Constipation Causes: चुकीची जीवनशैली आणि असंतुलित आहारामुळे बद्धकोष्ठता ही एक सामान्य समस्या होत आहे. वेगवान जीवनशैली आणि प्रक्रिया केलेल्या अन्नाच्या विपुलतेमुळे बद्धकोष्ठता हा एक लपलेला आजार बनला आहे. बरेच लोक ही एक किरकोळ गोष्ट आहे असे समजून त्याकडे दुर्लक्ष करतात. पण तुम्हाला माहीत आहे का की या दीर्घकालीन समस्येचे मूळव्याधासारख्या गंभीर आजारांमध्ये रूपांतर होऊ शकते? बद्धकोष्ठतेमुळे केवळ शारीरिक अस्वस्थता येत नाही, तर ते शरीराला रोगांसाठी एक प्रजनन स्थळ बनवते. तर प्रश्न असा येतो की आपली पचनसंस्था मंद का होते?

कानपूरमधील गॅस्ट्रो लिव्हर हॉस्पिटलमधील वरिष्ठ गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. व्ही. के. मिश्रा यांनी दि इंडियन एक्सप्रेसशी बोलताना सांगितले की, बद्धकोष्ठतेची पाच मुख्य कारणे आहेत जी प्रत्येकाने समजून घ्यायला हवी. या पाच कारणांमुळे तुम्हाला दररोज लघवी करण्यासाठी शौचालयात तासनतास जोर लावावा लागू शकतो. तर मग जाणून घेऊया बद्धकोष्ठतेची पाच प्रमुख कारणे…

आहारातील फायबरचे प्रमाण

जर तुमच्या आहारात फायबरचे प्रमाण कमी आणि सॅच्युरेटेड फॅटचे प्रमाण जास्त असेल, तर तुमची पचनक्रिया मंदावते. फायबरमुळे आतड्यांची हालचाल सुधारते आणि शौच मऊ राहते. त्यामुळे ते सहजपणे बाहेर पडण्यास मदत होते. पुरेसे पाणी न प्यायल्याने देखील शौच कडक होतो. जंक फूड, तळलेले पदार्थ आणि पाण्याची कमतरता ही बद्धकोष्ठतेची प्रमुख कारणं आहेत.

Award Banner

चुकीची जीवनशैली

शारीरिक हालचालींचा अभाव आणि अपुरी झोप यामुळेही बद्धकोष्ठता होऊ शकते. जेव्हा तुम्ही नियमित व्यायाम करत नाही, तेव्हा शौचास जाण्याची क्रिया मंदावते. त्यामुळे शौचास जाणे कठीण होते. याव्यतिरिक्त पुरेशी झोप न मिळाल्याने शरीराच्या चयापचय क्रियेवर परिणाम होतो. सक्रिय जीवनशैली आणि झोपेची योग्य दिनचर्या निरोगी पचनसंस्था राखण्यास मदत करतात.

नैसर्गिक आवाहनांकडे दुर्लक्ष करणे

जेव्हा तुमचे शरीर शौचास जाण्याची गरज असल्याचे संकेत देते आणि तुम्ही वारंवार याकडे दुर्लक्ष करता, तेव्हा या सवयीमुळे हळूहळू बद्धकोष्ठता होते. यामुळे शरीराच्या नैसर्गिक दाब प्रणालीमध्ये अडथळा येतो, त्यामुळे आतड्यांमध्ये मल साचून राहतो. आतड्यांमध्ये मल साचल्यामुळे पचनसंस्थेवर परिणाम होतो आणि पोटाच्या आजारांचा धोका वाढतो. असे दीर्घकाळ केल्याने मल कडक होते आणि ते बाहेर टाकणे कठीण होते. म्हणऊन नैसर्गिक गरजांकडे कधीही दुर्लक्ष करू नये. जेव्हा कधी तुम्हाला शौचास जाण्याची तीव्र इच्छा होईल, तेव्हा सर्व काम थांबवून ताबडतोब शौचास जा.

वाढते वय

वाढत्या वयानुसार पचनसंस्थेचे स्नायू कमकुवत होतात. त्यामुळे आतड्यांची हालचाल मंदावते. याव्यतिरिक्त वृद्ध व्यक्तींची शारीरिक हालचाल कमी होते आणि त्यांचे पाणी व फायबरचे सेवनही अनेकदा कमी होते. यामुळेच वाढत्या वयानुसार बद्धकोष्ठतेचेप्रमाण वाढते. योग्य आहार आणि हलक्या व्यायामाने यावर नियंत्रण मिळवता येते.

औषधांचा परिणाम

पेनकिलर, डिप्रेशन यासाठीची औषधे आणि लोहाच्या गोळ्या यासारख्या काही औषधांमुळे बद्धकोष्ठता होऊ शकते. ही औषधे शौचास जाण्याची क्रिया मंदावतात किंवा शौच कडक करतात. जर तुम्ही ही औषधे दीर्घकाळापासून घेत असाल आणि तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल तर योग्य पर्याय किंवा उपाय शोधण्यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे गरजेचे आहे.

बद्धकोष्ठता ही एक सामान्य समस्या आहे, मात्र सकस आहार, सक्रिय जीवनशैली आणि चांगल्या सवयींनी ती सहज टाळता येते. जर ही समस्या दीर्घकाळ टिकून राहिली, तर डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे.