Natural Remedies for Constipation: बद्धकोष्ठतेमुळे मल कडक होणे, पोट फुगणे व मलविसर्जनास त्रास होणे अशा समस्या उद्भवू शकतात. आहारातील चुकीच्या सवयींपासून ते अपुऱ्या शारीरिक हालचालींपर्यंत अनेक गोष्टी यांसाठी कारणीभूत ठरतात. अशा वेळी आहारात कोणते बदल करावेत? आयुर्वेद तज्ज्ञांनी सांगितलेले चार उपाय कोणते? जाणून घेऊ…
आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेक जण पोटाच्या समस्यांनी त्रस्त आहेत. अनियमित जेवण, तळलेले पदार्थ, मैद्यापासून बनवलेले खाद्यपदार्थ, अपुऱ्या प्रमाणात पाणी पिणे आणि दिवसभर एकाच जागी बसून काम करणे यांचा पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे काही जणांना वारंवार बद्धकोष्ठतेचा त्रासाला सामोरे जावे लागते. सुरुवातीला किरकोळ वाटणारी ही समस्या पुढे त्रासदायक ठरू शकते.
बद्धकोष्ठतेचा त्रास होत असताना मल कडक होणे, मलविसर्जनाच्या वेळी जोर लावावा लागणे किंवा पोट पूर्णपणे साफ न झाल्याची भावना निर्माण होणे, अशी लक्षणे दिसू शकतात. काही जणांना पोटात जडपणा, पोट फुगणे व भूक मंदावणे अशा स्वरूपाचाही त्रास होतो. मात्र, ही लक्षणे केवळ बद्धकोष्ठतेमुळेच होतात, असे नाही. त्यामुळे असा त्रास वारंवार होत असल्यास त्याकडे दुर्लक्ष करू नये.
मल कडक होण्यामागे नेमके कारण काय?
बद्धकोष्ठता म्हणजे केवळ नियमित मलविसर्जन न होणे नव्हे. मल कडक होणे, मलविसर्जनास त्रास होणे आणि मल पूर्णपणे बाहेर न पडल्याची भावना निर्माण होणे हीदेखील त्याची महत्त्वाची लक्षणे आहेत.
आपल्या मोठ्या आतड्याचे एक महत्त्वाचे काम म्हणजे मलातील पाणी शोषून घेणे. मल मोठ्या आतड्यातून पुढे सरकत असताना त्यातील पाण्याचे प्रमाण कमी होते. मल आतड्यात जास्त काळ राहिल्यास, त्यातील अधिक पाणी शोषले जाऊ शकते. परिणामी, मल कोरडा आणि कडक होतो. त्यामुळे मलविसर्जन करताना त्रास होऊ शकतो.
आहारात तंतुमय पदार्थांची कमतरता, कमी पाणी पिणे, शारीरिक हालचालींचा अभाव, ताणतणाव आणि मलविसर्जनाची इच्छा वारंवार दाबून ठेवणे यांमुळेही बद्धकोष्ठतेचा त्रास वाढू शकतो. काही औषधे आणि विशिष्ट वैद्यकीय समस्यांमुळेही हा त्रास उद्भवू शकतो.
बद्धकोष्ठतेची ही लक्षणे ओळखा
बद्धकोष्ठतेचा त्रास होत असल्यास प्रत्येक व्यक्तीमध्ये सारखीच लक्षणे दिसतील, असे नाही. तरीही लक्ष देणे महत्त्वाचे ठरू शकते अशी लक्षणे खालीलप्रमाणे :
- मल कडक होणे किंवा मलविसर्जनासाठी जोर लावावा लागणे.
- नेहमीपेक्षा कमी वेळा मलविसर्जन होणे.
- पोट फुगल्यासारखे वाटणे किंवा पोटात जडपणा जाणवणे.
- मलविसर्जनानंतरही पोट पूर्णपणे साफ न झाल्याची भावना असणे.
- पोटात अस्वस्थता किंवा कळा येणे.
- भूक मंदावणे किंवा पोट भरल्यासारखे वाटणे.
मळमळ, उलट्या, तीव्र पोटदुखी किंवा सतत थकवा जाणवत असल्यास त्यामागे इतर कारणेही असू शकतात. विशेषतः तीव्र पोटदुखी, पोट खूप फुगणे, उलट्या होणे आणि मल किंवा वायू अजिबात बाहेर न पडणे, अशा स्वरूपाची लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय मदत घ्यावी.
