Constipation Relief 4 Tips by Dr Shriram Nene: आजकाल धावपळीची जीवनशैली, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि दिवसभर बसून काम करण्याची पद्धत यांमुळे पोटाशी संबंधित समस्या मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहेत. गॅस, पोट फुगणे, अपचन आणि त्यात सर्वांत त्रासदायक ठरणारी समस्या म्हणजे बद्धकोष्ठता. सकाळी टॉयलेटला जाऊन बराच वेळ बसूनही पोट साफ न होणे, शौच करताना जोर लावावा लागणे किंवा शौच झाल्यानंतरही पोट पूर्णपणे साफ झाले नसल्यासारखे वाटणे, हा अनेकांसाठी रोजचा त्रास बनला आहे.
कधीमधी बद्धकोष्ठता होणे ही वेगळी गोष्ट आहे; मात्र हा त्रास वारंवार होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. कारण- आपल्या पचनसंस्थेच्या आरोग्यावर आहार, पाणी, शारीरिक हालचाल आणि रोजच्या सवयींचा मोठा परिणाम होतो. मग हा त्रास नेमका का होतो आणि रोजच्या जीवनात कोणते बदल करता येतील?
याबाबत प्रसिद्ध हृदयरोग तज्ज्ञ व अभिनेत्री माधुरी दीक्षित यांचे पती डॉ. श्रीराम नेने यांनी काही महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. त्यांनी सांगितलेल्या चार गोष्टी आपल्या रोजच्या सवयींशीच संबंधित आहेत.
बद्धकोष्ठता म्हणजे नेमकं काय?
सर्वप्रथम बद्धकोष्ठता म्हणजे काय, हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. शौचाला नेहमीपेक्षा कमी वेळा होणे, मल कठीण किंवा कोरडा होणे, शौच करताना अधिक जोर लावावा लागणे किंवा शौच केल्यानंतरही पोट पूर्णपणे साफ झालेले नाही असे वाटणे, ही सामान्यतः बद्धकोष्ठतेशी संबंधित लक्षणे मानली जातात.
ही समस्या अनेकदा आपल्या रोजच्या जीवनशैलीशी जोडलेली असू शकते. त्यामुळे केवळ औषध घेण्याऐवजी आपल्या आहारापासून ते पाणी पिण्याच्या सवयीपर्यंत अनेक गोष्टींकडे लक्ष देणे गरजेचे ठरते.
१. आहारात फायबरचे प्रमाण वाढवा
डॉ. नेने यांनी सांगितलेली पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आहारातील फायबरकडे लक्ष देणे.
आजच्या धावपळीच्या जीवनात झटपट तयार होणारे आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, अशा आहारात नैसर्गिकरीत्या मिळणाऱ्या तंतुमय घटकांचे प्रमाण कमी असू शकते. त्यामुळे रोजच्या आहारात हिरव्या पालेभाज्या, फळे, डाळी, कडधान्ये आणि संपूर्ण धान्य यांसारख्या तंतुमययुक्त पदार्थांचा समावेश करणे उपयोगी ठरू शकते.
तंतुमयतेमुळे मल अधिक मऊ आणि सहजपणे बाहेर पडण्यास मदत होऊ शकते. मात्र, आहारातील तंतुमय घटक अचानक मोठ्या प्रमाणात वाढवण्याऐवजी तो हळूहळू वाढवणे आणि त्यासोबत पुरेसे पाणी घेणे महत्त्वाचे आहे.
२. शरीराला पुरेसे पाणी द्या
दुसरी गोष्ट म्हणजे पाणी पिण्याची सवय.
आपण दिवसभर कामात इतके व्यग्र होतो की, तहान लागेपर्यंत पाणी न पिण्याची सवय अनेकांना असते. शरीरात द्रवपदार्थांची कमतरता झाल्यास मल अधिक कोरडा आणि कठीण होऊ शकतो. त्यामुळे बद्धकोष्ठतेचा त्रास असणाऱ्यांनी दिवसभर नियमितपणे पाणी पिण्याकडे लक्ष देणे आवश्यक आहे.
विशेषतः तंतुमययुक्त पदार्थांचे सेवन वाढवत असाल, तर पुरेसे द्रवपदार्थ घेणे आणखी महत्त्वाचे ठरते. मात्र प्रत्येक व्यक्तीची पाण्याची गरज वेगळी असते. त्यामुळे विशिष्ट प्रमाणातच पाणी प्यावे, असा एकच नियम सर्वांसाठी लागू होत नाही.
३. शौचाच्या आवेगाला अजिबात मुरड घालू नका
तिसरी आणि अतिशय सामान्य सवय म्हणजे नैसर्गिक विधीची इच्छा झाली तरी ती पुढे ढकलणे.
ऑफिसमध्ये बैठक असते, प्रवास सुरू असतो, बाहेर सार्वजनिक ठिकाणी असतो किंवा सकाळी घाई असते म्हणून अनेक जण शौचाची इच्छा दाबून ठेवतात. ही सवय वारंवार होत राहिल्यास शौचाच्या नैसर्गिक वेळेवर परिणाम होऊ शकतो.
त्यामुळे शौचाच्या भावनेची जाणीव झाल्यावर शक्यतो ती टाळू नये. सकाळी उठल्यानंतर घाईघाईने दिवस सुरू करण्याऐवजी शरीराला पुरेसा वेळ देणेही महत्त्वाचे आहे. नियमित वेळ आणि योग्य सवय लावल्याने शौचाची प्रक्रिया अधिक सुरळीत होण्यास मदत होऊ शकते.
४. दिवसभर बसून न राहता, शरीर सक्रिय ठेवा
चौथी गोष्ट म्हणजे शारीरिक हालचाल वाढवणे.
सकाळी घरातून बाहेर पडणे, दिवसभर कार्यालयात खुर्चीवर बसून काम करणे आणि घरी आल्यानंतर पुन्हा बराच वेळ बसून राहणे, अशी अनेकांची दिनचर्या झाली आहे. शरीराची हालचाल कमी झाल्यास पचनसंस्थेच्या हालचालींवरही परिणाम होऊ शकतो.
त्यामुळे रोजच्या दिनचर्येत चालणे, हलका व्यायाम करणे किंवा शक्य तितके शरीर सक्रिय ठेवणे फायदेशीर ठरू शकते. त्यासाठी नेहमीच कठीण व्यायामाची गरज असते, असे नाही. आपल्या क्षमतेनुसार नियमित हालचाल करणे हीच सुरुवात ठरू शकते.
पोट साफ होण्यासाठी चार गोष्टी महत्त्वाच्या
बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी आहार, पाणी, शौचासंबंधीच्या सवयी आणि शारीरिक हालचाल या चारही गोष्टींकडे एकत्रितपणे पाहणे महत्त्वाचे आहे. फक्त एखादा एक उपाय करून लगेच कायमस्वरूपी फरक पडेलच, असे नाही. रोजच्या सवयींमध्ये सातत्याने बदल करणे अधिक महत्त्वाचे ठरते.
मात्र, बद्धकोष्ठतेचा त्रास वारंवार होत असेल, बराच काळ टिकत असेल किंवा त्यासोबत तीव्र पोटदुखी, उलट्या, रक्तस्राव, अचानक वजन कमी होणे किंवा इतर चिंताजनक लक्षणे जाणवत असतील, तर स्वतःहून उपचार करण्याऐवजी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
(टीप : ही माहिती डॉ. श्रीराम नेने यांनी दिलेल्या सूचना आणि सामान्य आरोग्यविषयक माहिती यांवर आधारित आहे. ती वैयक्तिक वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही.)
