Warning Signs of Poor Gut Health : तुमच्या आरोग्याचा मार्ग तुमच्या आतड्यांमधूनच जातो. म्हणजेच आपण अनेकदा पोट फुगणे किंवा अपचन याकडे सामान्य समस्या म्हणून समजून दुर्लक्ष करतो. पण, हेच आतड्यांच्या खराब आरोग्याचे एक मोठे लक्षण असते. आतड्यातील जीवाणू शरीरासाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. जीवनसत्त्वे तयार करण्यास, पचनक्रिया सुधारण्यास, शरीर स्वच्छ करण्यातही आतड्यांचे सहकार्य मिळत असते. पण, अँटिबायोटिक्सचा अतिवापर, वारंवार वेदनाशामक गोळ्या घेणे, मद्यपान आणि चुकीच्या खाण्याच्या सवयी या आतड्यातील चांगल्या जीवाणूंना हानी पोहोचवतात. जेव्हा आतड्यातील चांगले जीवाणू कमी होऊ लागतात, तेव्हा शरीर अनेक मार्गांनी तुम्हाला धोक्याचे इशारे देऊ लागते.

प्रसिद्ध गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉक्टर शिव कुमार सारिन यांच्या मते, आतड्यांचे आरोग्य केवळ पचनापुरते मर्यादित नाही. तुमच्या प्रतिकारशक्ती आणि मानसिक आरोग्याशीही संबंधित आहे. आतड्यांचे आरोग्य आणि मेंदूचे आरोग्य यांच्यात काय संबंध आहे, आतड्यांचे आरोग्य बिघडल्यावर शरीरात कोणती लक्षणे दिसतात आणि ही स्थिती कशी सुधारता येते याबद्दल आपण या बातमीतून जाणून घेणार आहोत…

आतडे आणि मेंदूचा संबंध

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की, पोटाच्या विकारांचा परिणाम मेंदूवरही होऊ शकतो. डॉक्टर सारिन यांच्या मते, आपल्या आतड्यांना आपला ‘दुसरा मेंदू’ म्हटले जाते. शरीरातील ९० टक्के सेरोटोनिन म्हणजेच आनंदी संप्रेरक पोटात तयार होते. आतड्यांचे आरोग्य खराब असल्यास अनावश्यक ताण, चिंता व चिडचिडेपणा येऊ शकतो. त्याचा अर्थ असा की, पोटाच्या विकारांमुळे केवळ गॅसच नाही, तर नैराश्यही येऊ शकते.

Award Banner

आतड्यांचे आरोग्य खराब झाल्यावर शरीरात दिसतात ‘ही’ लक्षणे

  • आतड्यांचे आरोग्य खराब असण्याची सर्वांत सामान्य लक्षणे म्हणजे सतत पोटदुखी, गॅस, आम्लपित्त किंवा बद्धकोष्ठता. गोड खाण्याची तीव्र इच्छा होणे हे जीवाणूंच्या असंतुलनाचे लक्षण आहे.
  • अचानक वजनात बदल, वजन वाढणे किंवा कमी होणे, ही आतड्यांचे आरोग्य खराब असल्याची लक्षणे आहेत.
  • झोपेची कमतरता आणि थकवा या बाबी आतड्यांच्या आरोग्यासाठी महत्त्वाच्या असलेल्या ‘हॅपी हार्मोन्स’वर परिणाम करतात.
  • त्वचेच्या समस्या जसे की मुरमे किंवा इसब (एक्झिमा) ही सर्व आतड्यांचे आरोग्य खराब असल्याची लक्षणे आहेत.

आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आहार आणि जीवनशैलीतील बदल

१. आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी आपल्या आहारात वनस्पतीजन्य फळे, भाज्या आणि मोड आलेल्या धान्यांचा समावेश करा. व्हिनेगर व सत्तू यांसारख्या आंबवलेल्या पदार्थांचे सेवन केल्याने आतड्यातील जीवाणू निरोगी राहतात. पण, चरबी, साखर यांचे जास्त प्रमाणात सेवन आणि रात्री उशिरा जेवणे यांमुळे शरीरात उष्मांकांचा जास्त प्रमाणात संचय होतो आणि परिणामी शरीराला स्थूलतेला सामोरे जावे लागते.

२. आतडे आणि यकृत यांचा एकमेकांशी खोलवर संबंध जोडला गेलेला आहे. स्वाभाविकत: त्यांचं नुकसान झालं की, पित्ताशयात खडे होणे आणि फॅटी लिव्हर यांसारख्या समस्या उदभवू शकतात. खराब जीवनशैलीच्या सवयी हे आतड्यांच्या समस्यांचे प्रमुख कारण आहे.

३. आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी तणाव कमी करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. शारीरिक हालचालींचा अभाव आणि अनियमित खाण्याच्या सवयी यांमुळे आम्लपित्त, पोट फुगणे आणि बद्धकोष्ठता यांसारख्या समस्या उदभवू शकतात. तणाव कमी करण्यासाठी व्यायाम करणे हा सर्वोत्तम मार्ग आहे.

४. काही सवयी तुमच्या आतड्यांच्या आरोग्याला हानी पोहोचवू शकतात. वारंवार पाणी पिणे, च्युईंगम चघळणे किंवा तासन् तास बसून राहण्यामुळे गॅस होऊ शकतो आणि आतड्यांच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होऊ शकतो.

५. बरीच मंडळी प्रोटीन सप्लिमेंट्स घेण्यावर खूप भर देतात. पण, ९९% लोकांना त्यांची गरज नसते. सामान्य आहारातून पुरेशा प्रमाणात प्रथिने मिळू शकतात; तर आहार पूरकांमुळे यकृताचेही नुकसान होऊ शकते.

६. आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी, खाण्यापिण्याच्या वेळांमध्ये अंतर ठेवा. अति खाणे टाळा आणि संतुलित जीवनशैलीचा अवलंब करा. तुम्ही काय खाता यावर तुमचे आरोग्य अवलंबून असते.