बद्धकोष्ठतेपासून आराम मिळविण्यासाठी आहारात करा ‘हे’ ४ बदल
आयुर्वेद तज्ज्ञ डॉ. अखिलेश शर्मा यांनी दिलेल्या मूळ माहितीमध्ये बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी काही घरगुती उपाय आणि आहारातील बदल सुचवण्यात आले आहेत. मात्र, प्रत्येक उपाय सर्वांसाठी योग्य असेलच, असे नाही. त्यामुळे कोणताही उपाय नियमित सुरू करण्यापूर्वी त्यांची सुरक्षितता लक्षात घेणे आवश्यक आहे.
१. बडीशेप आणि दुधाचा पर्याय
बडीशेपचा वापर पचनाशी संबंधित काही किरकोळ तक्रारींसाठी पारंपरिक पद्धतीने केला जातो. मूळ माहितीनुसार, ग्लासभर दुधात एक चमचा कुटलेली बडीशेप घालून, ते उकळण्याची पद्धत सांगण्यात आली आहे. त्यानंतर हे उकलेले दूध गाळून घेण्याचा सल्ला दिला गेला आहे.
२. हळद आणि काळी मिरी घातलेले दूध
मूळ माहितीत बद्धकोष्ठतेसाठी ग्लासभर दुधात अर्धा चमचा हळद आणि तीन ते चार काळ्या मिरीचे दाणे घालून दूध उकळण्याची पद्धत सांगितली गेली आहे; पण दूध किंवा मसाल्यांमुळे त्रास होत असल्यास हा पर्याय टाळावा.
३. कोरफडीचा गर वापरताना घ्या काळजी
कोरफडीचा वापर विविध घरगुती उपायांमध्ये केला जातो. मात्र, कोरफडीच्या पानातील सर्व घटक खाण्यासाठी सुरक्षित नसतात. विशेषतः पानाच्या सालीजवळील पिवळसर रसामध्ये रेचक परिणाम करणारे घटक असू शकतात. त्यांचे सेवन केल्यास पोटात कळा येणे, जुलाब होणे आणि शरीरातील पाणी व क्षारांचे संतुलन बिघडणे, असे दुष्परिणाम होऊ शकतात.
त्यामुळे कोरफडीचा गर थेट काढून, ठरावीक प्रमाणात खाण्याबाबतच्या सल्ल्याचा अवलंब स्वतःहून करू नये. त्याऐवजी बद्धकोष्ठतेसाठी कोरफडीच्या उत्पादनाचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
४. पचायला सोप्या भाज्यांचा आहारात समावेश करा
बद्धकोष्ठतेचा त्रास कमी करण्यासाठी आहारातील तंतूंचे प्रमाण वाढवणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी दुधी भोपळा, दोडका, भोपळा, हिरव्या शेंगा व पालेभाज्यांचा आहारात समावेश करता येतो. त्याशिवाय फळे, ओट्स, संपूर्ण धान्ये आणि डाळी यांमधूनही तंतू मिळतात.
तंतुमय पदार्थांचे प्रमाण एकदम वाढविण्याऐवजी ते हळूहळू वाढवावे आणि पुरेसे पाणी प्यावे; अन्यथा काही व्यक्तींमध्ये पोट फुगणे किंवा गॅसचा त्रास वाढू शकतो. नियमित चालणे, शारीरिक हालचाल करणे आणि मलविसर्जनाची इच्छा दाबून न ठेवणे यांचाही फायदा होऊ शकतो.
वारंवार बद्धकोष्ठता होत असल्यास काय करावे?
बद्धकोष्ठतेचा त्रास वारंवार होत असेल किंवा घरगुती उपाय करूनही आराम मिळत नसेल, तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. आहार, जीवनशैली, औषधे आणि इतर वैद्यकीय कारणे तपासून योग्य ते उपचार ठरवता येतात. मलात रक्त दिसणे, विनाकारण वजन कमी होणे किंवा पोटदुखीचा त्रास सातत्याने होणे ही लक्षणे असल्यास वैद्यकीय तपासणी करून घेणे आवश्यक आहे.
(लक्षात ठेवा : बद्धकोष्ठतेपासून आराम मिळविण्यासाठी केवळ घरगुती उपायांवर अवलंबून राहण्याऐवजी संतुलित आहार, पुरेसे पाणी, नियमित हालचाल आणि गरजेनुसार वैद्यकीय उपचार यांना प्राधान्य द्या.)
