तुम्ही जर पाककलेचा आनंद घेत असाल तर ते तुमच्या मानसिक आरोग्यासाठी चांगले आहे. कारण स्वयंपाक केल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत होते, असे संशोधन ऑस्ट्रेलियातील मनोविकार तज्ज्ञांनी नुकतेच केले आहे. स्वयंपाक केल्याने तणावमुक्ती होते आणि मन प्रफुल्लित होण्यास मदत होते, असे या संशोधकांनी सांगितले.

ऑस्ट्रेलियातील एडिथ कोवान विद्यापीठातील संशोधकांनी याबाबत संशोधन केले असून त्यासंबंधीचा अहवाल ‘जर्नल फ्रंटायर्स इन न्युरेशन’ या नियतकालिकेत प्रसिद्ध झाला आहे. स्वयंपाक करण्याचा सकारात्मक परिणाम म्हणजे तुम्हाला हवा असलेला आहार घेता येतो. तसेच तुमचा आत्मविश्वास वाढतो आणि तुम्हाला आत्मिक समाधान मिळते, असे या संशोधकांनी सांगितले.

या विद्यापीठाने काही पाककला शिकवणी वर्गाच्या मदतीने २०१६ ते २०१८ या दरम्यान ‘स्वयंपाक कसा करावा?’ अशा एका कार्यक्रमाचे आयोजन केले. ६५७ जणांनी त्यात सहभाग घेतला. विशेष म्हणजे त्यापैकी अनेकांचे शारीरिक वजन अतिरिक्त होते. सकस आहार कसा बनवावा याचे प्रशिक्षण या सात दिवसांच्या शिकवणी वर्गाद्वारे त्यांना देण्यात आले. या सर्वावर तज्ज्ञांनी विशेष लक्ष दिले. त्यांच्यात होणाऱ्या मानसिक बदलांचे निरीक्षण करण्यात आले. स्वयंपाक शिकल्यानंतर त्यांच्यात आत्मविश्वास आल्याने आणि त्यांना अतीव समाधान लाभल्याचे संशोधकांच्या लक्षात आले. त्यासोबत सकस आहाराबाबतही त्यांना माहिती मिळाली, असे संशोधकांनी सांगितले. या शिकवणी वर्गानंतर सहा महिन्यांनी सहभागी झालेल्यांशी चर्चा केल्यानंतर ते तणावमुक्त झाल्याचे संशोधकांनी सांगितले.