करोना नि पावसाळी आजार

टाळेबंदीचे नियम शिथिल केल्यामुळे नागरिकांचे बाहेर जाण्याचे प्रमाण वाढले आहे.

डॉ.नीलम रेडकर, औषधशास्त्र विभाग प्रमुख, कूपर रुग्णालय 

सध्या करोना रुग्णसंख्या कमी होऊ लागली असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढले आहे, ही निश्चितच दिलासादायक बाब आहे. परंतु त्यामुळे गाफील राहून चालणार नाही. कारण गेल्या काही दिवस होत असलेल्या अतिवृष्टीमुळे सखल भागांत पाणी साचत आहे. टाळेबंदीचे नियम शिथिल केल्यामुळे नागरिकांचे बाहेर जाण्याचे प्रमाण वाढले आहे. पाणी साचून राहिल्याने किंवा पाण्याचा योग्य निचरा न झाल्यामुळे मलेरिया, डेंग्यू हे आजार पसरवणाऱ्या डासांची उत्पत्ती वाढणार आहे आणि त्यामुळे या आजाराने ग्रस्त रुग्णांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे करोनाबरोबरच पावसाळ्यातील आजारांनी ग्रस्त रुग्णसंख्या वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. यासाठी नागरिक, डॉक्टर आणि प्रशासनाने एकत्रितपणे या संकटाचा सामना करणे गरजेचे आहे.

पावसाळ्यातील आजारांची प्रमुख लक्षणे-

’ ताप येण्याआधी थंडी वाजणे, ताप कमी झाल्यावर घाम येणे, ताप दिवसाआड किंवा रोज येणे, रक्तातील पांढऱ्या पेशी कमी होणे ही हिवताप किंवा मलेरियाच्या आजाराची लक्षणे आहेत. अ‍ॅनॉफिलिस डासांच्या चावण्याने या आजाराचे जंतू मानवी शरीरात प्रवेश करतात. प्लासमेडिअम फाल्सिपॅरम प्रकारच्या मलेरियाच्या जंतूंमुळे रुग्णकोमात जाण्याची आणि दगावण्याची शक्यता अधिक असते.

’ थंडी ताप, डोकेदुखी, अंगदुखी, डोळे दुखणे; असा हाडे मोडणारा ताप डेंग्यूने संक्रमित रुग्णांमध्ये दिसून येतो. एडिस डासांच्यामुळे हा आजार संक्रमित होतो. डेंग्यू रक्तस्राावात्मक तापात अंगावर लाल पुरळ किंवा चट्टे उठणे, शरीरातील अंतर्गत भागात रक्तस्रााव होणे, छातीत किंवा पोटात पाणी जमा होणे ही गंभीर लक्षणे दिसू शकतात.

’ ताप, अंगदुखी, स्नायूंमध्ये तीव्र वेदना, कावीळ होणे, डोळे लालसर होणे ही लक्षणे लेप्टोस्पायरोसिस आजारांमध्ये दिसून येतात. उंदीर, पाळीव प्राणी कुत्रा, गाय आणि म्हैस यांच्या मूत्राद्वारे या आजाराचे जिवाणू शरीरात त्वचेच्या माध्यमातून प्रवेश करतात.

’ पावसाळ्यात होणारे इतर आजार म्हणजे अतिसार, कावीळ आणि विषमज्वर (टायफॉइड). दूषित पाणी आणि अन्नपदार्थाच्या सेवनाने हे आजार होतात. हे आजार होऊ नयेत म्हणून उघड्यावरचे अन्नपदार्थ खाणे टाळले पाहिजे आणि पिण्याचे पाणी उकळून गार केलेले वापरले पाहिजे.

करोनाची लक्षणे पावसाळी आजारांपेक्षा कशी वेगळी आहेत?

’ वास न येणे, तोंडाची चव जाणे, ताप आणि अंगदुखी, सुका खोकला येणे किंवा घसा खवखवणे, थकवा येणे, हृदयाचे ठोके वाढणे, दम लागणे, छातीत दुखणे शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होणे ही करोनाची लक्षणे आहेत.

५करोना आणि पावसाळी आजार यांची लक्षणे खालील प्रकारे समान असू शकतात-

’ ताप, डोकेदुखी, अंगदुखी, थकवा जाणवणे

’ जुलाब होणे

’ भूक न लागणे

’ हृदयाचे ठोके वाढणे, श्वासोच्छ्वास वाढणे.

