला आहे. त्याचे पाणी प्यायल्याने गॅस किंवा अपचन कमी होऊ शकते. .
२. शरीराला मिळू शकतात अँटिऑक्सिडंट घटक
काही मसाल्यांमध्ये अँटिऑक्सिडंट गुणधर्म असलेले नैसर्गिक घटक आढळतात. हे घटक शरीरातील पेशींना ऑक्सिडेटिव्ह ताणापासून संरक्षण मिळण्यास मदत करू शकतात. त्यामुळे आहारात योग्य प्रमाणात मसाल्यांचा समावेश करणं फायदेशीर ठरू शकतं.
३. मनाला शांत ठेवण्यासाठी झोपेच्या सवयी सुधारा
रात्री शांत झोप मिळण्यासाठी शरीर आणि मन दोन्ही विश्रांतीच्या स्थितीत असणं आवश्यक आहे. झोपण्यापूर्वी मोबाईलचा वापर कमी करणे, खोलीतील प्रकाश मंद ठेवणे, रोज ठरावीक वेळी झोपणे आणि संध्याकाळनंतर चहा-कॉफीचं प्रमाण कमी करणे या सवयी उपयोगी ठरू शकतात. एखादं कोमट पेय घेतल्यानं काही लोकांना आराम मिळाल्याचा अनुभव मिळू शकतो.
४. रक्तातील साखरेबाबतही काही संशोधन
या मसाल्यातील युजेनॉल नावाच्या नैसर्गिक घटकाचा आरोग्याच्या दृष्टीनं अभ्यास करण्यात आला आहे. काही प्राथमिक संशोधनांमध्ये लवंगाच्या विशिष्ट अर्काचा रक्तातील साखरेच्या पातळीवर होणारा परिणाम तपासण्यात आला आहे. मात्र, हे संशोधन मर्यादित स्वरूपाचं आहे. त्यामुळे मधुमेह असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांनी दिलेली औषधं आणि आहाराचं नियोजन सुरूच ठेवावं.
५. तोंडाच्या आरोग्यासाठीही चर्चेत
काही मसाल्यांमध्ये जीवाणूंची वाढ रोखण्यास मदत करणारे घटक असतात. त्यामुळे त्यांचा वापर पारंपरिक पद्धतीनं दात आणि हिरड्यांच्या आरोग्यासाठीही केला जातो.
कोणता आहे हा स्वयंपाकघरातील मसाला? कसे तयार करायचे त्याचे पाणी?
आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, हा नेमका कोणता मसाला आहे, ज्याचा उल्लेख आपण आतापर्यंत केला? तर हा मसाला म्हणजे प्रत्येक भारतीय स्वयंपाकघरात सहज आढळणारी लवंग!
लवंगेमध्ये युजेनॉल नावाचा नैसर्गिक घटक असतो. त्यामध्ये अँटिऑक्सिडंट आणि प्रयोगशाळेतील अभ्यासांमध्ये दिसून आलेले काही जीवाणूरोधक गुणधर्म आहेत. त्यामुळे लवंगेचा वापर अनेक वर्षांपासून स्वयंपाकात आणि पारंपरिक घरगुती उपायांमध्ये केला जातो.
लवंगांचे पाणी तयार करण्यासाठी एका भांड्यात एक कप पाणी घ्या. त्यामध्ये दोन ते तीन लवंगा टाकून साधारण पाच ते सात मिनिटे मंद आचेवर गरम करा. त्यानंतर पाणी गाळून घ्या. ते पाणी कोमट होईपर्यंत थांबा. आता तयार झाले बघा तुम्हाला हवे असलेले लवंगांचे औषधी पेय. मात्र, हे पेय प्यायल्याने गाढ झोप लागते, असे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले नाही. विशेषतः औषधोपचार सुरू असतील, गर्भधारणा असेल किंवा रक्त पातळ करणारी औषधे घेत असाल, तर नियमित सेवन करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या. लवंगांचे तेल किंवा त्याचे अति प्रमाणात सेवन टाळा.
(महत्त्वाचे : झोपेची समस्या सतत जाणवत असेल, तर केवळ घरगुती उपायांवर अवलंबून राहू नका. झोपेच्या योग्य त्या सवयी अंगीकारा आणि गरज भासल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. लवंगांचे पाणी हा निद्रानाशावरील सिद्ध उपचार नाही.)
