देशभरामध्ये करोनाच्या रुग्णांची संख्या दिवसोंदिवस वाढताना दिसत आहे. असं असतानाच दुसरीकडे सरकारकडून करोनासंदर्भात जनजागृती करण्यासाठी वेगवेगळ्या माध्यमांचा वापर केला जात आहे. आता केंद्र सरकारच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने (@MoHFW_INDIA), ट्विटवरुनही लोकांच्या शंकांचे निरसन करणारी सेवा सुरु केली आहे. मंगळवारी ट्विटवरुन ही सेवा सुरु करण्यात आली असून या नव्या सेवेच्या माध्यमातून आता करोनासंदर्भाती शंकांचे निरसन थेट ट्विटवरुन करता येणार आहे. या सेवेच्या माध्यमातून आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाला थेट लोकांशी संवाद साधता येणार आहे.  केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी या सेवेची घोषणा केली. @CovidIndiaSeva या अकाऊंटवर ट्विट करुन प्रश्न विचारल्यास नेटकऱ्यांना त्याची त्वरीत उत्तर देण्यात येतील असं सांगण्यात आलं आहे.

”काळानुरूप ट्विटर विशेषत: गरजेच्‍या काळात संवाद साधण्‍यासह माहितीची देवाणघेवाण करण्‍यासाठी सरकार व नागरिकांसाठी आवश्‍यक सेवा म्‍हणून फायद्याचे ठरले आहे. सोशल डिस्‍टन्सिंगसोबत #IndiaFightsCorona सह आम्‍ही ट्विटरुन थेट संवाद साधण्याचा हा उपक्रम सुरु केला आहे. या सेवेमध्‍ये तज्ञांच्‍या टीमचा समावेश आहे, ज्‍यांना प्रत्‍येक चौकशीला उत्तम प्रतिसाद देण्‍यासाठी प्रशिक्षण देण्यात आलेलं आहे. यामुळे आम्‍हाला भारतीय नागरिकांसोबत थेट संवाद साधता येणार आहे. तसेच आरोग्‍य व सार्वजनिक माहिती देण्‍यासाठी या अधिकृत आणि रिअल-टाइम सेवेचा फायदा होईल,” असं मत केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी व्यक्त केलं आहे.

हे नवीन अकाऊंट स्‍थानिक किंवा राष्‍ट्रीय पातळीवर लोकांसाठी उपलब्‍ध करुन देण्यात आलं आहे.  सरकारने जारी केलेल्‍या उपायांबाबत नवीन अपडेट्स, हेल्‍थकेअर सेवांच्‍या उपलब्‍धेबाबत माहिती किंवा लक्षणे असलेल्‍या व्‍यक्‍तीला कुठून मदत घ्‍यावी याबाबत माहिती मिळत नसल्‍यास मार्गदर्शन अशा विविध सुविधांसह ही सेवा लोकांना अधिका-यांपर्यंत पोहोचण्‍यासाठी या अकाऊंटची मदत होणार आहे. भारतातील लोक त्‍यांच्‍या स्थानिक भाषांमध्‍ये @CovidIndiaSeva येथे ट्विट करत त्‍यांच्‍या चौकशीचे समाधान करू शकतात. ट्विटरने केंद्र व राज्‍य सरकारमधील संबंधित अधिकारी आणि सार्वजनिक आरोग्‍य अधिका-यांसोबत संवाद सुविधा सुरू केली आहे. ज्‍यामुळे ते ट्विटरच्‍या माध्‍यमातून समस्‍या जाणून घेऊ शकतात आणि धोरणात्‍मक कौन्सिलच्‍या मदतीने त्‍यांच्या शंका दूर करुन घेऊ शकतात, तसेच लोकांशी मोठ्या प्रमाणात कनेक्‍ट होऊ शकतात.

या जागतिक आरोग्‍यविषयक संकटाचा सामना  करण्‍यासाठी सरकार आणि आपल्‍या तंत्रज्ञान इंडस्‍ट्रीदरम्‍यान सहयोगात्‍मक दृष्टिकोनाची गरज आहे. सध्याच्या काळामध्ये ट्विटवर खूपच फायद्याचे ठरत आहे. देशाच्‍या कानाकोप-यामधील लोक अधिकारात्‍मक स्रोतांकडून योग्‍य माहिती प्राप्‍त करण्‍यासाठी ट्विटरचा वापर करत आहेत. लोकांना वेळेवर नवीन अधिकृत माहिती उपलब्‍ध करुन देण्यासाठी आरोग्‍य व कुटुंब कल्‍याण मंत्रालय महत्त्वाची भूमिका बजावत आहे. आम्‍हाला त्‍यांच्‍या महत्त्वपूर्ण मोहिमेमध्ये पाठिंबा देण्‍यासाठी संधी मिळाल्याचा आनंद होत आहे,” असं मत या सेवेबद्दल बोलताना ट्विटरच्‍या भारत व दक्षिण आशियामधील सार्वजनिक धोरणाच्‍या संचालक महिमा कौल यांनी व्यक्त केलं.

या अकाउंटवरुन कोणत्या सेवा मिळणार?

·       कोविड-१९ संदर्भात नवीन विश्‍वसनीय माहितीसाठी @CovidIndiaSeva ला फॉलो करा.

·       विशिष्‍ट कोविड-१९ संबंधित चौकशीबाबत प्रतिसादासाठी देखील तुम्‍ही @CovidIndiaSeva येथे ट्विट करू शकता आणि अधिकारी योग्‍य माहितीसह तुमच्‍या ट्विटला प्रतिक्रिया देतील.

·       हे अकाऊंट तुमच्‍या कोरोनाव्‍हायरस-संबंधित चौकशीना प्रतिसाद देण्‍यासाठी आहे. पण तुमची चौकशी ट्विट करण्‍यासाठी कोणतीही खाजगी किंवा संवेदनशील माहिती देण्‍याची गरज नाही, जसे संपर्क माहिती, ओळखपत्रे, वैयक्तिक आरोग्‍य माहिती इत्‍यादी.