डॉ. अविनाश सुपे
गेल्या मार्च २०२० पासून आपण सर्व जण करोनाशी वैयक्तिक, कौटुंबिक तसेच सामाजिक पातळीवर वेगवेगळय़ा पद्धतीने सामना करत आहोत. भारतामध्ये अनेक अडचणींवर मात देऊन लसीकरण जोमाने झाले आहे आणि चांगली गोष्ट म्हणजे महाराष्ट्र राज्यात ७ कोटींहून अधिक लोकांना एक मात्रा मिळाला आहे आणि महाराष्ट्रातील ५ कोटींहून अधिक लोकांना लसीकरणाचे दोन्ही मात्रा मिळाल्या आहेत. तरीपण संघटित पायाभूत सुविधांचा अभाव आणि गेल्या काही दिवसांत अचानक झालेल्या वाढीमुळे संकटाची भावना वाढत आहे. गेले जवळजवळ दोन वर्षे सुरू असलेल्या या करोना महासाथीमुळे व्यक्तींच्या शारीरिक आरोग्यावरच विपरीत परिणाम झाला नाही तर त्यांच्या जीवनशैलीतही लक्षणीय बदल घडून आले.




आपल्या देशात अजूनही बहुसंख्य लोकसंख्या ग्रामीण भागात राहते, जिथे आरोग्यसेवा पूर्णपणे उपलब्ध नाहीत. या महामारीत वैद्यकीय निदान व उपचार याकडेच सर्व रोख असल्याने जीवनशैलीशी संबंधित इतर समस्यांना तेवढेसे प्राधान्य मिळाले नाही हेही खरे आहे. या महासाथीच्या काळात मुखपट्टी, वैयक्तिक संरक्षणात्मक उपकरणे (पीपीई किट), व्हेंटिलेटर, ऑक्सिमीटर, थर्मो-रेग्युलेटर यांसारख्या अनेक प्रतिबंधात्मक आणि संरक्षणात्मक साधनांची गरज तात्काळ वाढली. बहुतेक विद्यमान आरोग्य सुविधा/केंद्रे एकतर समर्पित करोना केंद्रांमध्ये बदलली गेली किंवा विद्यमान आरोग्य संसाधने करोना व्यवस्थापनाकडे हलवण्यात आली. याच काळात टाळेबंदी आणि नंतर अनेक आंशिक किंवा कडक र्निबधांमुळे हालचालींच्या स्वातंत्र्यावरील निर्बंध, सामाजिक आणि शारीरिक अंतर, सेल्फ-आयसोलेशन आणि अलग ठेवण्याचे उपाय यातून संपूर्ण समाजाला जावे लागले. या सर्व प्रक्रियेतून जात असताना आणि आता आपल्यावर विविध र्निबधांसह चढ-उतार होत असताना, खाण्यापिण्याच्या किंवा आहाराच्या सवयी यांसारख्या व्यक्तींमधील जीवनशैलीतील बदलांवर करोनाचा लक्षणीय परिणाम झाला. करोनाच्या या दोन वर्षांत अनेकांची झोपेची स्थिती, व्यायाम, शारीरिक हालचाल, आहार तसेच शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्ही बिघडले. याचा आज आपण विचार करूया.
कोरोना काळामध्ये वर्क फ्रॉम होम, ऑनलाइन व्यवसाय, ओटीटी, टाळेबंदी आणि इतर निर्बंध या सर्वामुळेच अनेकांची जीवनशैली नाटकीयरीत्या बदलली आहे. अनेक लोक घरातून काम करतात आणि कुटुंबातील सदस्यांव्यतिरिक्त इतर लोकांशी फारशा संपर्कात नसतात. त्याचे परिणाम प्रामुख्याने असे आहेत..
१. शारीरिक हालचाल व व्यायाम- बरेच प्रौढ जे कामावर जाण्यासाठी घर सोडत नाहीत आणि घरी जास्त वेळ घालवत आहेत, त्यांच्या दैनंदिन शारीरिक हालचाली किंवा घराबाहेर घालवलेल्या वेळेची पातळी खूपच कमी झाली आहे. व्यायामशाळाही कधी बंद तर कधी मोजक्या लोकांसाठीच सुरू आहेत. वेळेच्या बंधनामुळे अनेकांना व्यायामशाळेत जाता येत नाही. घरच्या घरी व्यायाम कमी होतो. प्रत्येकाने यासाठी स्मार्टफोन किंवा हल्ली उपलब्ध असलेले हातावरील उपकरण यांद्वारे आपण रोज किती पावले चालतो आणि किती व्यायाम करतो यावर लक्ष ठेवून, निदान ६००० -१०००० पावले तरी रोज चालली पाहिजेत. वयानुसार व सवयीनुसार यात थोडा बदल केला तरी नियमित करणे आवश्यक आहे. काम करत असताना दर तासाने किंवा दोन तासांनी एक चक्कर मारली पाहिजे. घरी योग वा प्राणायाम केल्यानेही फायदा होतो.
