Clove Water Benefits for Digestion: पोटासंबंधित आजारांवर लवंग हा एक गुणकारी उपाय आयुर्वेदात मानला जातो. पोट फुगणे, अपचन, पोटाची सूज आणि आतड्यांशी संबंधित समस्यांवर हे नैसर्गिक उपाय म्हणून वापरण्याचा सल्ला दिला जातो. मात्र, लवंगाचं पाणी प्यायल्याने या सर्व समस्या दूर होतात का? यामागे खरंच वैज्ञानिक आधार आहे का? एनेस्थेसियोलॉजिस्ट आणि इंटरव्हेन्शनल पेन मेडिसिन फिजिशियन डॉ. कुणाल सूद यांनी लवंगाच्या पाण्याबाबत उपलब्ध संशोधन आणि त्यातील सक्रिय घटकांविषयी माहिती दिली आहे.
लवंगामध्ये असलेला ‘हा’ घटक ठरतो महत्त्वाचा
लवंगामध्ये यूजेनॉल (Eugenol) नावाचा जैविकदृष्ट्या सक्रिय घटक आढळतो. यामध्ये अँटिऑक्सिडंट आणि दाह कमी करण्यास मदत करणारे गुणधर्म असल्याचे काही संशोधनातून दिसून आले आहे. डॉ. सूद यांच्या मते, यूजेनॉल पचनसंस्थेतील स्नायूंना आराम देण्यास आणि पचनक्रियेला मदत करण्यास हातभार लावू शकतो. त्यामुळे काही व्यक्तींना लवंगाचं पाणी घेतल्यानंतर पोट फुगणे किंवा पोटातील अस्वस्थता कमी झाल्यासारखी वाटू शकते.
पोट फुगणे आणि अपचनावर किती परिणाम?
लवंगामध्ये असलेल्या घटकांमुळे पचनासाठी काही संभाव्य फायदे मिळू शकतात. मात्र, याचा अर्थ असा नाही की लवंगाचं पाणी प्रत्येक व्यक्तीमध्ये अपचन किंवा पोट फुगण्याचा त्रास निश्चितपणे दूर करेल. सोशल मीडियावर केले जाणारे “लवंगाचं पाणी प्यायल्याने लगेच पोट साफ होते”, “सगळी सूज दूर होते” किंवा “आतड्यांतील समस्या बऱ्या होतात” असे दावे पुरेशा वैज्ञानिक पुराव्यांनी सिद्ध झालेले नाहीत.
लिव्हर डिटॉक्स करण्याचा दावा कितपत खरा?
लवंगाचं पाणी रातोरात लिव्हर डिटॉक्स करते, शरीरातील सर्व विषारी पदार्थ बाहेर काढते किंवा रोगप्रतिकारक शक्ती मोठ्या प्रमाणात वाढवते, यासाठी ठोस वैज्ञानिक पुरावे उपलब्ध नाहीत, असं डॉ. सूद सांगतात. म्हणूनच लवंगाच्या पाण्याकडे एखाद्या चमत्कारी औषधाप्रमाणे पाहण्याऐवजी ते संतुलित आहाराचा एक छोटा भाग म्हणून पाहणं योग्य ठरू शकतं.
मग लवंगाचं पाणी प्यावं का?
लवंग हे मसाल्याच्या स्वरूपात आहाराचा भाग असू शकते. त्यातील यूजेनॉलसारख्या घटकांमुळे काही संभाव्य आरोग्यदायी गुणधर्म असू शकतात. मात्र, पोटाच्या प्रत्येक समस्येवर लवंगाचं पाणी हा उपचार नाही. पचन चांगलं ठेवण्यासाठी पुरेशी झोप, संतुलित आहार, नियमित व्यायाम, पुरेसं पाणी आणि ताणतणावाचं व्यवस्थापन या गोष्टी अधिक महत्त्वाच्या आहेत. पोट फुगणे, अपचन, पोटदुखी किंवा आतड्यांशी संबंधित त्रास वारंवार होत असेल किंवा दीर्घकाळ टिकत असेल, तर केवळ घरगुती उपायांवर अवलंबून न राहता डॉक्टरांचा सल्ला घेणं महत्त्वाचं आहे.
