Secret Remedy for Cough Relief: हिवाळा सुरू झाला की अनेकांना एकच त्रास सतावतो; घसा खवखवणे, कोरडा खोकला, सतत गिळताना जळजळ होणे, औषधं घेऊनही खोकला काही केल्या जात नाही, अशा वेळी आजीच्या बटव्यातील घरगुती उपायांची आठवण हमखास येते. पूर्वी गावाकडे किंवा डोंगराळ भागात डॉक्टर सहज उपलब्ध नसताना, लोक निसर्गावर आणि पारंपरिक ज्ञानावरच अवलंबून होते. त्यातूनच पिढ्यान्पिढ्या चालत आलेला हा उपाय आजही तितकाच प्रभावी मानला जातो.
हिवाळ्यात वाढणाऱ्या खोकल्यासाठी लोक नेहमीच सोपा, सुरक्षित आणि लगेच आराम देणारा उपाय शोधत असतात. आजी सांगायची, “घसा दुखायला लागला की औषधांआधी घरातलं औषध वापर.” या घरगुती उपायांमागे अनुभवाचा मोठा वारसा आहे. घसा दुखणे, आवाज बसणे किंवा सतत खोकल्यामुळे त्रस्त असताना काही लोकांना चहा, काढे, वाफ यांचा आधार घ्यावा लागतो. मात्र एक असा उपाय आहे, जो फारसा गाजावाजा न करता थेट आराम देतो.
डोंगराळ भागात राहणारे ज्येष्ठ सांगतात की, थंडी वाढली की घरात एक विशिष्ट औषधी काठी हमखास ठेवली जायची. घशात खवखव जाणवू लागली की तिचा छोटा तुकडा तोंडात ठेवायचा आणि हळूहळू चघळायचा, यामुळे घशावर एक नैसर्गिक आवरण तयार होतं. कोरडेपणा कमी होतो. खोकल्याची तीव्रता हळूहळू घटते. सतत खोकल्याने होणारी आग कमी होते.
या उपायाचा आणखी एक मोठा फायदा म्हणजे तो आवाजासाठीही उपयोगी ठरतो. गायक, शिक्षक, प्रवचनकार किंवा सतत बोलावं लागणाऱ्या व्यक्तींसाठी हा उपाय जणू वरदानच आहे. आवाज बसला असेल तर हा घरगुती उपाय स्वरयंत्र मृदू करतो. घशातील सूज कमी होऊन आवाज पुन्हा स्वच्छ होण्यास मदत होते. म्हणूनच पूर्वी सभा, कीर्तन किंवा प्रवचनाआधी अनेक जण हा उपाय वापरत असत.
हिमालयीन प्रदेशात आणि उत्तर भारतातील अनेक गावांत हा उपाय आजही मोठ्या श्रद्धेने वापरला जातो. ज्येष्ठ नागरिक सांगतात की, पूर्वी थंडीच्या दिवसांत घरात ही औषधी वस्तू साठवून ठेवली जायची. गरज पडली की लगेच उपयोगात आणली जायची. कधी ती तोंडात ठेवून चघळायची, तर कधी गरम पाण्यात उकळून काढा बनवायचा. आलं, दालचिनी आणि काळी मिरी यांच्यासोबत घेतल्यास थंडीवर अधिक परिणामकारक ठरतो, असं अनुभवातून सांगितलं जातं.
मात्र, आजीचा सल्ला इथे महत्त्वाचा ठरतो, कोणताही घरगुती उपाय मर्यादेतच हवा. अति प्रमाणात सेवन केल्यास काही त्रास होऊ शकतो. विशेषतः उच्च रक्तदाब असलेल्यांनी, गर्भवती महिलांनी किंवा नियमित औषधं घेणाऱ्यांनी वैद्यकीय सल्ला घ्यावा, असं आजी हमखास बजावायची.
आयुर्वेदीय ग्रंथांमध्येही या औषधीचा उल्लेख सापडतो. वात आणि पित्त संतुलित ठेवण्यासाठी, घशाच्या तक्रारींमध्ये आणि श्वसनविषयक त्रासात याला श्रेष्ठ मानलं गेलं आहे, त्यामुळेच आजही अनेक आयुर्वेदीय औषधांमध्ये या घटकाचा वापर होतो.
आता प्रश्न पडेल आजीच्या बटव्यातील हा नेमका उपाय आहे तरी काय?
तर, हा प्रभावी, गोडसर चवीचा, घशाचा रक्षक मानला जाणारा औषधी घटक म्हणजे ज्येष्ठमध.
ज्येष्ठमध (Licorice Root) ही एक प्राचीन औषधी वनस्पती आहे. आयुर्वेदात तिला घशासाठी, श्वसनासाठी आणि पचनासाठी अत्यंत उपयुक्त मानले जाते. हिचा उपयोग मुख्यतः मुळांचा सुकवलेला भाग म्हणून केला जातो. चवीला किंचित गोडसर असलेला ज्येष्ठमध तोंडात ठेवताच हळूहळू विरघळतो आणि घशाला लगेच आराम देतो. आजी-आजोबांच्या काळापासून घरगुती औषध म्हणून ज्येष्ठमधाचा वापर केला जातो. खोकला, घसा खवखवणे, आवाज बसणे, गिळताना दुखणे अशा तक्रारींमध्ये हा एक विश्वासार्ह उपाय मानला जातो.
महत्त्वाची सूचना
ज्येष्ठमध गुणकारी असले तरी ते मर्यादेतच घ्यावे. जास्त प्रमाणात घेतल्यास: रक्तदाब वाढू शकतो. शरीरात मीठ-पाण्याचं संतुलन बिघडू शकतं, म्हणून गर्भवती महिला, उच्च रक्तदाब असलेले रुग्ण किंवा नियमित औषध घेणाऱ्यांनी वैद्यकीय सल्ला घ्यावा.
(Disclaimer: वरील माहिती प्राप्त माहितीवर आधारित असून अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)
