घरात भाजी, आमटी किंवा न्याहरीचा एखादा पदार्थ तयार झाला की त्यावर हिरवीगार कोथिंबीर हवीच. यामुळे पदार्थ दिसायला तर छान दिसतोच पण त्याचा स्वादही वाढतो. मात्र कोथिंबीर केवळ दिसणे आणि स्वादासाठी नाही तर ती आरोग्यासाठीही अतिशय उपयुक्त असते. कोथिंबीरीतून मोठ्या प्रमाणात कॅल्शियम मिळते असे आपण अनेकदा ऐकतो, पण त्याशिवायही कोथिंबीरीमध्ये अनेक गुणधर्म आहेत. वेगवेगळ्या आजारांवरील उपाय म्हणून कोथिंबीरीचा उपयोग होतो. तेव्हा कोथिंबीरीमुळे कोणत्या आजारांपासून सुटका होते पाहूयात

१. स्टोन – ज्या लोकांना स्टोनचा त्रास आहे त्यांनी रोज सकाळी उठल्यावर कोथिंबीरचे पाणी प्यावे. यासाठी पाण्यात कोथिंबीर टाकून ते पाणी उकळावे. त्यानंतर गाळून हे पाणी प्यावे. रिकाम्या पोटी हे पाणी प्यायल्यास मूत्रातून या स्टोनचा विसर्ग होतो.

२. पोटाच्या समस्यांपासून सुटका – २ कप पाण्यात जीरे आणि कोथिंबीर टाकावी. त्यानंतर यामध्ये चहा पावडर आणि बडिशेप टाकावी. हे मिश्रण २ मिनिटे गॅसवर ठेऊन उकळावे. आवडीनुसार साखर आणि आले टाकून २ ते ३ उकळ्या काढून घ्याव्यात. हे मिश्रण गाळून प्यायल्यास गॅसच्या समस्येपासून मुक्ती मिळते आणि पचनाची यंत्रणा सुधारण्यास मदत होते.

३. डोळ्यांची आग कमी होण्यास उपयुक्त – बडिशेप, साखर आणि धने समप्रमाणात घेऊन ते मिक्सर करुन घ्यावे. जेवणानंतर ही पावडर ६ ग्रॅम खावी. त्यामुळे डोळे आणि हातापायांची होणारी आग कमी होते.

४. नाकातून होणाऱ्या रक्तस्त्रावापासून सुटका – कोथिंबीरीच्या २० ग्रॅम पानांमध्ये कापूर घालून ते मिक्सरवर बारीक करावे. हा रस गाळून घेऊन दोन थेंब दोन्ही नाकपुडीत टाकावेत. याबरोबरच हा रस कपाळाला लावून हलक्या हाताने मालिश केल्यास नाकातून येणारे रक्त लगेच थांबते.

५. लघवी साफ होण्यास मदत – १ ग्लास पाण्यात २ चमचे बारीक केलेली धने पावडर घालावी. ५ ते ७ मिनीट उकळून घेऊन गार करावे. त्यानंतर गार करुन सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपताना प्यायल्यास लघवी साफ होते.

६. त्वचेसाठी अतिशय उपयुक्त – कोथिंबीर रक्तातील इन्सुलिनची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतो. कोथिंबीर आणि धण्याच्या वापराने मधुमेह पूर्णपणे आटोक्यात येण्यास मदत होते. तजेलदार त्वचेसाठीही कोथिंबीर अतिशय उपयुक्त असते.

(ही माहिती वैद्यकीय संशोधनावर तसेच तज्ज्ञांच्या मतांवर आधारित आहे. त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. त्यामुळे कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)