Vegetables To Reduce Cholesterol: आजकाल बदललेली जीवनशैली, ताणतणाव आणि अयोग्य आहार यांमुळे रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉलची समस्या झपाट्याने वाढताना दिसते. तळलेले पदार्थ, प्रक्रिया केलेले अन्न, अधिक गोड पदार्थ व मांसाहार यांमुळे रक्तवाहिन्यांमध्ये मेद साचू लागतो. हाच साचलेला मेद पुढे जाऊन रक्तप्रवाहात अडथळा निर्माण करतो आणि हृदयविकार, मेंदू आघात, तसेच उच्च रक्तदाबाचा धोका वाढवतो. विशेषतः हृदयविकाराचा झटका येण्यामागे हीच प्रमुख कारणे असतात. त्यामुळे रक्तातील कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवणे अत्यावश्यक ठरते.

तज्ज्ञांच्या मते, औषधोपचारांसोबतच योग्य आहार हा सर्वांत प्रभावी उपाय आहे. काही विशिष्ट भाज्यांचा नियमित आहारात समावेश केल्यास रक्तवाहिन्या स्वच्छ राहतात, मेद साचण्याचा वेग कमी होतो आणि हृदयाचे आरोग्य सुधारते. या भाज्यांमध्ये तंतुमय घटक, प्रतिऑक्सिडंट आणि सूज कमी करणारे गुणधर्म मुबलक प्रमाणात असतात. विशेष म्हणजे या सर्व भाज्यांमध्ये कोलेस्ट्रॉल जवळजवळ शून्य असते आणि उष्मांकही कमी असतो. त्यामुळे वजन नियंत्रणात राहते आणि शरीर हलके वाटते.

१. कंटोला (कंटोळा)

कंटोला (Kantola) ही पावसाळ्यात मिळणारी एक पौष्टिक, काटेरी आणि रानभाजी आहे, जिला ‘कर्टुले’, ‘कंटोळी’ किंवा ‘स्पिनी गॉर्ड’ (Spiny Gourd), असेही म्हणतात. ही भाजी कारल्याच्या प्रजातीतील असून, आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आणि औषधी गुणधर्मांनी परिपूर्ण मानली जाते. ती प्रामुख्याने डोंगराळ भागात वाढते. ही भाजी अनेकांना फारशी परिचित नसली तरी तिचे गुणधर्म आश्चर्यकारक आहेत. कंटोळ्यामध्ये भरपूर तंतुमय घटक असतात. हे तंतू शरीरातील अतिरिक्त वाईट कोलेस्ट्रॉल शोषून घेण्यापूर्वीच बाहेर टाकण्यास मदत करतात. तसेच त्यातील प्रतिऑक्सिडंट सूज कमी करतात. सूज हीच रक्तवाहिन्यांमध्ये मेद साचण्याची सुरुवात असते. नियमित सेवन केल्यास रक्तप्रवाह सुरळीत राहतो आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होतो.

२. भेंडी

भेंडीतील ‘पेक्टिन’ हा तंतुमय घटक कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी प्रभावी मानला जातो. हा घटक रक्तातील मेदाला बांधून शरीरातून बाहेर टाकतो. भेंडीमध्ये सूक्ष्म पोषक द्रव्ये आणि प्रतिऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात. त्यामुळे हृदय निरोगी राहण्यास मदत होते. त्याशिवाय भेंडी खाल्ल्याने पोट लवकर भरल्याची जाणीव होते. त्यामुळे अति खाणे टळते आणि वजन नियंत्रणात राहते.

३. परवल

स्वयंपाकघरात सहज मिळणारी परवल ही भाजी गुणांनी समृद्ध आहे. त्यामध्ये विद्राव्य तंतू मोठ्या प्रमाणात असतात. हे तंतू रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत करतात. परवलमध्ये मेद नसल्यामुळे आणि उष्मांक कमी असल्यामुळे वजन वाढण्याचा धोका राहत नाही. त्यातील प्रतिऑक्सिडंट घटक रक्तवाहिन्यांमध्ये थर तयार होण्यापासून संरक्षण करतात.

४. दुधी भोपळा (लौकी)

दुधी भोपळ्यामध्ये पाणी आणि तंतू भरपूर प्रमाणात असतात. तो शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर टाकण्यास मदत करतो. नियमित सेवन केल्यास रक्तदाब नियंत्रणात राहतो. दुधी भोपळ्याचा रस सकाळी घेतल्यास शरीराला शीतलता मिळते आणि रक्तातील वाईट मेद हळूहळू कमी होऊ लागतो.

५. कारले

कडू चव असलेले कारले आरोग्यासाठी अमूल्य आहे. त्यामध्ये विद्राव्य तंतू आणि वनस्पतीजन्य सक्रिय घटक असतात. हे घटक रक्तातील अतिरिक्त कोलेस्ट्रॉल कमी करतात. कारल्यातील प्रतिऑक्सिडंट सूज कमी करून, रक्तवाहिन्या मोकळ्या ठेवतात. त्यामुळे रक्तप्रवाह सुरळीत राहतो आणि हृदय सुदृढ राहते.

योग्य आहार, नियमित व्यायाम आणि ताणतणावावर नियंत्रण या त्रिसूत्रीचा अवलंब केल्यास हृदयविकाराचा झटका टाळणे शक्य आहे. आपल्या दैनंदिन जेवणात या भाज्यांचा समावेश करून आपण निरोगी आयुष्याकडे एक महत्त्वाचे पाऊल टाकू शकतो.