स्तन्यपेढी

स्तनपान देणाऱ्या सुदृढ मातेचे दान केलेले दूध गोळा करून, त्यावर योग्य ती प्रक्रिया करून गरजू बाळांपर्यंत ते पोहोचवण्याचे काम करणारी पेढी म्हणजे स्तन्यपेढी किंवा मिल्क बँक.

डॉ. विशाखा हरीदास
स्तनपान देणाऱ्या सुदृढ मातेचे दान केलेले दूध गोळा करून, त्यावर योग्य ती प्रक्रिया करून गरजू बाळांपर्यंत ते पोहोचवण्याचे काम करणारी पेढी म्हणजे स्तन्यपेढी किंवा मिल्क बँक. राज्यात सध्या २० स्तन्यपेढी किंवा मिल्क बँका कार्यरत आहेत. जगातील बहुतांश स्तन्यपेढय़ा या ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर चालवल्या जातात. जे बाळ कमी दिवसांचे (मुदतपूर्व प्रीमॅच्युअर) जन्माला आले आहे किंवा ज्या बाळाची आई आजारी असल्याने, दगावल्याने त्याला स्तनपान देऊ शकत नाही अशा बाळासाठी स्तन्यपेढीतले दूध अत्यंत महत्त्वाचे असते.

  • दूधदानाचे महत्त्व आणि गरज

कमी दिवसांच्या आजारी बाळांसाठी आईच्या दुधासारखे दुसरे औषध नाही. योग्य पोषण आणि उत्तम प्रतिकारशक्ती पुरवणारा हा एकमेव अन्नपदार्थ आहे. पण दुर्दैवाने ज्या बाळांना त्याची निकडीची गरज असते, त्यांच्या मातांना स्तनपान देण्यामध्ये बऱ्याच अडचणी येतात. अशा परिस्थितीत दान केलेल्या दुधाचा अतिदक्षता विभागातील आजारी बाळांसाठी अतिशय उपयोग होतो. आईच्या दुधामुळे बाळाचा बुद्धय़ांक ५ ते ८ गुणांनी वाढतो. श्वसनसंस्था आणि कानाचा जंतुसंसर्ग होण्याचे प्रमाण ७२ टक्क्यांनी कमी होते. नवजात बाळाला होणाऱ्या अतिशय गंभीर अशा पोटाच्या जंतुसंसर्गाचे (नेक्रोटायझिंग एंटेरोकोलायटिस) प्रमाण ७७ टक्के कमी होते. बाळांमध्ये अकाली मृत्यू होण्याचे प्रमाण ३६ टक्क्यांनी कमी होते. सुरुवातीच्या काळात बाळाला दर २ ते ३ तासांनी काही थेंब दूध पुरते. परंतु काही कालावधीतच त्याची गरज वाढत जाते. एक किलो वजनाच्या बाळाला साधारणपणे दर दिवशी १५० मिलिलिटर इतके दूध लागते, तर १.५ किलोच्या बाळाला २२५ मिलिलिटर दूध दर दिवशी आवश्यक असते.

स्तनपान किंवा आईच्या दुधाची नवजात बाळाला अत्यंत आवश्यकता आहे. कमी दिवसांच्या, आजारी, नाजूक बाळांचा जन्मापासून सुरू झालेला जगण्यासाठीचा संघर्ष कमी करण्यासाठी आईच्या दुधाची गरज असते. भारतात दरवर्षी ३.६ दशलक्ष बालके कमी दिवसाची जन्माला येतात. या सर्व बाळांची जगण्याची सुरुवात थोडीफार तरी सुखावह करायची असेल, तर मोठय़ा प्रमाणात दुग्धदान होण्याची गरज आहे. एवढेच नाही तर स्तन्यपेढीमध्ये भरपूर दूध उपलब्ध झाले तर या बाळांव्यतिरिक्त इतर बाळांनाही जसे दत्तक घेतलेली छोटी बाळे, मातृसुख गमावलेली छोटी बाळे यांनाही हे दूध पुरवता येणे शक्य आहे. त्यामुळे दूधदानाला प्रोत्साहन देण्याची गरज आहे.

