Control Uric Acid : शरीरात युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढल्याने अनेक आरोग्य समस्यांचा धोका वाढतो. ही एक अशी समस्या आहे, जी एकदा वाढली की, नियंत्रित करणे खूप कठीण होते. युरिक अ‍ॅसिडचे प्रमाण वाढल्याने किडनी स्टोन, गाउट व सांधेदुखी यांसारख्या गंभीर आणि वेदनादायक समस्या उदभवू शकतात. काटेरी नाशपाती वा नागफणी ही ओपंटिया प्रजातीची सदस्य वनस्पती युरिक अ‍ॅसिड नियंत्रित करण्यासाठी खूप प्रभावी आहे. आयुर्वेद तज्ज्ञ आचार्य बाळकृष्ण यांनी नागफणीचे फायदे स्पष्ट केले आहेत.

नागफणीचे फायदे

आचार्य बाळकृष्ण यांनी स्पष्ट केले की, नागफणी आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. त्याचे सेवन केल्याने अनेक आजारांपासून बचाव होऊ शकतो, ज्याला काटेरी नाशपाती, असेही म्हणतात. ही आयुर्वेदात अनेक आजारांवर उपचार करण्यासाठी वापरली जाणारी एक औषधी वनस्पती आहे.

लघवीच्या समस्या होतील दूर

आचार्य बालकृष्ण यांच्या मते, ज्यांना लघवीचा त्रास आहे त्यांनी ४ ते ५ ग्रॅम नागफणी रूट, १ ग्रॅम मेथी, १ ग्रॅम सेलेरी व १ ग्रॅम सुके आले ४०० ते ५०० मि.लि. पाण्यात उकळावे. जेव्हा ते द्रावण फक्त १०० मि.लि. उरते तेव्हा ते गाळून प्यावे. या औषधी द्रावणाचे सेवन केल्याने वाताशी संबंधित आजारांपासून आराम मिळेल. त्याशिवाय,ज्यांना नुकताच संधिवाताचा त्रास सुरू झाला आहे. त्यांचा संधिवात थांबण्यासही मदत मिळू शकते.

युरिक अ‍ॅसिड नियंत्रण

आचार्य बाळकृष्ण यांनी स्पष्ट केले की, एकदा शरीरात यूरिक अ‍ॅसिडची पातळी वाढली की, ती हळूहळू वाढत राहते. जरी बरेच लोक इतर उपायांनी युरिक अ‍ॅसिडची पातळी नियंत्रित करीत असले तरी ती वारंवार वाढते. अशा परिस्थितीत हा उपाय यूरिक अ‍ॅसिडची पातळी नियंत्रित करण्यास मदत करू शकतो. काटेरी नाशपातीमध्ये अँटीऑक्सिडंट्स व फायबर असतात, जे शरीरातील विषाक्त घटक बाहेर काढण्यास मदत करतात. ते मूत्रपिंडांचे कार्यदेखील सुधारते, ज्यामुळे युरिक अ‍ॅसिडची पातळी संतुलित होण्यास मदत मिळते.

जळजळ होण्यापासून आराम

ज्यांना शरीरावर सूज किंवा शरीरदुखीचा त्रास आहे, त्यांनी नागफणीची तीन ते चार मुळे, एक ग्रॅम सुके आले, एक ग्रॅम सेलेरी व एक ग्रॅम मेथी उकळवून तयार केलेला काढा घ्यावा. त्यामुळे सूज लवकर दूर होईल. नागफणीत दाहकविरोधी गुणधर्म असतात, जे संधिरोग आणि सांध्यांची जळजळ कमी करण्यास मदत करतात.

युरिक अ‍ॅसिड हा आपल्या अन्नातील प्युरिनच्या विघटनामुळे तयार होणारा पदार्थ आहे. अनेक पदार्थ आणि पेयांमध्ये प्युरिन जास्त प्रमाणात आढळते, ज्यामुळे युरिक अ‍ॅसिडची पातळी वाढण्याचा धोका वाढू शकतो. म्हणूनच आपण आपल्या आहाराबद्दल विशेषतः काळजी घेतली पाहिजे आणि जास्त प्युरिन असलेल्या पदार्थांचे मर्यादित प्रमाणातच सेवन केले पाहिजे. सफरचंद खाल्ल्याने युरिक अ‍ॅसिड नियंत्रित होण्यास मदत होते. सफरचंदांमध्ये मॅलिक अ‍ॅसिड असते, जे आपल्या रक्तातील युरिक अ‍ॅसिडची पातळी नियंत्रित करण्यास मदत करते.