Sesame Seeds Benefits: हिवाळ्याच्या आगमनाने शरीराला अतिरिक्त ऊर्जा, उष्णता आणि पोषणाची आवश्यकता असते. या काळात तीळ खाणे खूप फायदेशीर ठरू शकते. तिळाला हिवाळ्यातील सुपरफूड मानले जाते. त्यात कॅल्शियम, लोह, मॅशियम, जस्त, फायबर आणि निरोगी चरबी भरपूर प्रमाणात असते. तीळ शरीराला उबदार ठेवतात आणि पचनासाठीदेखील ते फायदेशीर असतात. पांढऱ्या तिळांचा वापर केवळ अन्नपदार्थांसाठीच नाही, तर आयुर्वेदात औषध म्हणून देखील केला गेला आहे. त्यामध्ये अनेक पोषक घटक असतात, जे शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठीही खूप फायदेशीर असतात. तुमच्या दैनंदिन आहारात पांढऱ्या तिळाचा समावेश करणे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

तीळ खाण्याचे जबरदस्त फायदे

हिवाळ्यात तीळ-गुळाचे लाडू खा

हिवाळ्यात तीळ-गुळाचे लाडू अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता. बहुतेक लोक ते आवडीने खातात. गूळ आणि तीळ दोन्हीही शरीराला भरपूर उष्णता देतात. त्यांचे सेवन केल्याने रोगप्रतिकारक शक्तीदेखील वाढते.

सॅलड आणि स्नॅक्ससोबत खा

तुम्ही तीळ सॅलडवर टाकून खाऊ शकता. तुम्ही ते सूप किंवा स्नॅक्समध्येदेखील टाकू शकता. भाजलेले पांढरे किंवा काळे तीळ स्नॅक्सला कुरकुरीत बनवतात. त्यामुळे फायबरचे प्रमाण वाढते आणि पचनसंस्था मजबूत होते.

तिळाची चटणी बनवा

तुम्ही तिळाची चटणीदेखील आवर्जून बनवू शकता. भाजलेले तीळ, लसूण, हिरव्या मिरच्या आणि मीठ यांने मिश्रण बारीक करून ही पौष्टिक चटणी बनवू शकता.

तिळाचे तेल वापरा

तिळाचे तेलदेखील आरोग्यासाठी लाभदायी मानले जाते. त्याचे सेवन केल्याने हृदयाचे आरोग्य सुधारते.ते पचनदेखील सुधारते. हिवाळ्यात तिळाचे तेल शरीराला उबदार ठेवते आणि सांधेदुखी आणि सूज यांपासून आराम देते.

तिळांच्या सेवनाचे फायदे

पचनसंस्थेसाठी उपयुक्त

पांढऱ्या तिळांमध्ये फायबरचे प्रमाण जास्त असते, जे पचनसंस्थेसाठी खूप फायदेशीर असतात. ते बद्धकोष्ठता दूर करतात आणि पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. तीळ नियमितपणे खाल्ल्याने पचनक्रिया व्यवस्थित होते आणि पोटाच्या समस्या कमी होण्यास मदत होते.

हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर

पांढऱ्या तिळांमध्ये असलेले ओमेगा-३ फॅटी अॅसिड आणि अँटीऑक्सिडंट्स हृदयासाठी खूप फायदेशीर आहेत. ते कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यास आणि हृदयरोगाचा धोका कमी करण्यास साह्यभूत ठरतात. तीळ खाल्ल्याने रक्तवाहिन्यांमधील अडथळे टाळण्यास आणि रक्ताभिसरण सुधारण्यासही मदत मिळते.