Constipation Relief Food: जर तुम्हालाही बद्धकोष्ठतेचा त्रास होत असेल किंवा आतड्यांचे आरोग्य (गट हेल्थ) सुधारायचे असेल, तर आहारात रताळ्याचा समावेश करा. नैसर्गिकरित्या फायबरने भरपूर असलेले रताळे खाल्ल्याने पचन सुधारण्यास आणि पोट साफ होण्यास मदत होते.

मात्र, तुम्ही रताळे कसे बनवता आणि कसे खाता, यावर त्याचा पचनावर होणारा फायदा अवलंबून असतो. फ्लोरिडामधील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट आणि हेल्थ कंटेंट क्रिएटर डॉ. जोसेफ सलहाब यांनी रताळे बनवण्याची एक सोपी पद्धत सांगितली आहे. या पद्धतीमुळे आतड्यांचे आरोग्य सुधारू शकते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम मिळू शकतो.

बद्धकोष्ठतेमध्ये रताळे का फायदेशीर आहे?

डॉ. जोसेफ सलहाब यांच्या मते, रताळ्यामध्ये विरघळणारे आणि न विरघळणारे असे दोन्ही प्रकारचे फायबर असतात. त्यामुळे मल मऊ होण्यास, त्याचे प्रमाण वाढण्यास आणि पचनसंस्था सुरळीत काम करण्यास मदत होते. तसेच, रताळ्यामध्ये नैसर्गिकरित्या मॅनिटॉल नावाचा घटक असतो. हा एक प्रकारचा शुगर अल्कोहोल असून तो आतड्यांमध्ये पाणी खेचतो. त्यामुळे मल मऊ होण्यास आणि पोट साफ होण्यास मदत मिळते.

रताळ्याची रेसिपी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

  • १ मध्यम आकाराचे रताळे
  • थोडे ऑलिव्ह ऑइल
  • चवीनुसार काळी मिरी

आतड्यांचे आरोग्य सुधारण्यासाठी रताळ्याची रेसिपी कशी बनवावी?

पहिली पायरी: रताळे अर्धे कापा. त्यावर थोडे ऑलिव्ह ऑइल आणि काळी मिरी घाला. त्यानंतर कापलेली बाजू खाली ठेवून ते पार्चमेंट पेपरवर ठेवा.

दुसरी पायरी: आता ते ४५ मिनिटे मऊ होईपर्यंत बेक करा. बेक झाल्यानंतर ते २४ तास फ्रीजमध्ये ठेवा. त्यानंतर २४ तासांनी पुन्हा गरम करून खा.

ही पद्धत फायदेशीर का आहे?

डॉ. जोसेफ सलहाब यांच्या मते, रताळे थंड झाल्यानंतर त्यातील काही स्टार्चचे रूपांतर ‘रेझिस्टंट स्टार्च’मध्ये होते. हा रेझिस्टंट स्टार्च आतड्यांमध्ये पुढे जाऊन तेथील चांगल्या बॅक्टेरियांना पोषण देतो. त्यामुळे मलाचे प्रमाण वाढण्यास आणि पोट नियमितपणे साफ होण्यास मदत होऊ शकते.

(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)