Cough After Eating Acid Reflux Symptoms: तुम्ही कधी या गोष्टीकडे बारकाईनं लक्ष दिलं आहे का? पोटभर जेवण केल्यानंतर अचानक खोकला सुरू होतो. कधी गळ्यात काहीतरी अडकल्यासारखं वाटतं, तर कधी वारंवार घसा साफ करण्याची इच्छा होते. काही वेळा आवाजही बदलल्यासारखा जाणवतो. सुरुवातीला आपण याकडे हवामानातील बदल, सर्दी किंवा घशातील संसर्ग म्हणून पाहतो. त्यामुळे लगेच कफ सिरप किंवा घशासाठीची औषधं घेतली जातात. मात्र, या समस्येचा त्रास वारंवार होत असेल, तर त्याकडे दुर्लक्ष न करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात. कारण- यामागे घसा किंवा फुप्फुसांशी संबंधित कारण नसून, पचनसंस्थेशी संबंधित समस्या असू शकते.

गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट डॉ. जोसेफ सालहब यांनी आपल्या इन्स्टाग्रामवरील एका व्हिडीओच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. त्यांच्या मते, जेवल्यानंतर होणारा सततचा खोकला, वारंवार घसा साफ करण्याची गरज किंवा घशात काहीतरी अडकल्यासारखं वाटणं ही लक्षणं लॅरिंगोफॅरिंजियल रिफ्लक्स (LPR) म्हणजेच आम्लपित्ताचा घशापर्यंत होणारा त्रास दर्शवू शकतात.

सर्दी-फ्लू नव्हे, आम्लपित्त असू शकते कारण

सतत खोकला येणं किंवा घशात खवखव जाणवणं म्हणजे प्रत्येक वेळी सर्दी, फ्लू किंवा घशाचा संसर्ग असेलच, असे नाही. काही लोकांमध्ये पोटातील आम्ल वरच्या दिशेनं येऊन घसा आणि स्वरयंत्रापर्यंत पोहोचतं. या स्थितीला LPR, असे म्हणतात.

पोटातील आम्ल आणि पेप्सिन हे पचनासाठी महत्त्वाचे घटक आहेत. मात्र, हे घटक अन्ननलिकेतून वर येऊन स्वरयंत्राच्या भागाला त्रास देऊ लागले, तर तिथे जळजळ होऊ शकते. स्वरयंत्राचा भाग अतिशय संवेदनशील असल्यामुळे या जळजळीचा परिणाम खोकला, घशात खवखव किंवा काहीतरी अडकल्याची भावना अशा स्वरूपात जाणवू शकतो.

जेवल्यानंतरच खोकला का वाढतो?

जेवण झाल्यानंतर पोट भरते. अशा वेळी पोटातील आम्ल वरच्या दिशेने येण्याची शक्यता वाढू शकते. हे आम्ल आणि पेप्सिन घशाच्या किंवा स्वरयंत्राच्या भागापर्यंत पोहोचल्यास तेथील संवेदनशील भागाला जळजळ होऊ शकते. परिणामी खोकला सुरू होणे, घसा वारंवार साफ करावा लागणे किंवा आवाज बसल्यासारखा वाटणे अशी लक्षणे दिसू शकतात.

डॉ. सालहब यांच्या माहितीनुसार, या त्रासाचे आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक वेळी छातीत जळजळ होईलच, असे नाही. त्यामुळे अनेकांना हा त्रास आम्लपित्तामुळे होत असल्याचे लक्षात येत नाही. परिणामी ते सर्दी किंवा घशाचा संसर्ग समजून, त्यावर उपचार करण्याचा प्रयत्न करतात.

आहारात कोणते बदल करावेत?

रिफ्लक्सचा त्रास कमी करण्यासाठी काही आहारविषयक बदल उपयुक्त ठरू शकतात. डॉ. सालहब यांच्या माहितीनुसार, कॉफी, मद्य, अतितिखट पदार्थ, चॉकलेट, पुदिना आणि अतिआम्लीय पदार्थांचं सेवन कमी करण्याचा प्रयत्न करावा.

त्याशिवाय रात्री झोपण्याच्या अगदी आधी जेवणं टाळावं. जेवल्यानंतर लगेच झोपण्याची सवय असल्यास रिफ्लक्सचा त्रास वाढू शकतो. त्यामुळे रात्रीचे जेवण आणि झोप यामध्ये योग्य अंतर ठेवणे महत्त्वाचे आहे.

त्रास वारंवार होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला महत्त्वाचा

जेवल्यानंतर अधूनमधून खोकला येणे हे प्रत्येक वेळी गंभीर आजाराचं लक्षण असेलच असे नाही. मात्र, खोकला वारंवार होत असेल, घशात सतत खवखव जाणवत असेल, वारंवार घसा साफ करावा लागत असेल किंवा गळ्यात काहीतरी अडकल्यासारखं सतत वाटत असेल, तर स्वतःहून औषधे घेण्याऐवजी वैद्यकीय सल्ला घेणे योग्य ठरते.

डॉ. सालहब यांच्या मते, आहारातील बदल करूनही खोकला किंवा घशाशी संबंधित त्रास कमी होत नसेल, तर गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट किंवा कान-नाक-घसा तज्ज्ञांकडून तपासणी करून घ्यावी. कारण- लक्षणांमागचे नेमकं कारण समजून घेऊन, त्यानुसार उपचार करणं महत्त्वाचं आहे.