 

पावसाळी आजार आणि करोनाचे धोके आणि आव्हाने-

’ कोविड १९च्या संसर्गासोबत मलेरिया किंवा डेंग्यू किंवा लेप्टोपायरोसिस किंवा आधी नमूद केल्याप्रमाणे पावसाळ्यातील इतर आजार रुग्णांना होऊ शकतात.

’ अशा दोन भिन्न जंतुसंसर्गामुळे लक्षणे वेगळ्या प्रकारची म्हणजेच गंभीरसुद्धा असू शकतात. करोनाच्या संसर्गामुळे रुग्णांमध्ये पांढऱ्या पेशींचे प्रमाण कमी होते. त्यामुळे इतर जंतुसंसर्ग – उदाहरणार्थ मलेरिया, क्षय होण्याचा धोका वाढतो.

’ वातावरणातील बदल, रुग्णांची कमी झालेली रोगप्रतिकारकशक्ती यासाठी कारणीभूत ठरतात.

’ या सर्व बाबी लक्षात घेता दोन भिन्न जंतुसंसर्ग रुग्णांमध्ये होण्याची शक्यता आहे. याबद्दल डॉक्टरांनी आणि नागरिकांनी जागरूक राहिले पाहिजे.

’ तापाच्या रुग्णांमध्ये लक्षणांप्रमाणे कुठल्या वैद्यकीय चाचण्या करायच्या हे काळजीपूर्वक ठरवले पाहिजे. करोनाची चाचणी (आरटीपीसीआर आणि अँटीजेन टेस्ट नकारात्मक आल्यास लक्षणांप्रमाणे मलेरिया, डेंग्यू किंवा लेप्टोस्पायरोसिसचे निदान करण्यासाठी चाचण्या करण्याची गरज आहे.).

’ मलेरिया किंवा हिवतापाच्या निदानासाठी मुबलक प्रमाणात जलद चाचण्यांसाठी किट्स उपलब्ध आहेत. म्हणून त्यांचा उपयोग केला गेला पाहिजे.

’ त्याउलट मलेरिया किंवा पावसाळ्यातील इतर आजारांचे निदान झाल्यावरही गरज वाटल्यास करोनाची चाचणी केली पाहिजे. अशा रुग्णांची चाचणी सकारात्मक आल्यास योग्य उपचार पद्धती आणि गृहविलगीकरणाच्या सूचना तंतोतंत पाळणे आवश्यक आहे. कारण करोनाचा एक रुग्ण साधारणत: संपर्कात आलेल्या तीन लोकांना संक्रमित करू शकतो. तसेच मलेरिया आणि डेंग्यूच्या संक्रमणाचे वेळेत निदान करून डासांमुळे समुदायाला मोठ्या होणारा संसगू रोखू शकतो.

’ पावसाळ्यातील आजार आणि करोनाचा जंतुसंसर्ग अतिप्रमाणात कहर करू नये म्हणून खालीलप्रमाणे काळजी घेणे आवश्यक आहे –

’ झोपताना पूर्ण शरीर झाकले जाईल असे कपडे परिधान करणे, मच्छरदाणीचा वापर योग्य ठरेल. साठवलेले पाणी व्यवस्थित झाकून ठेवले पाहिजे. फुलदाणीतील पाणी दररोज बदलले पाहिजे. सोसायटीमध्ये मच्छरवाढीचे प्रमाण दिसून आले तर लागलीच स्थानिक प्रशासनाला कळवले पाहिजे.

’ अनवाणी पायाने बाहेर जाणे टाळावे. पावसाच्या पाण्यात जाऊन आल्यावर हातपाय साबणाने स्वच्छ धुवावेत. प्रतिबंधात्मक उपाय म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याने डॉक्सिसायबलनच्या गोळ्या घेणे.

’ भाज्या आणि फळे नीट स्वच्छ धुऊन खावी. अन्न व्यवस्थित झाकून ठेवले पाहिजे. उघड्यावरचे अन्नपदार्थ खाणे टाळले पाहिजे.

’ वारंवार हात धुणे, मास्क लावणे, गर्दीच्या ठिकाणी न जाणे, दोन व्यक्तींमध्ये सुरक्षित अंतर ठेवणे ही कोविड सुसंगत प्रणाली करोनाचा आजार जगातून पूर्णपणे नाहीसा होईपर्यंत अंगीकृत केलीच पाहिजे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Corona virus infection rainy illness akp