Colon Cancer Symptoms: शौचास जाताना रक्त येणे, वेदना किंवा अस्वस्थता जाणवणे ही आतड्यांशी संबंधित समस्यांची लक्षणे असू शकतात. अनेक लोक त्याकडे किरकोळ समस्या म्हणून दुर्लक्ष करतात किंवा ती मूळव्याधाची लक्षणे आहेत, असे समजून चुकीचा निष्कर्ष काढतात. तसेच, योग्य वैद्यकीय तपासणी करण्याऐवजी घरगुती उपायांवर अवलंबून राहतात. परिणामी, मूळ आजाराचे निदान होत नाही. आतड्यांच्या समस्या हे ‘कोलन कॅन्सर’चे (मोठ्या आतड्याचा कर्करोग) लक्षणही असू शकते. कोलन कॅन्सरची लक्षणे आणि ती वेळीच कशी ओळखावीत, याबद्दल जाणून घेऊयात.

आतड्याच्या कर्करोगाची लक्षणे कोणती?

  • शौचावाटे रक्त पडणे
  • शौचास होण्यास त्रास होणे
  • आतडी पूर्णपणे रिकामी झाली नसल्याची भावना होणे
  • सतत पोटदुखी, तसेच पोटात पेटके येणे किंवा गॅस होणे
  • सतत अशक्तपणा जाणवणे
  • शरीर थकल्यासारखे वाटणे
  • लोहाची (आयर्नची) कमतरता निर्माण होऊन ॲनिमिया (रक्तक्षय) होणे

मूळव्याध आणि कोलन कॅन्सर (मोठ्या आतड्याचा कर्करोग) यांच्यात काय फरक?

मूळव्याधीमध्ये काय होते – विष्ठेसोबत लाल रक्त पडणे, गुदद्वाराजवळ खाज सुटणे, सूज येणे व वेदना होणे ही याची लक्षणे आहेत. तसेच, वजन कमी होणे किंवा अति अशक्तपणा जाणवणे अशी लक्षणेही दिसू शकतात.

आतड्याच्या कर्करोगात काय होते?

रक्तासोबतच शौचाच्या सवयींमध्ये बदल होतात. पोटदुखी, वजन कमी होणे, थकवा आणि ॲनिमियाची (रक्तक्षयाची) लक्षणे ही याची प्रमुख लक्षणे आहेत.

आतड्याच्या कर्करोगाचा धोका कोणाला असतो?

४५ वर्षांवरील व्यक्तींना आतड्याचा कर्करोग होऊ शकतो. या आजाराचा धोका वाढवणाऱ्या घटकांमध्ये कौटुंबिक इतिहास, लठ्ठपणा, धूम्रपान, प्रक्रिया केलेले अन्न (प्रोसेस्ड फूड) मोठ्या प्रमाणात खाणे, शारीरिक हालचालींचा अभाव आणि आतड्यांचे आधीपासून असलेले आजार यांचा समावेश होतो.

डॉक्टरांचा सल्ला कधी घ्यावा?

जर तुम्हाला विष्ठेतून रक्त पडताना दिसले किंवा कोणतेही स्पष्ट कारण नसताना वजन कमी होत असल्याचे जाणवले, तर डॉक्टरांचा सल्ला घेण्यास उशीर करू नका. गुदद्वाराशी संबंधित समस्या किंवा मलविसर्जनातील अडचणींकडे दुर्लक्ष करू नका.