scorecardresearch

‘स्वीटनर’मुळे कर्करोगाचा धोका

अमेरिकेत विकले जाणारे ‘क्लायक्लामेट’मुळे उंदरात मूत्राशयाचा कर्करोग होतो

बर्मिगहॅम : खाद्यपदार्थाचा गोडवा वाढवणारे कृत्रिम पदार्थ (स्वीटनर) तब्येतीला अपायकारक असतात. त्यांच्या दीर्घ सेवनामुळे कर्करोगासारखा धोका उद्भवू शकतो. एका अभ्यासानुसार असे निदर्शनास आले होते, की कृत्रिम गोडवा असलेले पदार्थ जास्त प्रमाणात दीर्घ काळ खाल्ल्याने स्थूलपणा, टाईप २ मधुमेह, हृदयविकाराचा धोका असतो. परंतु त्यामुळे कर्करोग होतो, याबाबत अनिश्चितता होती.

अमेरिकेत विकले जाणारे ‘क्लायक्लामेट’मुळे उंदरात मूत्राशयाचा कर्करोग होतो, असे १९७० मध्ये झालेल्या अभ्यासात निदर्शनास आले. मानवी शरीररचना उंदरापेक्षा वेगळी असल्याने या ‘स्वीटनर’मुळे मानवी शरीरात कर्करोगाचा प्रादुर्भाव होतो अथवा नाही, याबाबत निश्चित निष्कर्ष या अभ्यासाद्वारे काढता आले नाहीत. तरीही ‘स्वीटनर’ आणि कर्करोगाचा संबंध लावला जात होता. परंतु नुकत्याच झालेल्या एका अभ्यासात एक लाख जणांचा अभ्यास करण्यात आला. त्यात ज्या व्यक्तींच्या खाद्यसेवनात काही ‘स्वीटनर’चे प्रमाण बरेच जास्त आहे, त्यांना ठरावीक कर्करोग होण्याचा धोका थोडा वाढल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या ‘स्वीटनर’सेवनाच्या मोजणीसाठी त्यांना नोंदवही ठेवण्यास सांगितले. यापैकी जवळपास निम्म्या सहभागींचा आठ वर्षे अभ्यास करण्यात आला. बऱ्याच खाद्यपदार्थात ‘स्वीटनर’ असतात. त्याची चव आपल्याला साखरेप्रमाणेच भासते. काही तर अतिगोड असतात तरीही त्यात कमी उष्मांक अथवा उष्मांक नसतातच. ‘स्टेव्हिया’, ‘याकोन सिरप’सारखी काही ‘स्वीटनर’ नैसर्गिकरित्या तयार होतात. ‘अस्पार्टेम’सारखी काही ‘स्वीटनर’ कमी अथवा उष्मांकयुक्त नसतात. परंतु या ‘स्वीटनर’चा आपल्या आरोग्यावर दुष्परिणाम होतोच. ‘अस्पार्टेम’ आपल्या शरीरात पचल्यानंतर ‘फॉर्मल्डेहाइड’मध्ये (कर्करोगास पोषक घटक) रूपांतरित होते. ते आपल्या पेशींमध्ये जाऊन साठते. त्यानंतर यापेशी कर्करोगयुक्त होण्याचा धोका वाढतो.

मराठीतील सर्व लाइफस्टाइल ( Lifestyle ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Consuming artificial sweeteners increased cancer risk zws

ताज्या बातम्या