Coffee And Coconut Oil For Dark Circles : डोळ्यांखाली डार्क सर्कल तयार होण्यामागे अनेक कारणे असतात, त्यापैकी एक मुख्य कारण म्हणजे आपली बिघडलेली जीवनशैली. अपुरी झोप, पाण्याची कमतरता आणि शरीरातील पोषक घटकांची कमतरता. याशिवाय, डोळ्यांच्या आजूबाजूला रक्ताभिसरण कमी झाल्यामुळेदेखील लोकांना डार्क सर्कलचा त्रास होऊ शकतो. याबाबत नवी दिल्लीतील एलेंटिस हेल्थकेअरच्या डर्मेटॉलॉजिस्ट आणि एस्थेटिक फिजिशियन डॉ. चांदनी जैन गुप्ता यांनी एका हिंदी वेबसाईट्शी बोलताना सविस्तर माहिती दिली आहे, त्यामुळे डार्क सर्कलसाठी कॉफी आणि खोबरेल तेल खरंच फायदेशीर ठरते का जाणून घेऊ…
कॉफी आणि खोबरेल तेलाचे मिश्रण कसे काम करते?
डॉ. चांदनी जैन गुप्ता सांगतात की, कॉफी आणि खोबरेल तेलाचे मिश्रण डार्क सर्कलसाठी अत्यंत गुणकारी आहे, परंतु यामुळे हा त्रास पूर्णपणे बरा होऊ शकत नाही. कॉफी पावडर आणि खोबरेल तेल या दोन्हीमध्ये काही असे गुणधर्म असतात जे डार्क सर्कल कमी करण्यास मदत करू शकतात. जर कॉफीबद्दल बोलायचे झाले तर यामध्ये कॅफिन असते, जे मजबूत अँटीऑक्सिडंट्सनी समृद्ध असते. हे रक्तवाहिन्या काही वेळासाठी आकुंचन पावण्यास मदत करते, ज्यामुळे थकलेल्या डोळ्यांची सूज कमी होण्यास मदत होते. आता खोबरेल तेलाचा विचार केला तर हे त्वचेच्या पेशींना हायड्रेट करते, ज्यामुळे डार्क सर्कल कमी होण्यास मदत होते. याशिवाय हे दोन्ही घटक डार्क सर्कलवर इतरही अनेक प्रकारे काम करतात.
डार्क सर्कलमध्ये कॉफी कशी काम करते?
कॉफी आणि खोबरेल तेल दोन्ही डोळ्यांच्या आजूबाजूला रक्त साचण्यापासून रोखू शकतात. डॉ. चांदनी सांगतात की, डार्क सर्कलचे एक मोठे कारण डोळ्यांच्या आजूबाजूला रक्त जमणे हे आहे. यामध्ये कॅफिनमधील ‘वासोकंस्ट्रिक्शन’ (रक्तवाहिन्या आकुंचन पावणारे) गुणधर्म अत्यंत फायदेशीर ठरतो. या गुणधर्मामुळे डोळ्यांच्या त्वचेखालील रक्तवाहिन्या काही काळासाठी आकुंचन पावतात. ज्यामुळे तेथे रक्त साचल्यामुळे दिसणारे काळे वर्तुळ कमी होतात.
डार्क सर्कलवर खोबरेल तेल कसे काम करते?
‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ फार्मास्युटिकल सायन्सेस’नुसार, आयुर्वेदामध्ये खोबरेल तेल थंडावा देणारे, पोषण देणारे आणि घाव भरून काढणारे गुणधर्मांसाठी ओळखले जाते. थंड, शांत आणि हायड्रेटिंग असल्यामुळे खोबरेल तेल आय पॅच (Eye Patch) बनवण्यासाठी एक आवश्यक घटक आहे. हे डोळ्यांखालील नाजूक त्वचेला खोलवर पोषण देऊन डार्क सर्कल कमी करण्यास मदत करते. यातील व्हिटॅमिन ई (Vitamin E) त्वचेला पुनरुज्जीवित आणि चमकदार बनवण्यास मदत करते, तर त्याचे अँटी-इंफ्लेमेटरी (दाहकविरोधी) गुणधर्म सूज आणि थकलेल्या डोळ्यांना आराम देतात. हे सर्व गुणधर्म एकत्र येऊन डार्क सर्कल कमी करण्यासाठी मदत करू शकतात.
कॉफी आणि खोबरेल तेलाचा आय मास्क बनवण्याची पद्धत
कॉफी आणि खोबरेल तेलापासून आय मास्क बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे:
- १ चमचा कॉफी पावडर घ्या.
- १ चमचा खोबरेल तेल घ्या.
- दोन्ही एकत्र करून एक घट्टसर लेप तयार करा.
- हा लेप डोळ्यांच्या आजूबाजूला लावा आणि सुमारे ३० मिनिटे तसेच राहू द्या.
- ३० मिनिटांनंतर बोटांवर खोबरेल तेल लावा आणि डोळ्यांच्या आजूबाजूला गोलाकार दिशेने (Circular Motion) हलक्या हाताने मसाज करत पॅक काढून टाका.
- त्यानंतर चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्या.
- सलग काही दिवस हा उपाय केल्यास तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल.
डोळ्यांखाली लावताना घ्यावयाची काळजी
डॉ. चांदनी सांगतात की, डोळ्यांखाली हा पॅक लावत असताना विशेष काळजी घ्यावी की कॉफीचे बारीक कण डोळ्यांच्या आत जाणार नाहीत. तसेच, हा पॅक वापरण्यापूर्वी पॅच टेस्ट (Patch Test) आवर्जून करून घ्यावी, कारण काही लोकांना कॉफी किंवा कॉफीपासून बनवलेल्या पदार्थांची ॲलर्जी असू शकते. याशिवाय, काही लोकांमध्ये कॉफीचा सुगंध मायग्रेनचा त्रासदेखील अचानक वाढवू शकतो, त्यामुळे आपल्या स्किन टाईपनुसारच याचा वापर करावा.
