Cockroach Upay in Marathi: घरात झुरळं दिसणं ही खूप सामान्य समस्या आहे, पण त्यांच्याकडे दुर्लक्ष करणं महागात पडू शकतं. हे छोटे किडे दिसायला साधे वाटले तरी ते अन्न खराब करतात आणि अनेक प्रकारचे जंतू पसरवतात. विशेषतः स्वयंपाकघरात झुरळं असणं आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतं. बरेच लोक झुरळं घालवण्यासाठी बाजारातील केमिकलची औषधं वापरतात, पण त्याचा परिणाम जास्त काळ टिकत नाही आणि कधी कधी ते आरोग्यासाठीही हानिकारक ठरू शकतात. अशा वेळी घरात सहज मिळणाऱ्या साध्या वस्तूंनीही झुरळांपासून सुटका मिळू शकते, फक्त योग्य पद्धत वापरण्याची गरज आहे.
झुरळं साधारणपणे तिथे वाढतात जिथे ओलावा, घाण आणि अन्नाचे छोटे-छोटे कण असतात. सिंकखाली, गॅसजवळ, फ्रिजच्या मागे आणि कपाटाच्या कोपऱ्यांत ती सहज लपून बसतात. वेळेत याकडे लक्ष दिलं नाही, तर त्यांची संख्या खूप वेगाने वाढू लागते. त्यामुळे घर स्वच्छ ठेवण्यासोबत काही सोपे घरगुती उपाय करणं खूप गरजेचं आहे. यामुळे झुरळं मुळापासून नष्ट होण्यास मदत होते आणि ती पुन्हा येणंही थांबतं.
बेकिंग सोडा आणि साखरेचा सोपा उपाय
झुरळं घालवण्यासाठी बेकिंग सोडा आणि साखरेचं मिश्रण खूप उपयोगी मानलं जातं. दोन्ही समान प्रमाणात मिसळून झुरळं जास्त दिसतात त्या ठिकाणी ठेवा. साखरेच्या गोड वासामुळे झुरळं तिकडे आकर्षित होतात आणि बेकिंग सोडा त्यांच्या शरीरावर परिणाम करून त्यांना नष्ट करतो.
तमालपत्रामुळे झुरळं पळून जातात
किचनमध्ये असलेलं तमालपत्रही झुरळं दूर पळवण्यासाठी मदत करतं. त्याचा तीव्र वास झुरळांना अजिबात आवडत नाही. तुम्ही ते कुटून किंवा तसेच स्वयंपाकघराच्या कोपऱ्यांत, ड्रॉवरमध्ये आणि कपाटात ठेवू शकता.
कडुलिंबाचा वापर फायदेशीर ठरतो
कडुलिंबात नैसर्गिक किडे दूर ठेवण्याचे गुण असतात, त्यामुळे झुरळं दूर ठेवायला मदत होते. तुम्ही कडुलिंबाची पानं वाळवून त्याची पावडर करा आणि झुरळं येतात त्या ठिकाणी ती हलकी शिंपडा.
पुदिन्याच्या तेलाचा स्प्रे
पुदिन्याच्या तेलाचा वासही झुरळांना आवडत नाही. पाण्यात त्याचे काही थेंब मिसळून स्प्रे तयार करा आणि तो किचनच्या कोपऱ्यात, सिंकजवळ आणि भेगांमध्ये फवारा. हा एक सुरक्षित आणि नैसर्गिक उपाय आहे.
व्हिनेगरने करा स्वच्छता
व्हिनेगर आणि पाणी मिसळून किचन साफ केल्याने झुरळं दूर राहतात. यामुळे त्यांचा वास आणि ते येण्याचे मार्ग नष्ट होतात, त्यामुळे ती पुन्हा येणं कमी होतं.
लसूण आणि कांद्याचा घरगुती उपाय
लसूण आणि कांद्याचा तीव्र वासही झुरळं पळवायला मदत करतो. यांची पेस्ट करून किंवा पाण्यात मिसळून स्प्रे फवारला, तर झुरळं हळूहळू कमी होऊ लागतात.
स्वच्छता हाच सर्वात मोठा उपाय
या सगळ्या उपायांसोबत सर्वात महत्त्वाचं म्हणजे घराची नियमित स्वच्छता. अन्न उघडं ठेवू नका, कचरा वेळेवर टाका आणि किचन कोरडं ठेवा. झुरळांना वाढण्यासाठी पोषक वातावरणच मिळालं नाही, तर ती आपोआप कमी होऊन निघून जातील.
