तूपाला आपल्या भारतीय संस्कृतीत जास्त महत्त्व आहे. कोणतीही पूजा तूपाशिवाय पूर्ण होत नाही. तसंच जेवणात देखील तूप महत्वाचे आहे. भारतीय घरांमध्ये डाळ असो किंवा चपाती, तुपाशिवाय खाणे सुरू होत नाही. अनेकांना तूप जेवणात खाणे खूप आवडते. तुपामुळे शरीरात ताकद राहते आणि आवश्यक पोषक तत्वेही मिळतात, असं घरातील मोठी माणसं म्हणतात. परंतु, गाय किंवा म्हैस, कोणाच्या दुधापासून बनवलेले तूप जास्त आरोग्यदायी, असा प्रश्न प्रत्येकाच्या मनात पडतो. तर जाणून घेऊया आयुर्वेदानुसार कोणते तूप आरोग्यासाठी जास्त फायदेशीर आहे.
तूपातील पोषक घटक
तुपात मिनरल्स, व्हिटॅमिन्स आणि हेल्दी फॅट्स चांगल्या प्रमाणात आढळतात, जे वजन कमी करण्यासाठी उपयोगी आहेत. याशिवाय तूपात असणारे पोषक घटक त्वचा, केस, मेंदू इत्यादींसाठी देखील खूप चांगले आहे.
गाईच्या तूपाचे फायदे
गाईचे तूप जास्त प्रमाणात वापरले जाते. या तुपाचा रंग पिवळसरअसतो, जो आरोग्यासाठी अधिक फायदेशीर असतो. यामध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि कॅल्शियम मुबलक प्रमाणात आढळतात, जे शरीरासाठी अधिक फायदेशीर असतात. गाईच्या तुपात फॅटचे प्रमाण कमी असते, त्यामुळे वजन वाढण्याची भीती नसते.
म्हशीच्या तुपाचे फायदे
म्हशीचे तूप पांढरे असते. गाईच्या तूपाच्या तुलनेत म्हशीच्या तूपाचे आरोग्यासाठी कमी फायदे आहेत. त्यात मॅग्नेशियम, फॉस्फरस आणि पोटॅशियमसारखे पोषक घटक आढळतात. म्हशीच्या तुपात फॅटचे प्रमाण जास्त असते, त्यामुळे ज्यांना आपले वजन कमी करायचे आहे त्यांनी म्हशीचे तूप खाऊ नये.
(येथे दिलेली माहिती सामान्य माहितीवर आधारित आहे. अधिक माहितीकरिता तज्ञांचा सल्ला घ्या.)