Colon Cancer Signs: कोलन कॅन्सर हा एक गंभीर आजार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात त्याची लक्षणे अनेकदा पोटाच्या सामान्य समस्यांसारखी वाटू शकतात. त्यामुळे अनेक लोक या लक्षणांकडे दुर्लक्ष करतात. डबल बोर्ड-सर्टिफाइड फिजिशियन तसेच इंटरनल मेडिसिन आणि गॅस्ट्रोएन्टेरोलॉजी तज्ज्ञ डॉ. जोसेफ सलहब यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम व्हिडिओमध्ये कोलन कॅन्सर झाल्यास शरीरात कोणती लक्षणे दिसू शकतात, याबद्दल माहिती दिली आहे.

कोलन कॅन्सर झाल्यास शरीरात दिसू शकतात ही लक्षणे

शौचाच्या सवयींमध्ये बदल: सतत बद्धकोष्ठता, जुलाब किंवा शौचाच्या सवयींमध्ये बदल जाणवत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. विशेषतः ही समस्या एक आठवड्यापेक्षा जास्त काळ कायम राहिल्यास सावध राहणे गरजेचे आहे.

शौचात रक्त येणे: कोलन कॅन्सरमध्ये शौचातून रक्त येऊ शकते. कॅन्सर मोठ्या आतड्याच्या खालच्या भागात असेल, तर ताजे आणि चमकदार लाल रंगाचे रक्त दिसू शकते. मात्र, रक्तस्राव वरच्या भागातून होत असेल, तर रक्त जुने असल्यामुळे त्याचा रंग गडद लाल दिसू शकतो.

सतत पोटदुखी किंवा पोटात गोळे येणे: कोलन कॅन्सरमध्ये पोटदुखी आणि पोटात गोळे येण्याची समस्या वाढू शकते. ही समस्या वेळेनुसार कमी न होता हळूहळू अधिक वाढू शकते.

शौच पूर्ण झाल्यासारखे न वाटणे: मलाशयात गाठ किंवा ट्युमर असल्यास शौच पूर्णपणे झाल्यासारखे वाटत नाही. त्यामुळे शौच करून आल्यावरही पुन्हा लगेच शौचाला जावेसे वाटू शकते.

वजन कमी होणे: कोलन कॅन्सरमध्ये भूक कमी लागते. तसेच कोणताही व्यायाम किंवा आहारात बदल न करता वजन कमी होऊ लागते.

सतत थकवा किंवा चक्कर येणे: कोलन कॅन्सरमध्ये हळूहळू रक्तस्राव होत राहिल्यामुळे शरीरात लोहाची कमतरता (ॲनिमिया) होऊ शकते. त्यामुळे सतत थकवा, चक्कर येणे किंवा श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.

मात्र, डॉक्टरांचे असेही म्हणणे आहे की, ही लक्षणे दिसली म्हणजेच कोलन कॅन्सर झाला आहे, असे नाही. पण शरीरात नवीन लक्षणे दिसू लागली, ती सतत कायम राहिली किंवा आधीच्या सवयींमध्ये बदल झाला, तर त्याकडे दुर्लक्ष करू नये. तसेच कोणतेही स्पष्ट कारण नसताना शौचातून रक्त येत असेल, जरी ते फक्त एकदाच झाले असेल, तरी डॉक्टरांकडून तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)