  • दूधदान कोण करू शकतात?

प्रसूतीनंतर एक वर्षांपर्यंत कोणतीही सुदृढ माता स्वत:च्या बाळाला पाजून शिल्लक राहिलेले जास्तीचे दूधदान करू शकते. काही माता दुग्धदानासाठी मुद्दाम दिवसभरात वेळ काढून १-२ वेळा ब्रेस्टपंप करतात. अशा पद्धतीने साठवलेले जास्तीचे दूध मिल्क बँकेत दान करतात. दूधदान केल्यास कोणताही आर्थिक मोबदला मिळत नाही. स्तनपान देणारी माता ही स्वयंस्फूर्तीने दुसऱ्या नाजूक बाळांच्या पोषणासाठी दूधदान देते. या अशा दानामुळेच गरजू बाळांना हे दूध अतिशय किरकोळ किमतीत उपलब्ध करून देता येते.

  • दूध खर्चीक असते का?

जगातील बहुतांश दुग्धपेढय़ा या ‘ना नफा ना तोटा’ या तत्त्वावर चालतात. त्यामुळे दुग्धपेढीतील दुधासाठी कमीत कमी किंमत आकारली जातो. तरीही एकंदरीतच हा व्यवहार फायदेशीर ठरतो. कारण त्यामुळे नवजात बाल आरोग्यसंपन्न होते आणि रुग्णालयातून लवकर घरी जाते. यात कुटुंबांचाच नव्हे तर समाजाचा, देशाचाही आर्थिक फायदाच होतो.

  • दुग्धपेढीतील दूध कोणाला पुरवले जाते?

खरे पाहता ज्या बाळाला स्वत:च्या आईचे दूध उपलब्ध नाही अशा प्रत्येक बाळाला दुग्धपेढीतील दूध पुरवले जाऊ शकते. परंतु अपुऱ्या पुरवठय़ामुळे केवळ रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल झालेल्या कमी दिवसांच्या नवजात बाळांनाच हे दूध पुरविता येते. या मुलांची गरज भागवूनही दूध शिल्लक राहिल्यास इतर निरोगी नवजात बालकांनाही आवश्यकतेनुसार हे दूध देण्यात येते.

  • दुग्धपेढीतील दुधाची गुणवत्ता

दान केलेले दूध दुग्धपेढीमध्ये ठरावीक तापमानापर्यंत तापवले जाते (पाश्चरायझेशन). त्यामुळे दुधातील जिवाणू, विषाणू पूर्णपणे नष्ट होतात. त्याचबरोबर दुधातील रोगप्रतिकारक द्रव्ये आणि काही पोषणमूल्येही कमी होतात. परंतु पाश्चराईज केलेले आईचे दूध इतर कोणत्याही पावडरच्या दुधापेक्षा नक्कीच सरस ठरते. दुग्धदान करणाऱ्या सर्व मातांची सखोलपणे वैद्यकीय आणि जीवनशैलीविषयक तपासणी केली जाते. याशिवाय एचआयव्ही/ हेपेटायटीस बी/ व्हीडीआरएल इत्यादी तपासण्याही केल्या जातात. त्यानंतरच त्यांनी दिलेले दूध पेढीमध्ये जमा होते. अतिरिक्त खबरदारी म्हणून स्वच्छतेचे सर्व निर्बंध पाळून हे दूध पाश्चराईज केले जाते. त्यानंतर त्या दुधाची प्रयोगशाळेत तपासणी केली जाते. त्यामध्ये एकही रोगजंतू नाही हे सिद्ध झाल्यावरच ते दूध गरजू बाळांना वितरित केले जाते. त्यामुळे हे दूध गुणवत्ता आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने परिपूर्ण असते.

(लेखिका दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाच्या माई मदर्स मिल्क बँकेच्या स्तनपान सल्लागार आहेत.)

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Collect donated milk healthy breastfeeding mother ssh

ताज्या बातम्या