२. संतुलित आहार- भारतात केलेल्या सर्वेक्षणांमध्ये, लोकांची हालचाल जरी कमी झाली तरी आहार तेवढाच आहे किंवा काही वेळा तो वाढल्याचे आढळले आहे. यांमुळे करोनाच्या काळात स्थूलतेचे व मधुमेहाचे प्रमाण समाजात वाढलेले दिसते. मधल्या वेळेचे खाणे आणि जेवणाची वारंवारता वाढलेली आढळली. ज्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढू शकते अशा वस्तू म्हणजे फळे, हर्बल टॉनिक्स, जीवनसत्त्वे, आले, लसूण यांचे सेवन वाढले. असेही लक्षात आले आहे की बाहेरून मागवलेल्या खाण्यामधून आहारात (पिझ्झा, बर्गर इत्यादी) कर्बोदके (carbohydrates) व चरबी (फॅट्स) याचे जास्त सेवन होते आणि त्यामानाने प्रथिने कमी खाल्ली जात आहेत. भारतीय परंपरेनुसार संतुलित आहार ज्यामध्ये आवश्यक तेवढी प्रथिने नेहमीच खावीत. आपल्या वजनाप्रमाणे प्रत्येक किलोमागे १ ग्राम प्रथिने खाणे आवश्यक आहे. काही व्यक्तींनी च्यवनप्राश, हर्बल चहा/डीकोक्शन (काढा), तुळस, दालचिनी, काळी मिरी, सुंठ, बेदाणे, नैसर्गिक साखर यांच्या सेवनात मोठी वाढ केली आहे. गूळ, ताजे लिंबू आणि हळदमिश्रित दूध याचा ही वापर जास्त झाला. परंतु या सर्वाचा अतिवापर न करता योग्य प्रमाणात केला पाहिजे.
३. निवांत झोप- दिवसभर काम व रात्री ओटीटीवर चित्रपट पाहिल्यामुळे रात्रीची झोप कमी होते आणि त्यामुळे त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. झोपेच्या एकूण वेळेबरोबर तिची गुणवत्ताही महत्त्वाची. व्यायाम नसल्यामुळे व रात्री जागरणामुळे अनेकांना शांत व निवांत झोप लागत नाही असे लक्षात आहे. प्रत्येकाला निदान ६-७ तास चांगल्या झोपेची गरज असते.
४. डोळय़ांची निगा- जात तुम्ही सतत लॅपटॉप किंवा मोबाइलवर काम करत असाल किंवा बघत असाल तर डोळे चुरचुरणे, लाल होणे ही लक्षणे दिसतात. यासाठी डोळय़ाच्या व्यायामासोबत, स्क्रीन वेळेवर बंधन, उत्तम फिल्टर्स व औषधे आवश्यक असतात.
५. मानसिक संतुलन- फिरण्यावरील बंधने, व्यवसायातील आर्थिक नुकसान व मनाचा कोंडमारा यामुळे अनेकांचे मानसिक संतुलनही बिघडले आहे. कुटुंब, मित्र परिवार व इतरांशी चांगले संवाद व सकारात्मक वागणूक याने हा तणाव कमी करून मानसिक संतुलन योग्य ठेवता येईल. भारतीय नागरिकांच्या जीवनशैलीवर दीर्घकाळ होणारा परिणाम समजून घेण्यासाठी आपण सातत्याने होणाऱ्या बदलांचे निरीक्षण करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. या साथीच्या रोगात मजबूत राहण्यासाठी रोगप्रतिकारक शक्ती तयार करण्यासाठी संतुलित आहाराची आवश्यकता आहे. आपल्या महाराष्ट्रीय संस्कृतीमध्ये असलेला आरोग्यदायी संतुलित आहार आणि खाण्याच्या पद्धती तसेच करोना/ तत्सम आजारांच्या प्रतिबंधासाठी संतुलित आहाराची भूमिका याविषयी ज्ञानाचा प्रसार करण्याची गरज आहे. कोविड अजून संपला नाही. नंतर संपला तरी दुसरे अनेक आजार येऊ शकतात. म्हणूनच संतुलित आहार, नियमित व्यायाम, निवांत झोप व शांत मन याने आपली जीवन शैली कशी समृद्ध करता येईल हेच खरे!