Which Lubricant Is Safe to Use With Condoms: लैंगिक संबंधांदरम्यान घर्षणामुळे अस्वस्थता, कोरडेपणा किंवा वेदना जाणवू शकतात. अशा वेळी वंगणाचा वापर केल्याने घर्षण कमी होण्यास आणि संबंध अधिक आरामदायी होण्यास मदत होऊ शकते. बाजारात पाणीआधारित, सिलिकॉनआधारित व तेलआधारित अशा विविध प्रकारची वंगणे उपलब्ध आहेत. मात्र, काही जण बाजारातील वंगण वापरण्याऐवजी घरात सहज उपलब्ध असलेल्या पदार्थांचा पर्याय म्हणून विचार करतात. त्यात नारळाच्या तेलाचाही समावेश होतो. त्वचा आणि केसांसाठी मोठ्या प्रमाणावर वापरले जाणारे नारळाचे तेल वंगण म्हणून वापरता येते का, हा प्रश्न अनेकांच्या मनात असतो.

याचे उत्तर फक्त हो किंवा नाही, असे सरळ देता येत नाही. कारण- नारळाचे तेल वापरण्यापूर्वी त्याचे फायदे आणि त्यातील काही महत्त्वाचे धोके समजून घेणे आवश्यक आहे.

नारळाचे तेल वंगण म्हणून वापरता येते का?

नारळाचे तेल नैसर्गिक असल्यामुळे ते त्वचेवर वापरले जाते. त्यात काही नैसर्गिक सूक्ष्मजीवविरोधी गुणधर्मही आढळतात. त्याची रचना दाट असल्यामुळे ते पाण्यावर आधारित काही वंगणांच्या तुलनेत जास्त काळ त्वचेवर राहू शकते. त्यामुळे काही व्यक्तींना घर्षण कमी करण्यासाठी ते उपयुक्त वाटू शकते. मात्र, नैसर्गिक आहे म्हणून ते प्रत्येकासाठी आणि प्रत्येक परिस्थितीत सुरक्षित आहे, असे समजणे चुकीचे ठरेल. विशेषतः संवेदनशील त्वचा किंवा वारंवार होणाऱ्या योनीमार्गातील बुरशीजन्य संसर्गाची समस्या असलेल्या व्यक्तींनी अधिक काळजी घेणे आवश्यक आहे.

सर्वांत महत्त्वाची गोष्ट; कंडोमसोबत वापरू नका!

नारळाचे तेल वापरताना सर्वांत महत्त्वाची खबरदारी म्हणजे लेटेक्स कंडोमसोबत त्याचा वापर करू नये.

तेलामुळे लेटेक्स कमकुवत होऊ शकतो. परिणामी कंडोम फाटण्याची किंवा त्याची परिणामकारकता कमी होण्याची शक्यता असते. त्यामुळे गर्भधारणा, तसेच लैंगिक संसर्गांपासून संरक्षणाचा धोका निर्माण होऊ शकतो.

लेटेक्स कंडोमसोबत वंगण वापरायचे असल्यास पाणीआधारित किंवा सिलिकॉनआधारित वंगण अधिक योग्य पर्याय मानला जातो.

बुरशीजन्य संसर्गाची शक्यता असल्यास काळजी घ्या

ज्या महिलांना योनीमार्गातील बुरशीजन्य संसर्ग वारंवार होतो, त्यांनी नारळाचे तेल वंगण म्हणून वापरण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे चांगले.

योनीमार्गातील नैसर्गिक वातावरणात बदल झाल्यास काही व्यक्तींमध्ये संसर्गाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे नारळाचे तेल वापरल्यानंतर खाज, जळजळ, असामान्य स्राव, दुर्गंधी किंवा वेदना जाणवल्यास त्याचा वापर थांबवून वैद्यकीय सल्ला घ्यावा.

नारळाचे कोणते तेल वापरावे?

नारळाचे तेल वापरण्याचा विचार करत असल्यास, त्यातील घटकांची यादी तपासणे महत्त्वाचे आहे. सुगंध, रंग किंवा इतर अतिरिक्त घटक असलेली उत्पादने संवेदनशील त्वचेला त्रास देऊ शकतात.

म्हणून शक्यतो शुद्ध आणि अतिरिक्त घटक नसलेले नारळाचे तेल निवडावे. मात्र, हेही प्रत्येक व्यक्तीला अनुकूल असेलच, असे नाही.

थोडेच वापरा आणि शरीराची प्रतिक्रिया पाहा

कोणतेही उत्पादन पहिल्यांदा वापरताना मोठ्या प्रमाणात वापरणे टाळावे. संवेदनशील भागावर जळजळ, खाज किंवा लालसरपणा जाणवतो का, याकडे लक्ष द्यावे.

लैंगिक आरोग्याशी संबंधित कोणतीही समस्या वारंवार होत असेल, तर घरगुती उपायांवर अवलंबून राहण्यापेक्षा स्त्रीरोगतज्ज्ञ किंवा संबंधित वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला घेणे अधिक सुरक्षित आहे.

नारळाचे तेल नैसर्गिक असले तरी ते सर्वांसाठी योग्य असेलच, असे नाही. विशेषतः लेटेक्स कंडोमसोबत त्याचा वापर टाळणे ही सर्वांत महत्त्वाची खबरदारी आहे. सुरक्षित लैंगिक संबंधांसाठी योग्य वंगणाची निवड आणि संरक्षणात्मक साधनांचा योग्य वापर करणे आवश्यक आहे.

(टीप : ही माहिती केवळ लैंगिक आरोग्याविषयी जनजागृती करण्याच्या उद्देशाने देण्यात आली आहे. नारळाचे तेल वंगण म्हणून वापरण्यापूर्वी कंडोमचा प्रकार, त्वचेची संवेदनशीलता आणि संसर्गाची शक्यता लक्षात घ्या. लेटेक्स कंडोमसोबत तेलआधारित पदार्थ वापरू नका. खाज, जळजळ, वेदना किंवा असामान्य स्राव यांसारखी लक्षणे असल्यास स्वतःहून उपचार न करता डॉक्टरांचा सल्ला घ्या.)